देशभरातील फॅशन विश्वाची नजर असलेला लॅक्मे फॅशन शो नुकताच मुंबईत पार पडला. मनीष मल्होत्रांच्या कलेक्शनने सुरुवात झाली आणि रोहित बाल यांनी ग्रॅण्ड फिनाले सादर केला. नेहमी फॅशन शो मध्ये दिसणारे चकचकीत, भरगच्च भरतकाम असलेले कपडे या वेळी कमी होते. तीन- चार डिझायनर्सचा अपवाद वगळता इतरांनी समर कलेक्शनमध्ये सैलसर, किंचित ओव्हरसाइझ आणि कंफर्टेबल डिझाइन्सला प्राधान्य दिल्याचं दिसलं. यंदाच्या समर कलेक्शनचं हेच वैशिष्टय़ म्हणता येईल.
उन्हाळ्याचे दिवस म्हणजे अंगाची लाही लाही, घामाचा चिकचिकाट.. अशात फॅशन कशी सुचणार? तरीही आजच्या जगात ट्रेण्डमध्ये काय आहे हे लक्षात घेऊनच ड्रेसिंग करावं लागतं. फॅशनेबल राहण्यासाठी कधीकधी फार त्रासही होतो. हाय हिल्स, टाईट, बॉडी कॉन किंवा बॉडी हगिंग कपडे, व्यवस्थित फिटिंग म्हणजेच स्टायलिश राहणं अशीच आपली समजूत असते. यावर्षीचा उन्हाळा मात्र दरवर्षी समर कलेक्शन सादर होताना अनेक प्रकारचे, स्टाइल्सचे कपडे दिसतात. यंदाचा उन्हाळा मात्र कंफर्टेबली स्टायलिश राहण्याचा आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये सादर झालेल्या समर कलेक्शनमध्ये ‘ओव्हरसाइझ ड्रेसिंग’ हाच ट्रेण्ड दिसला. सैलसर कपडे आणि त्यावर हलक्या-फुलक्या अॅक्सेसरीज, फ्लॅट फूटवेअर असा लुक अनेक डिझायनर्सनी रॅम्पवर आणलेला दिसला. त्यामुळे या वर्षीचा उन्हाळा खूप सूदिंग, एलिगंट आणि फ्रेश असल्याचं दिसून येतंय. वेगवेगळ्या हटके स्टाइल्स, लाइट लेअरिंग्स त्याचबरोबर प्रामुख्याने पांढरा आणि इतर लाइट रंग बघायला मिळाले. ऑरेंज, रेड आणि इंडिगोच्या शेड्स वगळता बहुतेक कलेक्शन्स कृष्ण-धवल छटांमधली होती. या वर्षीचा उन्हाळा आपल्यासाठी नक्कीच ‘कूल’ ठरणार आहे. लूज बॅगी शर्ट, टी-शर्ट्स, लूज पँट्स, कुर्तीज.. एवढंच नाही, तर लूज वन पीस ड्रेस आणि लूज ब्लाऊझसुद्धा यावेळी बघायला मिळतील.
जुने ते सोने
फॅशन ट्रेण्ड हंगामासरशी बदलत असतात. तरीही फॅशन म्हणजे एक चक्र आहे असं म्हणता येईल. जुनी फॅशनच नवी स्टाइल म्हणून काही वर्षांनी परत येते. या वर्षीच्या फॅशन वीकमध्ये याचीही झलक दिसली. अनेकांनी आपल्या डिझाइन्समध्ये ‘रेट्रो लुक’ आणला होता. ब्रिटिश काळातील भारतीय फॅशन, व्हिक्टोरियन काळातील स्टाइल्स पुन्हा रॅम्पवर दिसल्या. गौरांग मेहता या डिझायनरने २०व्या शतकातील सुरुवातीच्या दशकांमधील फॅशनवरून प्रेरणा घेत आपलं कलेक्शन सादर केलं. तो म्हणाला, ‘फॅशन कितीही नवीन वाटत असली तरी तिची पाळंमुळं खोल दूरवर आपल्या जुन्या काळाशी, आपल्या संस्कृतीशी जोडलेली असतात, आम्ही डिझायनर आपली कल्पकता वापरून त्याला कन्टेम्पररी लुक देतो, जेणेकरून नवी पिढी त्याला आपलंसं करेल. साडी हे सगळ्यात फॅशनेबल वेअर आहे. तेच हातमागाचं कापड वापरून नजाकतीने पेश केलं आणि जुना लुकही फ्रेश वाटला.’
डिझायनर परोमिता बॅनर्जी म्हणाली, ‘हल्ली दिवसागणिक नवा ट्रेंड येतो. खूप नवनवीन करायच्या नादात आपण शांतता विसरून गेलोय. त्यामुळे मी माझ्या कलेक्शनची नाळ पूर्वीच्या काळाशी जोडण्याचा मी प्रयत्न केला. जेव्हा काय घालावं, कसं घालावं याची फारशी चिंता नव्हती, नव्या फॅशनचा अट्टहास नव्हता, तेव्हा आपल्या कम्फर्टप्रमाणे प्रत्येक जण जगत होता. या गोष्टींना आपण विसरत चाललोय आणि त्यामुळे त्याला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न मी माझ्या कलेक्शनमधून केला’.
जुन्या काळच्या फॅशनचा फील देणारी फॅशन मुख्यत सैल, पायघोळ आणि फ्रीलच्या कपडय़ांमधून दिसली तशी बाह्य़ांच्या स्टाइल्सवरूनदेखील दिसली. अनेक डिझायनर्सनी पफ स्लीव्ह्ज, बटरफ्लाय स्लीव्ह्ज अशा जुन्या स्टाइल्सचा वापर केला. भारतीय पेहरावांमधली ब्लाऊझ जुन्या काळाप्रमाणे लांब दिसली, तर पाश्चिमात्य पेहरावातील गाऊन व्हिक्टोरिअन काळाची आठवण करून दे.
लॅक्मे फॅशन वीक वर्षांतून दोन वेळा मुंबईत होतो. या झगमगाटी समारंभासाठी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था असते. गेले दोन सीझन ग्रँड फिनालेसाठी वैशिष्टय़पूर्ण स्थळांची निवड केली जातेय. यंदा सेंट झेविअर्स कॉलेजच्या प्रांगणात गॉथिक शैलीतील इमारतीच्या पाश्र्वभूमीवर ग्रॅण्ड फिनालेचा रॅम्प होता. प्रसिद्ध डिझायनर रोहित बाल यांच्यासाठी करीना कपूर खान ‘शो स्टॉपर’ म्हणून अवतरली. ‘करोशिनी’ या उर्दू नावाच्या कलेक्शनमध्ये भारताच्या विविध भागातील कारागिरांनी पारंपरिक पद्धतीने केलेलं भरतकाम वैशिष्टय़पूर्ण होतं.