#रिअली गॉनं मिस दिस प्लेस..#मिस माय कॉलेज डेज.. अशा एकंदर आशयाचे स्टेटस, डीपी, एफबी पोस्ट्स, इन्स्टा पोस्ट सध्या झळकत आहेत. ही पोस्ट दिसली की, मुलगा /मुलगी शेवटच्या वर्षांला आहे हे समजायचं. काही जण हे फोटोज, या पोस्ट्स पाहून भावनिक होतात, तर काही जण याच पोस्ट्समधून व्यक्त होतात. कारणही असंच आहे. डिग्री कॉलेजमध्ये लास्ट ईयरला असणाऱ्यांसाठी सध्या जवळ येऊ घातलेल्या परीक्षांसोबतच चौफेर वारे वाहत आहेत, ते म्हणजे ‘फेअरवेल’चे.
फेअरवेल, सेण्डऑफ, बाय बाय ळ८’२ अशा किती तरी धम्माल नावांनी फेअरवेल (शब्दश: अर्थ लावायचा झाल्यास निरोप समारंभ) आणि त्याच्याशी निगडित विविध कन्सेप्ट्स कॅम्पसमधल्या चर्चामध्ये सध्या गाजताना दिसत आहेत. फर्स्ट ईयरच्या पहिल्या दिवसापासून ते फायनल ईयरच्या शेवटच्या दिवसापर्यंत बहुधा कट्टय़ावरच्या शेवटच्या ‘कटिंग’पर्यंत कॉलेजमध्ये, कट्टय़ांवर, फेस्टमध्ये, परीक्षांमध्ये जो काही धुमाकूळ घातला गेला, त्या धुमाकुळाला मिळणारा अल्पविराम म्हणजेच फेअरवेल. अर्थात फेअरवेल पार्टीमध्ये होतो, तो धुमाकूळही वेगळाच. वेगवेगळ्या भागांतील वेगवेगळ्या महाविद्यालयांचे फेअरवेल फंडेही तितकेच वेगळे. हल्ली काहीही असो, फेस्टपासून फेअरवेलपर्यंत.. ‘थीम’ तो बनती हैं! मग थीम शोधण्यापासून सुरुवात होते. ‘मिस्टर अॅण्ड मिस टी.वाय.’ अशा स्पर्धा घेतल्या जातात. फेअरवेलचा माहौल रंगतदार करण्यासाठी डीजे, डान्स परफॉर्मन्स काही ठिकाणी दिसतात हल्ली. तर काही ठिकाणी अतरंगी अॅवॉर्ड्स (बेस्ट टॉपर फ्रॉम बॉटम, बेस्ट अॅक्टिव्ह पर्सन ऑन व्हॉट्सअॅप ग्रुप, सर्वात जास्त अटेण्डन्ससाठी ‘वीरता अॅवॉर्ड’) अशी भन्नाट ‘ट्रिक’ केली जाते. त्यातदेखील करमणुकीसाठी काहीना काही कुरापती, शकलासुद्धा युद्धपातळीवर लढवल्या जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेअरवेल म्हटलं की साऱ्या सीनिअर्सचे डोळे मोठय़ा आशेने एकवटतात ते ज्युनिअर्सकडे. बऱ्याच कॉलेजमध्ये ज्युनिअर्सनी मिळून लास्ट ईअरवाल्यांना फेअरवेल द्यायची पद्धत आहे. पण जर कोणी नाहीच विचारलं तर ‘हम हम है!’ असं म्हणत स्वत: हे ‘टीवायकर’च पैसे काढून कॉण्ट्रिब्युशनची फेअरवेल पार्टी आयोजित करतात. कोण येणार, कोण नाही येणार; हे एकीकडे ठरत असतानाच बहुतांश फेअरवेलना काही घटक मात्र न चुकता दिसतात. ते म्हणजे तीन वर्षांत विद्यार्थ्यांचे तालरंग, त्यांचे अतरंगी स्वभाव, सतरंगी प्रकरणं, चुकीचे प्रोजेक्ट्स, हजेरीतला चढउतार, परीक्षेतला खटय़ाळपणा, प्रसंगी त्यांचा रोष, मतभेद या साऱ्या गोष्टी अतिशय जवळून पाहिलेले (सहन केल्या) प्रोफेसर. लाडक्या-दोडक्या प्राध्यापकवृंदाची खास शैलीत दखल घेतली जाते. हे सगळं खेळीमेळीच होत असतं. हल्ली फक्त कॉलेजचेच नाही तर कोचिंग क्लासेसही फेअरवेल पार्टी आयोजित करू लागले आहेत. या सगळ्यांच्या प्लॅनिंगच्या चर्चा सध्या तरुणाईच्या कट्टय़ावर ऐकू येताहेत. पैशांची जमवाजमवही करून ‘बजेट’ ठरवलं जातंय. लास्ट ईयरच्या या लास्ट मीटिंगची म्हणजेच फेअरवेलची उत्सुकता आणि ग्रुपने गर्दी करून एकत्र शेवटची मिठी मारण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहेच. त्यामुळे तुमच्याकडे कोणी फेअरवेलचं कॉण्ट्रिब्युशन मागायला आलं तर काचकूच न करता ‘खुल के कॉन्ट्री दो..’ कारण आगे आप की बारी है! ल्ल

