सिनेमातल्या फॅशनचा लगेच ट्रेण्ड बनतो; पण चंदेरी पडद्यावरचं हे स्टाइल स्टेटमेंट प्रत्यक्षात कसं मिरवावं यासाठी हा कॉलम.
साडी नेसायला तसं कोणत्याही निमित्ताची गरज नसते. ऑफिसपासून ते पार्टीपर्यंत, किटी पार्टीपासून ते वेडिंग पार्टीपर्यंत कोणत्याही कार्यक्रमाला साडी साजेशी दिसते. कधीतरी सहज वाटलं म्हणून साडी नेसून एखादा दिवस साजराही करता येतो. तिची जितकी रूपं आहेत, तितकी तिच्यात भिन्नता आहे. त्यामुळे साडीचा कंटाळा आला किंवा त्यात तोचतोचपणा आला, असं कधीच जाणवत नाही. साडीचं हे सूत्र दीपिका पदुकोणलासुद्धा पटलेलं आहे. त्यामुळेच तर ती साडी नेसायची संधी कधीच सोडत नाही. ‘बाजीराव मस्तानी’च्या जयपूरला झालेल्या एका प्रसिद्धी कार्यक्रमासाठी या ‘मस्तानी’ने फिकट पिस्ता रंगाची साडी नेसली होती. दीपिकाच्या साडी निवडीबद्दल सांगायचं झाल्यास, ती नेहमी शिफॉन, जॉर्जेट, नेटच्या कमी वजनाच्या आणि बारीक नक्षीकाम असलेल्या साडय़ांना पसंती देते. त्यातून तिची सुडौल शरीरयष्टी आणि नजरेत भरणारी उंची दिसून यावी याची ती काळजी घेते. याही लुकमध्ये तिने या बाबींचा विचार करत साडीसोबत हाय बन किंवा मराठमोळ्या भाषेत म्हणायचं झालं तर अंबाडा बांधला आहे. कानातले मोठे डूल तिच्या साडीला फोकसमध्ये आणत आहेत. ती नेहमीच बॅकलेस स्ट्राइपच्या ब्लाउजना पसंती देते. इथेही तिने तसाच ब्लाउज निवडला आहे.
लुक कसा कॅरी कराल?
लवकरच येणाऱ्या दिवाळीसाठी शॉपिंगच्या यादीमध्ये एक साडी तर हवीच. जॉर्जेट आणि नेटच्या साडय़ा सध्या ट्रेंडमध्ये आहेत. नेहमीचे लाल, पिवळा, नारंगी असे उजळ रंग निवडण्यापेक्षा बिस्कीट, राखाडी, बेबी पिंक, पेस्टल ग्रीन, आकाशी असे इंग्लिश कलर या दिवाळीत वापरून पाहा. सोबत स्लीव्हलेस किंवा स्ट्राइप ब्लाउज उत्तमच. एरवी कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाउज घातला जातो. पण दीपिकाने येथे साडीच्या बॉर्डरच्या आतल्या बाजूला असलेल्या ब्रोकेड पट्टीशी ब्लाउजचा रंग जुळवला आहे. अशी ट्रिक तुम्हीही वापरू शकता. इंग्लिश रंगांसोबत भडक सोनेरी रंगाचे ब्लाउज घालायची चूक मात्र तुम्ही करू नका. या साडय़ांसोबत भरपूर दागिने घालण्याची गरज नसते. अगदी एखाद्दोन, पण आकर्षक दागिने हवेत. जडाऊ कानातले डूल किंवा कडे घातल्यास पुरेसे असते. या साडय़ांचा एक फायदा म्हणजे तुमची उंची जास्त दिसून येते. सोबत केसांचा थोडा वरच्या बाजूला अंबाडा बांधल्यास तुमचाही दीपिका लुक तयार होईल.
मृणाल भगत – viva.loksatta@gmail.com