भारतात इंग्रजांच्या वाढत्या प्रभावामुळे आणि शिवणकलेच्या विकासामुळे ब्लाऊजचा जन्म झाला. ‘नो ब्लाऊज’ चळवळीत हीच पद्धत नव्याने आणत कित्येक तरुणींनी वेगवेगळ्या भन्नाट पद्धतीने नेसलेल्या साडय़ांचे फोटो टाकले होते. या सगळ्या उपद्व्यापांमागे एकच उद्योग होता तो ‘कम्फर्ट’ लक्षात घेण्याचा.
या दिवाळीत कोणती विशेष घटना घडल्याचं लक्षात आहे? फटाक्यांचा कमी वापर, फेरीवाल्यांपासून मुक्त रेल्वे स्थानक, संपाचे वारे अशा काही घटना यंदाच्या दिवाळीत लक्ष वेधून घेत होत्याच. मुंबईतील फेरीवाले हे फॅशनच्या बाबतीत सर्वात मोठे ट्रेण्डसेटर आहेत आणि सगळ्यात आधी नवा ट्रेण्ड त्यांच्याकडे आलेला असतो हे मान्य करायलाच हवे. मात्र ही बाब वगळता या घटनांचा तसा थेट संबंध कपडे, ट्रेण्ड, फॅशन क्षेत्रावर पडलेला नाही. तरीही आपण दिवाळीच्या काळातील घटनांची उजळणी करतोय, कारण या काळात सोशल मीडियावरील एका घटनेने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. दिवाळीच्या आधी saree.man या इन्स्टाग्राम स्थळावर साडी फेस्टिव्हलनिमित्त ‘नो ब्लाऊज’ चळवळ सुरू झाली होती. नावाप्रमाणेच ब्लाऊजचा वापर न करता साडी नेसण्याचं आवाहन यात स्त्रियांना केलं गेलं होतं. कित्येकींनी यात भाग घेत आपले फोटोज अपलोड केले. वरकरणी हा प्रकार अजून एक ‘फेमिनिस्ट चळवळ’ असा वाटू शकतो. पण फेमिनिझमशी याचा थेट संबंध नव्हता. यामागचं कारण तितकंच साधंसोप्पं होतं. खरंतर साडी नेसायची सुरुवात ही ब्लाऊज शिवायच झाली. अजूनही कित्येक आदिवासी पाडे किंवा ग्रामीण भागांमध्ये बायका अशाच प्रकारे साडी नेसतात. पदराचा भाग छातीभोवती व्यवस्थितपणे गुंडाळून ही साडी नेसली जाते. भारतात इंग्रजांच्या वाढत्या प्रभावामुळे आणि शिवणकलेच्या विकासामुळे ब्लाऊजचा जन्म झाला. या चळवळीत हीच पद्धत नव्याने आणत कित्येक तरुणींनी वेगवेगळ्या भन्नाट पद्धतीने नेसलेल्या साडय़ांचे फोटो टाकले होते. या सगळ्या उपद्व्यापांमागे एकच उद्योग होता तो ‘कम्फर्ट’ लक्षात घेण्याचा. अतिघट्टपणामुळे कित्येकदा ब्लाऊज नकोसा वाटतो. मग त्याला क्रॅप टॉप, जॅकेट, शर्ट ब्लाऊज असे पर्याय शोधले जातात. पण त्याऐवजी ब्लाऊजलाच फाटा देता आला तर? या कुतूहलातून हा प्रयोग करण्यात आला होता. ‘कम्फर्ट’ किंवा सुटसुटीतपणाच्या शोधातून पेहरावाचा हा प्रयोग नवा किंवा पहिला नाही. हल्ली हे प्रयोग आवर्जून केले जात आहेत. पारंपरिक कपडय़ांचे नियम मोडून, दुरुस्त करून आपल्या सोयीनुसार त्यात बदल करण्याचा प्रयत्न तरुणाई आवर्जून करतेय.
