स्त्रीच्या सौंदर्याच्या काही साचेबद्ध कल्पना आपल्या डोक्यात असतात. गोरा रंग, शिडशिडीत बांधा, लांब सुंदर केस यात बसणारी मुलगी आपल्याकडे सुंदर समजली जाते. त्यात एखादीचे डोळे निळे-घारे, केसांचा रंग सोनेरी-तपकिरी असेल तर तिच्या वेगळेपणातले सौंदर्यही आपण मान्य करतो. पण हे वेगळेपण काळ्या वर्णात मात्र आपल्याला दिसत नाही. जागतिक सौंदर्यस्पर्धामध्ये महत्त्वाचा असतो साईझ आणि उंची. झिरो फिगरचा अट्टहास रॅम्पवरच्या मॉडेल्सकडूनच आलेला. अशी शिडशिडीत आणि उंच तरुणीच रॅम्पवर जाण्यास पात्र ठरते. आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार मॉडेलिंगमधल्या करिअरसाठी किमान उंची ५ फूट ९ इंच असणं आवश्यक आहे. फॅशन जगतात सौंदर्याची हीच व्याख्या केली जाते. खरं तर भारतीय स्त्रियांच्या सर्वसाधारण उंचीच्या मानाने ही उंची फार जास्त आहे. त्यात आपल्याकडची सौंदर्याची पारंपरिक परिभाषा ‘सुबक ठेंगणी’ला मान्यता देणारी. तरीही भारतीय रॅम्पवरदेखील अशा उंच मॉडेलच झळकतात. मुळात मॉडेलिंगमध्ये सौंदर्याची परिभाषा कशी तयार झाली, हे ‘साइझ’ आणि ‘हाइट’चे स्टँडर्ड का आले हे शोधण्यासाठी काही तज्ज्ञांना बोलतं केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुपरमॉडेल अॅलिशिया राऊत म्हणाली, ‘मी स्वत: खूप उंच आहे. खरं तर या अतिउंचीमुळे शाळेत मला मुलं चिडवायची. मला माझ्या या उंचीचा राग यायचा तेव्हा. इतर सर्वसामान्य मुलींपेक्षा माझी उंची अशी ताड-माड का वाढली, याचं वाईटही वाटायचं; परंतु मॉडेलिंगमध्ये मला माझ्या या उंचीचाच फायदा झाला. फॅशन इंडस्ट्रीमध्ये मॉडेलची उंची महत्त्वाची कारण तुम्ही रॅम्प वर चालता तेव्हा दूर बसलेल्या व्यक्तीलासुद्धा तुम्ही घातलेले डिझायनर वेयर्स दिसतात. उंच आणि सुडौल बांधा असण्यामुळे घातलेले कपडे खूप उठावदार दिसतात. एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी जसे काही स्पेसिफिीकेशन्स लागतात तसेच मॉडेलिंग क्षेत्रात हे तुमच्या साइझ आणि उंचीच्या बाबतीत स्पेसिफिकेशन्स असतात.’

डिझायनर श्रुती संचेती याविषयी म्हणाल्या, ‘सुडौल बांधा आणि उंचीमुळे आम्ही डिझाइन केलेले कपडे आकर्षक, उठावदार दिसतात. फॅशन रॅम्पवर कपडय़ाचं सौंदर्य महत्त्वाचं असतं आणि सुडौल शरीरावर ते अधिक उठून दिसतं. कापडाचा व्यवस्थित फॉल पडतो. खूप किडकिडीत, साइझ झिरो किंवा स्किनी मॉडेल्सपेक्षा हल्ली वेल टोन्ड आणि फिट मॉडेल्सना महत्त्व आलंय. ही चांगली गोष्ट आहे. हल्ली फॅशन जगतात अशाही अनेक जणी आहेत ज्या अशा साइज, वजन, उंची, बांध्याच्या ठरावीक स्पेसिफिकेशन्समध्ये बसत नाहीत. तरीही आज त्या मोडेलिंग क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. स्वतंत्र विचार, मोकळा दृष्टिकोन आणि परिपक्व सौंदर्यदृष्टी यामुळे हे घडते आहे. शेवटी फॅशन जगतात सौंदर्याची खरी लक्षणं – कॉन्फिडन्स, स्क्रीन प्रेझेन्स आणि योग्य अॅटिटय़ूड हीच आहेत.’

