‘गुगल’इतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले ‘वॉच’लेले काही कण अर्थात काही ‘मस्ट वॉच’ व्हिडीओ.
पर्यटनावर जगभरामध्ये अनेक पुस्तके आहेत. दर महिन्याला लोनली प्लॅनेट आणि नॅशनल जिऑग्राफीदेखील मासिकांद्वारे सचित्र पर्यटनस्थळांची माहिती देते. पण या पर्यटन लिखाणाला मुख्य धारेत आणणाऱ्या मूठभर लेखकांपैकी एक नाव आहे पॉल थेरॉक्स यांचे. हे नाव कथा-कादंबऱ्यांमध्ये नंतर लोकप्रिय झाले असले, तरी त्यांच्यात हाडाचा पर्यटन पत्रकार जिवंत आहे. ‘द ग्रेट रेल्वे बझार : बाय ट्रेन थ्रू द एशिया’ या नावाचा त्यांचा १९७५ सालातील ग्रंथ पर्यटनविषयक लिखाणाकडे गांभीर्याने पाहणारा म्हणून नावाजला गेला. लंडन ते मध्यपूर्व, तेथून भारत आणि दक्षिण आशियातील रेल्वे प्रवासाच्या गमतीशीर नोंदींनी हा ग्रंथ सजला आहे. त्याची दखल इतकी घेतली गेली की त्यानंतर रेल्वेद्वारे जगभर पर्यटनाचे वेड घेतलेली कैक माणसे युरोप-अमेरिकेत तयार होऊ लागली. आपल्या ट्रेन पर्यटनाच्या नोंदींची पुस्तके हौशी-गवशी पर्यटक काढू लागले. पोर्टेबल कॅमेरा हाती वागविण्याची सोय झाल्यानंतर ट्रेन पर्यटक हे प्रवासाच्या दृश्यनोंदी वागवणे पसंत करू लागले. दोन हजारोत्तर सालात या नोंदी यूटय़ूबवर प्रकाशित करण्याकडे कल वाढला. ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन अमेरिकेतील पर्यटन टीव्ही वाहिन्यांनी ट्रेन सफरीवर मालिका, वृत्तांत आणि लघुपट तयार करण्यास सुरुवात केली. त्यांचाही सुळसुळाट गेल्या काही वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणावर झाला. भारतीय रेल्वे ही जगामध्ये लांबीने चौथ्या क्रमांकाची रेल्वे मानली जाते (पहिले तीन अनुक्रमे अमेरिका, रशिया आणि चीन). आपण मुंबई-पुण्याहून उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे जाणाऱ्या दोन-तीन दिवसांच्या रेल्वे प्रवास करणाऱ्या व्यक्तींबाबत आश्चर्य व्यक्त करतो. त्याहून मोठे प्रवास जगभरातील रेल्वेमध्ये केले जातात. प्रत्येक रेल्वे प्रवासात दिसणारे जग, बदलणारे वातावरणाचे रंग यांचे नवनवे सचित्र दाखले कॅमेऱ्याने पकडलेले आढळतात. काही रेल्वेमार्ग देखण्या निसर्गाची उधळण करताना दिसतात. तर काही ठिकाणी चमत्कृतीपूर्ण अर्थव्यवहार होताना दिसतात. थायलंडची मॅकलाँग रेल्वे अशाच प्रकारची आहे. या रेल्वेच्या रुळांवर चक्क भाजी बाजार भरतो. रेल्वे येण्याआधी दोन तीन मिनिटे सर्व विक्रेते आणि खरेदीदार सावध होतात. रेल्वेला मोकळी वाट करून देतात आणि रेल्वे गेली की दुकानाच्या छतापासून सारे पूर्ववत होते. श्रीलंकेच्या रेल्वेलाही भारतासारखेच ब्रिटिशांनी घडविले. भारतीय शहरांतील लोकल सेवेसारखी भरगच्च आणि लाखोंचा लवाजमा घेऊन जाणारी ही रेल्वे आणि तिचा लांबलचक प्रवास पाहताना भारतीय रेल्वेतील अनेक अनुभवांची आठवण येईल. तिकीट काढणाऱ्यांपासून ते तिकीट तपासणाऱ्यांपर्यंत अनेकांच्या घेतलेल्या या व्हिडीओमधील मुलाखतींमधील भारतीय साम्यही पाहता येऊ शकेल.
जगभरात पावसाळ्यामध्ये सखल भागांत पाणी साचते आणि रेल्वेमार्ग तुंबतात. देशोदेशी तुंबलेल्या पाण्यातून मार्गक्रमणा करणाऱ्या रेल्वेचे व्हिडीओही पाहायला मिळतात. त्यात मुंबईची जीवनवाहिनीही पाहायला मिळते. जगातील सर्वात सुरक्षित आणि चांगला प्रवास देणारे मात्र आर्थिक अडचणींमुळे वाईटोत्तम झालेले रेल्वेमार्गही पाहायला मिळू शकतात. नागमोडी रुळांवरून आचके घेत जाणाऱ्या रेल्वेतील प्रवासी किती सहनशील असू शकतील याचा विचारच करता येत नाही. जगातील सर्वात वेगवान ट्रेन पापणी बंद होण्याच्या आत किती अंतर कापू शकते, याचा अंदाज येऊ शकेल. मानवी कौशल्याने विविध नैसर्गिक अडचणींवर मात करून रेल्वेमार्ग तयार केले. अत्यंत दुर्गम प्रदेशातील रेल्वेमार्ग पाहिले तर थक्क होऊन जाल. आपल्याला रेल्वे प्रवासात खिडकीतून दिसणारा दृश्यपट ही आपल्यासाठी आयुष्यात एकदाच घडणारी गोष्ट असते. तो मनात जपून ठेवायचा, लिहून मांडायचा की व्हिडीओद्वारे सादर करायचा हे या व्हिडीओजवरून लक्षात येईल.
viva@expressindia.com