‘कम्फर्ट’ हा शब्द इतका परवलीचा आहे की अमेरिकन देशांमध्ये खाद्यसंस्कृतीमध्येही ‘कम्फर्ट फूड’ ही संकल्पना लोकप्रिय आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास काही वेळासाठी फिटनेस, डाएट, बजेट या सगळ्यांना बाजूला ठेवून मन तृप्त करणाऱ्या पदार्थाचा आस्वाद घ्यायचा. मग त्यात आई किंवा आजीच्या हातचे लहानपणीचे आवडते पदार्थ असतील किंवा पेस्ट्री, बर्गर, पिज्जासारखे हायकॅलरीज पदार्थही असतील. भारताच्या संदर्भात बोलायचं झाल्यास चाट, भजीसारखे स्ट्रीट फूड, बटर चिकन, गुलाब जामूनसारखे पदार्थ या गटात मोडतात. या पदार्थामुळे वाढणारं वजन किंवा आजारांचा धोका याची शक्यता बाजूला ठेवून पदार्थाचा मनमुराद आनंद घेतला जातो. अशीच काहीशी ‘कम्फर्ट ड्रेसिंग’ची संकल्पना तरुणाईमध्ये मूळ धरू लागली आहे. पेहरावाचे नियम, संकेत हे सगळे काही क्षणासाठी बाजूला ठेवून आपली सोय आणि आवड यांना प्राधान्य देण्याकडे तरुणाईचा कल आहे. मग त्यासाठी काही जास्तीचा पैसा खर्च झाला, दोन अधिक नजरा उंचावल्या, थोडीशी बोलणी ऐकावी लागली तरी हरकत नाही. पण आरशात स्वत:ला न्याहाळताना होणारा आनंद त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरू लागला आहे. यंदाच्या दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गेला असाल, तर फ्लेअर कुर्त्यांचे कित्येक प्रकार पाहायला मिळाले असतील. साधारणपणे गुडघ्याच्या उंचीपर्यंत असलेल्या या कुर्त्यांची खासियत म्हणजे यांच्यासोबत तुम्ही काय घालता यानुसार तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल तर्क केले जातात. म्हणजेच फ्लेअर कुर्त्यांसोबत ब्राईट लेगिंग घातली, तर कॉलेजला जाणारी फन युवती. कॉटन घालणारी स्त्री नक्कीच ऑफिसला जाणारी तरुणी. थोडा पारंपरिक प्रकार हवा असेल, तर लेगिंगसोबत दुपट्टा येणार. पण नुसता कुर्ता, गळ्यात स्कार्फ किंवा कलर जॅकेट आणि डोळ्यावर गॉगल असेल तर नव्या जमान्याची हिपस्टर. यातील शेवटचा प्रकार सध्या ‘कूल’ जमातीचा आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या सोयीनुसार कुर्त्यांची उंची ड्रेस म्हणून वापरता येईल अशा पद्धतीने ठेवलेली असते. बरं म्हणून हे कुर्ते ‘वन पीस ड्रेस’ या उक्तीला साजेसे असतील, तर असंही नाही. त्यांचा आकार शक्यतो लूझ ए लाइन किंवा बॉक्स पद्धतीचा असतो. म्हणजे फिटिंगच्या बाबतीत थोडा ढगळ असतो. त्यामुळे साहजिकचं ड्रेसमध्ये विशेषत: हिल्स घातल्यावर नजरेत भरणारा उंचपणा इथे येत नाही. उलट स्नीकर्स किंवा चप्पल घालून बुटकं दिसण्यालाच जास्त पसंती मिळते.
