कण्ट्री संगीताला शे-दीडशे वर्षांचाच इतिहास आहे. त्यातील गिटार-बेंजोलिन-व्हायोलिन आणि माऊथ ऑर्गन यांच्या संगमातून तयार झालेले संगीत पाय थिरकवायला लावणारे आहे. आयरिश संगीतात वेगाने वाजणारी बासरी ज्याप्रमाणे महत्त्वाची असते, तसे इथे व्हायोलिन, बेंजोलिन आणि गिटारचे अस्तित्व असते. अमेरिकी मूळ रेड इंडियन्स, वेस्टर्न संगीत आणि गुलाम कृष्णवंशीयांनी तयार केलेल्या संगीताचे मिश्रण म्हणून हे संगीत पुढे आले. रांगडय़ा धून आणि शब्दांनी त्याचा विकास झाला आणि अलीकडच्या काळात अनेक पॉप कलाकारांनी आपल्या संगीतात कण्ट्री वाद्यशैलीचा अंतर्भाव केला.
टेलर स्वीफ्टच्या दशकापूर्वीच्या बहुतांशी अल्बम्सवर कण्ट्री म्युझिकचा शिक्का बसला होता. ‘अवर साँग’, ‘स्टे-स्टे-स्टे-’ ही तिची काही गाणी अस्सल कण्ट्री म्युझिकचा नमुना आहेत. मूकपटातून बोलपटात रूपांतर होताना आपल्याकडे अनेक मराठी-हिंदी चित्रपटांत बेंजोलिन हे खास कण्ट्रीवाद्य वाजवले जात होते. साठोत्तरीच्या काळातील संगीतकारांनी त्याचा वापर कमी करत नेला. पण आजही अमेरिकी सिनेमा, मालिकांमध्ये कण्ट्री गाण्यांचे, गायकांचे संगीत हामखास वापरले जाते. अमेरिकेच्या दक्षिण प्रांतात (दक्षिण अमेरिका नव्हे) या संगीताचा वापर मुक्त हस्ते आढळतो. ‘हार्ट ऑफ डिक्सी’ नावाच्या टीव्ही मालिकेमधील कण्ट्री म्युझिक प्रत्येकांनी अनुभवावे इतके सुंदर आहे (यू-टय़ुबवर सर्च करा). कण्ट्री म्युझिकमध्येच आठवण्याचे कारण नुकताच आलेला केसी मसग्रेव्हज या गायिकेचा ‘गोल्डन अवर’ नावाचा ताजा अल्बम. आपल्याकडे या गायिकेच्या नावाचा मागमूसही नाही, कारण कण्ट्री म्युझिक आपल्याकडे क्लासिकल किंवा टेलर स्वीफ्ट, डिक्सी चिक्ससारख्या कलाकार-बॅण्डपुरते ऐकले जाते. त्यामुळे या कलाकारांच्या तोडीची सुंदर गाणी देऊनही केसी मसग्रेव्हज या गायिकेची खणखणीत गाणी आपल्याकडच्या संगीतदर्दीपर्यंत पोहोचलेली नाहीत. गोल्डन अवरमधील ‘स्लो बर्न’ हे गाणे गेल्या महिन्यात लोकप्रिय झाले. ज्यांनी या स्तंभात ओळख करून दिलेल्या सुफियान स्टीव्हन्सची प्रयोगशील गाणी ऐकली असतील, त्यांना केसी मसग्रेव्हजचे ‘स्लो बर्न’ प्रचंड आवडेल. ही गाणी शांततेत किंवा जमल्यास रात्रीच्या ताऱ्यांनी भरलेल्या आकाशात ऐकल्यास सर्वाधिक परिणामकारक वाटतील. सुफियान स्टीव्हन्सच्या ‘ऑल द ट्री ऑफ फिल्ड्स’सोबत केसी मसग्रेव्हजचे गाणे एकत्रित ऐकल्यास आनंदाच्या परमोच्चस्थानी पोहोचू शकाल. या दोन्ही गाण्यांतील वापरलेल्या वाद्यसंगीतासोबत कोरसमधील गंमत लक्षात येईल. केसी मसग्रेव्हजचे आत्तापर्यंत तीन अल्बम आले आहेत. प्रत्येक अल्बममधील गाणी अमेरिकी कण्ट्री संगीतात मानाचे स्थान मिळवून आहेत.
