वेदवती चिपळूणकर

संपूर्ण फॅशन इंडस्ट्रीमध्ये साधारण दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत मेन्स फॅशन हा विशेष चर्चेचा विषय नव्हता. फॅ शनडिझायनर्सही केवळ वूमन्स फॅशनवर सगळं लक्ष केंद्रित करायचे. मेन्स फॅशनकडे लक्ष न दिलं जाण्याचं मुख्य कारण म्हणजे पुरुषांनी वापरायच्या टेक्स्टाइल आणि रंगांबद्दल असलेले स्टिरिओटाइप्स! पुरुषांच्या कपडय़ात काय व्हरायटी असते, असं पुलंनीही ‘असा मी असामी’मध्ये म्हटलं होतं. पुरुषांचे रंग, त्यांच्या कपडय़ावरची प्रिंट्स, डिझाइन्स आणि मुळात म्हणजे त्यांनी घालायचे कपडे, अर्थात पँट-शर्ट. जास्तीत जास्त जॅकेट, सूट किंवा थेट भारतीय पारंपरिक पोशाख! पायात कोल्हापुरी जोडे, शूज किंवा फार फार तर फ्लोटर्स! या सगळ्यात त्यांनी कोणते रंग वापरायचे हेही ठरलेलं होतं. त्यामुळे कदाचित मेन्स फॅशन काहीशी दुर्लक्षित राहिली असावी. हळूहळू हे चित्र बदललं आणि मेन्स फॅशनही ‘लाइमलाइट’मध्ये यायला लागली.

मेन्स फॅशनहे बाळ तसं लहान असलं तरी त्या एवढय़ाशा प्रवासातही त्याने खूप गतिशील बदल पाहिले. ज्याला पुरुषी किंवा ‘मॅनली’ म्हणता येईल अशी डिझाइन्स पाहून झाल्यानंतर आता हळूहळू फॅशनच्या स्टिरिओटाइप्समधून बाहेर पडून पुरुषांसाठीही काहीसे हलके रंग आणि वेगळी प्रिंट्स यांचा प्रयोग व्हायला लागला आहे. केवळ परदेशातच नाही तर भारतातही केवळ मेन्स फॅशनवर काम करणारे डिझायनर्स आहेत ज्यातलं एक नाव अजय कुमार. बहुतांशी वेळा मेन्स फॅशनकिंवा काहीवेळा ‘युनिसेक्स’ फॅशनवर काम करून अनेक रनवे त्याने गाजवले आहेत. २०१७च्या लक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिव सीझन’मध्ये अजय कुमारने त्याच्या सगळ्या मेन्स वेअरचा मूळ रंग हा पांढरा घेऊ न त्यावर फ्लोरल प्रिंट्स केली होती ‘लॅ आणि काही डिझाइन्स पेस्टल शेड्सवर होती. त्याच्या शोमध्ये मेल मॉडेल्सनी घातलेले शूजही आऊ टफिटला मॅच होतील अशा हलक्या रंगाचे मात्र प्युअर लेदरवर फ्लोरल प्रिंट्स असलेले होते. पुरुषांचे कपडे स्टिरिओटाइप करायचे नाहीत हा ट्रेण्ड अशा मोठय़ा फॅशनवीक्समध्ये गेल्या वर्षीही दिसून आला.

नुकत्याच पार पडलेल्या ‘डिऑर’च्या पॅरिस येथील फॅशन शोमध्ये किम जोन्स या डिझायनरने मेन्स फॅशनमध्ये फ्लोरल डिझाइन्स आणि पेस्टल शेड्सचा उत्तम मेळ साधला. पेस्टल ब्लू आणि पेस्टल पिंक हे दोन रंग त्याच्या डिझाइन्समध्ये सर्वाधिक प्रमाणात दिसून आले. सी-थ्रू फॅ ब्रिकचे रेनकोट्स आणि त्यावरही फ्लोरल प्रिंट असं हटके कॉम्बिनेशन जोन्सने या शोमध्ये डिस्प्ले केलं. सन २००० पासून ‘रॉक-एन-रोल’ म्हणून प्रचलित असलेली मेन्स फॅ शनची दिशा किम जोन्सने शार्प आणि स्लिम कट आऊ टफिट्स वापरून पूर्णत: बदलून टाकली. अ‍ॅक्सेसरीजमध्येही जोन्सने वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला. नेहमीच्या ‘मॅनली’ धाटणीत न बसणाऱ्या मात्र स्ट्रीट फॅशनया त्याच्या थीमला साजेशा अशा सॅडल बॅग्ज घेऊ न किंवा आऊ टफिटला पाठीवर बॅकपॅकसारखी सॅडल पॉकेट्स देऊन किम जोन्सने ‘डिऑर’च्या फॅशन शोमधल्या परंपरा बदलल्याचं दिसून येतं. निसर्गप्रेम आणि स्वत: क्रिश्चन डिऑरची डिझाइन्स ही या कलेक्शनची इन्स्पिरेशन्स असल्याचं किम जोन्सने सांगितलं.

नेहमीच्या गडद रंगामध्ये अडकून न पडता मेन्स फॅशनमध्ये वेगळे प्रयोग करणाऱ्या अशा डिझायनर्सचं इंडस्ट्री आणि मीडियाने नेहमीच स्वागत केलं आहे. मेन्स फॅशनहाही लक्ष देण्याचा विषय आहे हे हळूहळू भारतातल्याही फॅशन इंडस्ट्रीला पटू लागलंय. मेन्स फॅशनमध्ये बदल करण्यासाठी आणि स्टिरिओटाइप्स मोडून नवनवीन गोष्टी ‘ट्राय’ करण्यासाठी अनेक डिझायनर्स प्रयत्न करत आहेत.

viva@expressindia.com