दहावीनंतर माझ्या शाळेतील एक-दोन मैत्रिणीही कॉलेज, क्लासला माझ्यासोबतच असल्यामुळे तेव्हा निरोप समारंभाच्या वेळी मला फारसं काही जाणवलं नाही. पण आता, कॉलेजचे दिवस खऱ्या अर्थाने संपत असताना मात्र काही वेगळंच वाटत आहे. हाच ग्रुप, याच मैत्रिणी – मित्र, त्यांनी दिलेली अतरंगी टोपणनावं हे सारं यापुढेही सतत सोबत असावं असं वाटतं. आमचं फेअरवेल फार छान झालं. डीजे, धम्माल-मस्ती एकच कल्ला होता. फेअरवेलच्या दिवशी किंबहुना त्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वाचे डीपी, स्टेटस बघून आपण कशापासून तरी दुरावणार ही जाणीव मला झाली. जीवनातल्या काही महत्त्वाच्या प्रसंगांपैकी ‘फेअरवेल’ नक्कीच एक आहे.
– पूजा सुके

महाविद्यालयाचा पहिला आणि शेवटचा असे दोन्ही दिवस आपल्या खूपच जवळचे असतात कारण, या दोन्ही दिवसांना पार केल्यानंतर एक वेगळंच जग आपली वाट पाहत असतं. निरोप समारंभ किंवा फेअरवेल हा एक असा दिवस असतो जिथे मनं मोकळी होता. आमचं फेअरवेल अजून झालं नाही, पण त्याची जोरदार तयारी मात्र सुरू आहे. एक वेगळीच थीम ठरली आहे. मित्र-मैत्रिणींना एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा याचा विचार केला जात आहे. या निरोप समारंभानंतर राहणार आहेत त्या फक्त अविस्मरणीय आठवणी. त्यामुळे शेवटच्या वर्षी आठवणींची साठवण करण्यासाठी साधं का असेना, पण फेअरवेल हवंच.
– अथर्व चव्हाण

हे बरचसं छापील वाक्य वाटेल पण, कॉलेजचा हा काळ कसा निघून गेला खरंच कळलं नाही. फेअरवेलच्या दिवशी इतरांप्रमाणेच मीसुद्धा जवळपास संमिश्र भावनांनीच गेलो होतो. आपल्या हक्काच्या माणसांसमोर, कॉलेजचा एक विद्यार्थी म्हणून केलेला कॉलेजमधला शेवटचा परफॉर्मन्स. तिथे स्पर्धा नव्हती, तर आपुलकी होती. त्या दिवशी एकदमच अनपेक्षितपणे ‘मिस्टर टी. वाय. २०१६’ म्हणून अॅवॉर्ड मिळालं. ‘इट वॉज माय डे,’ अशी माझी भावना होती. रीतसर सत्कार, टाळ्या, माझ्याकडे रोखलेल्या नजरा.. एक वेगळाच अनुभव होता तो. जीवनात एक नवीन वाट सुरू होण्याची चाहूल मनाला त्या क्षणी झाली. कॉलेजचे हे दिवस कधीही संपू नयेत असं वाटतं.
– शशांक सिंग