गेल्या काही वर्षांत सौंदर्याच्या या साचेबद्ध कल्पनांना तडा देण्याचा प्रयत्न होत आहे. या वजन, उंची, बांधा, वर्णाच्या निकषांत न बसणाऱ्या मॉडेलही रॅम्पवर दिसू लागल्या आहेत. सौंदर्याची परिभाषा बदलतेय असंच या मॉडेल्सच्या यशाकडे बघून वाटतं. न्यूयॉर्क फॅशन वीकचा मागचा सीझन काही वेगळ्या पठडीतील मॉडेल्सनीच गाजवला होता. डाऊन सिंड्रोम असलेली मँडेलीन स्टुअर्ट आणि अंगावर कोडाचे डाग असलेली शँटेल ब्राऊन-यंग यांनी यंदाही न्यूयॉर्क फॅशन वीक गाजवला. या दोघींसोबतच फॅशन विश्वाने रूढ केलेली सौंदर्याची परिभाषा मोडीत काढत अॅशले ग्रॅहम ही ‘प्लस साइझ मॉडेल’ मुख्य प्रवाहात रॅम्पवॉक करू लागली आहे. भारतीय वंशाची हरनाम कौर चेहऱ्यावरचे अनावश्यक केस कुठल्या ट्रीटमेंटने किंवा रेझरनेदेखील काढत नाही. अनावश्यक केस सौंदर्यात बाधा आणत नाहीत, असं तिचं मत आहे. तिने केलेलं वेडिंग फोटो शूट गाजलं. या अशा सौंदर्यवतींमुळे तरी समजाचा किंवा जगाचा सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल. तो अधिक व्यापक होईल अशी आशा करायला हरकत नाही.

अॅशले ग्रॅहम
मॉडेलिंगच्या क्षेत्रात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बॉडी टाइप आणि बॉडी साइज. म्हणूनच अॅशले मॉडेलिंगच्या क्षेत्रातील सौंदर्याच्या परिभाषेच्या बाहेरची. ओव्हरवेट आणि प्लस साइझ. पण आपल्या दणकट बांध्याला आणि लठ्ठपणाला बंधन न मानता अॅशले हिरिरीने मॉडेलिंगच्या क्षेत्रात प्रवेश करती झाली. सुरुवातीला प्लस साइझ मॉडेल म्हणून ठरावीक डिझायनरचे ठरलेले फॅशन शो तिने केलं आणि प्लस साइझसाठी प्रसिद्ध ब्रँडसाठीच मॉडेलिंग केलं. पण यंदाच्या सीझनमध्ये बडय़ा फॅशन शोच्या मुख्य प्रवाहात ती मॉडेल म्हणून अवतरली आणि हिट झाली. तिच्याकडे अनेक मोठय़ा फॅशनेबल ब्रॅण्ड्सची काँट्रॅक्ट्स आहेत आणि मुख्य प्रवाहातली यशस्वी मॉडेल म्हणून अॅशलेकडे बघितलं जातंय.

शँटेल ब्राऊन यंग
शँटेल ही मूळची कॅनडाची. ही १९ वर्षीय युवती सध्या अमेरिकेची सुपरमॉडेल बनण्याच्या दिशेने प्रवास करतेय. तिच्या शरीरावर कोडाचे डाग आहेत. तिलाही सुरुवातीला आपल्याला आपण या कोडामुळे विद्रूप दिसतो, असं वाटून प्रचंड नैराश्य आलं होतं. पण याच वेगळ्या वर्णाचा अभिमान बाळगत तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला. मी कुठल्याही प्रकारच्या ठरावीक वर्णाच्या चौकटीत बसत नाही. माझं सौंदर्य एकमेवाद्वितीय आहे, असं म्हणत शँटेल रॅम्पवर अवतरली. जगातील मोठमोठय़ा ब्रँडची मॉडेलिंग काँट्रॅक्ट्स शँटेलनं खिशात घातली आहेत.

 

 

 

 

मँडेलीन स्टुअर्ट
मँडेलीन ही १८ वर्षांची युवती डाऊन सिंड्रोम या आजाराने पीडित आहे. लहानपणापासून ‘स्पेशल चाइल्ड’ म्हणून वाढलेल्या मँडेलीनचा रॅम्पवरचा प्रवेश अनेकांना आश्चर्यकारक वाटला. न्यूयॉर्क फॅशन वीकच्या गेल्या सीझनमध्ये मँडेलीन रॅम्पवर आली तेव्हा तिला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं. सर्वसामान्य मुलींसारखा करिअर चॉइस आपल्यालाही मिळावा, या हेतूने मँडेलीन मॉडेलिंगच्या क्षेत्रात आली. गेल्या महिन्यात झालेल्या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये पुन्हा एकदा मँडेलीनने मोठय़ा डिझायनरसाठी रॅम्पवॉक केलं.

 

 
हरनाम कौर
गेल्या काही महिन्यांपासून हरनाम कौर हे नाव सोशल मीडिया गाजवत आहे. ब्रिटनमधील या भारतीय वंशाच्या मुलीने केलेल्या वेडिंग फोटोशूट्समुळे हे नाव जगभर पोहोचलं. हरनाम अकरा वर्षांची होती तेव्हापासूनच पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोममुळे स्त्री असूनही तिच्या शरीरावर पुरुषांप्रमाणे केस उगवायला लागले. सुरुवातीला लाज, वैशम्य, राग, निराशा अशा सगळ्या भावनांतून गेल्यावर आता हरनाम शेव्ह करत नाही. चेहऱ्यावरचे अनावश्यक केस हे काही स्त्रीच्या सौंदर्यात बाधा आणत नाहीत. मी आहे, तशीच सुंदर आहे, असं म्हणत हरनामने काही फोटोशूट्स केली. तिने नुकताच लंडनमध्ये तिचा पहिला रॅम्प वॉकही केला आहे.

 

 

 

( संकलन – प्राची परांजपे, मृणाल भगत)