वेदवती चिपळूणकर
‘धाकड’चा शब्दश: अर्थ पाहिला तर अशी व्यक्ती जिला पाहून समोरच्या माणसाला धडकी भरते. ही धाकड व्यक्ती केवळ दिसायलाच धाकड नसते तर वागायलाही धडाकेबाज असते. शब्दाचा अर्थ तसा ‘जेंडर न्यूट्रल’ असला तरी धाकड हे विशेषण खासकरून मुलींसाठी वापरलं जातं. अंगावर आलेल्या प्रत्येक संकटाला ‘शिंगावर’ घेण्याची त्यांची वृत्ती असते. केवळ छेड काढणाऱ्या एखाद्याच्या कानाखाली मारलं म्हणजे ती मुलगी धाकड असते असं नव्हे; तर काही वेळा स्वत:च्या मतांवर ठाम राहत, पण इतरांच्या मताच्या विरोधात जाऊन वागणाऱ्या मुलीही ‘धाकड’च म्हणवल्या जातात.
या शब्दाचा उगम पाहायला गेलं तर तसा तो हिंदी भाषेत सापडतो. मात्र एरवी कदाचित तरुण पिढीला फारसा ज्ञात झाला नसता असा हा शब्द आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाने तरुणाईच्या डोक्यात फिट केला. त्यातलं गाणं आणि ‘धाकड’ हा शब्द इतका पॉप्युलर झाला की त्यानंतर ‘धाकड चॅलेंज’ही सोशल मीडियावर गाजलं. स्वत:च्या ‘धाकड’ अवतारातला फोटो फेसबुकवर पोस्ट करून अनेकींनी या चॅलेंजमध्ये भाग घेतला होता. चॅलेंज एखाद्या विशिष्ट ब्रँडचं असलं तरी त्यानिमित्ताने अनेक मुलींचे ‘टॉमबॉय’ असलेले आणि अनेक मुलींचे ‘फेमिनिटी’ जपूनही धाकड असणारे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्या फोटोंचं आणि मुलींच्या हिमतीचं सोशल मीडियामध्ये भरपूर कौतुकही झालं. पण हे सगळं कौतुक तेवढय़ापुरतं राहिलं की ते खरंच कोणाला प्रेरणादायी ठरलं याबद्दल साशंकता आहे. अर्थात त्यामुळे धाकड हा शब्द तरुणाईच्या शब्दकोशात दाखल झाला आणि धाकड वृत्ती स्वत:त बाणवणं हे मुलींना महत्त्वाचं वाटू लागलं.
धाकड हा शब्द जरी जुनाच असला तरी आताच्या तरुणाईने त्याला पुन्हा खऱ्या अर्थाने जिवंत केला आहे. काळानुसार मुलींना धडाडीने काम करण्याची आणि सगळ्याला सामोरं जायची तयारी ठेवणं भाग आहे. ते ‘स्पिरिट’ आमिर खानच्या गाण्याने सगळ्यांमध्ये जागवलं. सगळी बंधनं झुगारून देणारी आणि सगळ्यांना ताठ मानेने सामोरी जाणारी वृत्ती ‘धाकड’ या एका शब्दातच सामावलेली आहे. म्हणूनच कदाचित तो तरुणाईला चटकन भावला.
viva@expressindia.com