पजामा किंवा रात्री घालायचे कपडे, हा खरंतर गटच वेगळा. दिवसभर थकून घरी आल्यावर सुटसुटीत पजामा किंवा नाईटसूट घालून बिछान्यावर लोळण्याचं सुख काय असतं हे वेगळं सांगायची गरज नाही. आपल्या आवडीच्या कार्टून प्रिंटचे, ढगळ, होजियरीसारख्या सुटसुटीत कापडाचे कपडे दिवसभर घालता आले तर? हा केवळ विचार यायचा अवकाश फॉर्मल्सचे सगळे नियम मोडत सिल्क पजामा, रॅपअराऊंड शर्ट हे दैनंदिन पोशाखाचा भाग झाले. बरं सुरुवातीला सिम्पल स्ट्राइप्स, डार्क रंग, स्ट्रेट फीट यामुळे त्यांचा भडकपणा कमी करायचा प्रयत्न केला गेला. पण नंतर मात्र जम्पसूट, ऑल ओव्हरमध्ये मोठे कार्टून प्रिंट्स, पेस्टल शेड्स, वेल्व्हेटचा वापर यामुळे त्याचं रूप अजूनच विस्तारलं. हल्ली विमानतळावर या पेहरावातील तरुण हमखास दिसतात. पार्टी, कॉलेज किंवा रोजच्या वापरातसुद्धा हे कपडे आवर्जून दिसतात. अभिनेता रणवीर सिंगचा ही स्टाईल लोकप्रिय करण्यात मोठा हात आहे. शर्ट ड्रेस हाही असाच रात्रीच्या कपडय़ांमध्ये मोडणारा प्रकार आता मुलींमध्ये लोकप्रिय होतोय. त्यातून मायक्रो स्कर्टसारखीच मायक्रो ड्रेस ही संकल्पना मूळ धरतेय. शर्ट ड्रेसवर डेनिम जॅकेट किंवा लूझ स्कर्ट हा तरुणींचा लाडका पोशाख होतोय. त्यामुळे अर्थात टय़ुनिक, शॉर्ट कुर्ता यांच्या खाली पॅण्ट, लेगिंग घालायची गरज वाटेनाशी होतेय. ‘फ्री द निप्पल’ ही खरंतर उद्रेकातून आलेली संकल्पना. पण आजच्या युगात त्याचा संदर्भ बदलतो आहे. केवळ बंद म्हणून नाही, पण स्वत:च्या सोयीसाठी घट्ट ड्रेसमध्ये ब्रा न वापरण्याकडे मुलींचा कल वाढतो आहे. पॅडेड ब्रामुळे होणारी घुसमट हे त्यामागचं मुख्य कारण आहे. एरवी उत्तेजक (सेक्सी) कपडय़ांचा प्रकार म्हणून समजला जाणारा थोंग हा अंडरगार्मेटचा प्रकारसुद्धा याच विचारसरणीमुळे मागे पडतो आहे. इनर्समधील सिल्क, सॅटीनची जागा कॉटनने घेतलीय.
अगदी मुलांमध्येसुद्धा कम्फर्ट हा मुद्दा मूळ धरू लागला आहे. त्यामुळे रणवीरचा स्कर्ट हा नसता उद्योग न वाटता छान प्रयोग वाटतो. लांब फ्लेअर कुर्ता आणि स्कार्फ ही स्टाइल मुलांमध्येसुद्धा आवडीची ठरते. विशेषत: धोतर, पायजमा, लुंगीसारखे प्रकार त्यांना आवडू लागतात. अर्थात या लूकचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे त्याचा डलनेस. कॉटन सुटसुटीत असलं तरी त्याच्या अर्थी टोन्समुळे उठून दिसत नाही. पण सुटसुटीतपणाच्या मुद्दय़ाखातर ही तडजोड तरुणाईला मान्य आहे. ट्रायबल दागिने, लूक ट्रेण्डमध्ये येण्यामागेही ही भूमिका कारणीभूत आहे. काही वर्षांनंतर फूड कल्चर बदलतं तसं पेहरावाची पद्धतसुद्धा बदलते. या दोन्ही संस्कृती हातात हात घालून चालत असतात, त्याबद्दल नंतर सविस्तर बोलूच. पण तोपर्यंत जेवणातील ताटातील कम्फर्ट कपाटात पोहेचल्याच्या बदलाची गंमत अनुभवूयात!
मृणाल भगत -viva@expressindia.com