कण्ट्री संगीताशी तातडीने ओळख करून घ्यायची असेल तर ‘मेरी गो राऊंड’, ‘बिस्कीट’, ‘कप ऑफ टी’ ही तिची गाणी आवर्जून काढून ऐकावीत. गिटार-बेंजोलिनचा अफलातून मेळ यात ऐकायला मिळेल. ‘डिक्सी चिक्स’ हा कण्ट्री बॅण्ड आपल्यापर्यंत पोहोचला, पण त्यांचे इथल्या टीव्ही आणि रेडिओवर वाजणारे एकच गाणे लोकप्रिय होते. ‘आय अॅम नॉट रेडी टू मेक नाइस’ हे गाणे सर्व भारतीय संगीत वाहिन्यांवर लागायचे. या बॅण्डच्या गाण्यांतील खरी जादू समजून घ्यायची असेल, तर ‘वाइड ओपन स्पेस’, ‘काऊबॉय टेक मी अवे’ या रचनांना अनुभवणे आवश्यक आहे. शरील क्रो हिच्या काही गाण्यांमध्ये उत्तम कण्ट्री संगीताचा अंतर्भाव आहे. ‘द फर्स्ट कट इज डिपेस्ट’ आणि ‘इझी’ या गाण्यांसह कित्येक श्रवणीय गाणी शेरील क्रोच्या पोतडीतून निघतील. प्रत्येक गाण्यातील गिटार बराच काळ आपला पिच्छा सोडणार नाही. क्लासिक आणि पारंपरिक कण्ट्री संगीताऐवजी गेल्या वीस वर्षांतील कण्ट्री म्युझिक आपल्याकडच्या कानसेनांना आवडू शकेल. या काळात अनेक प्रयोग या संगीत प्रकारात झाले आणि रॉक-पॉप स्टार्ससारखे कण्ट्रीस्टार मुख्य प्रवाहात लोकप्रिय झाले. ‘लेडी अॅण्टेबेलम’ हा बॅण्ड त्यातील एक. सात-आठ वर्षांपूर्वी या बॅण्डच्या ‘नीड यू नाऊ’ गाण्याला सवरेत्कृष्ट गाण्याचे ग्रॅमी मिळाले होते. त्यानंतर त्यांनी पाच ग्रॅमीवर नाव कोरले. आत्ताच्या काळातील कण्ट्री म्युझिक याद्यांमधील सर्वात महत्त्वाचा बॅण्ड म्हणून त्याकडे पाहिले जाते. मिराण्डा लॅम्बर्ट या टेक्सासमधील गायिकेनेही कण्ट्री म्युझिकमध्ये गेल्या दीड दशकांत नाव कमावले आहे. बिलबोर्ड याद्यांमध्ये तिच्या अनेक गाण्यांचा समावेश झाला आहे. केरी अण्डरवूड या गायिकेच्या ‘जिजस टेक द व्हिल’ या गाण्याने तिला अल्पावधीमध्ये कण्ट्रीस्टार बनवले. ऑस्ट्रेलियातील कीथ अर्बन या गायकानेही कण्ट्री म्युझिकद्वारे आपली नवी ओळख प्रस्थापित केली. कण्ट्री म्युझिक सामूहिक नृत्यासाठी बनवला गेलेला प्रकार आहे. उत्तम हेडफोनसह त्याचा आस्वाद घेतलात, तर या रांगडय़ा आणि काहीशा जंगली भासणाऱ्या संगीतामुळे मन अविरत नृत्य करीत असल्याचा अनुभव येऊ शकेल.
म्युझिक बॉक्स
- Kacey Musgraves – Slow Burn
- Kacey Musgraves – Biscuits
- Kacey Musgraves – Everybody’s Cup Of Tea
- Taylor Swift – Stay Stay Stay
- Dixie Chicks – Cowboy Take Me Away
- Lady Antebellum – Need You Now
- Sheryl Crow – The First Cut Is The Deepest
viva@expressindia.com