आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा प्रयत्न.
दिवस फराळाचे आहेत. घरोघरी भाजल्या जाणाऱ्या बेसनाचे, खमंग भाजणीचे, तुपकट- तेलकट घमघमाटाचे आहेत. तयार फराळाचे बाजारातील आगमन वगैरे काही म्हणा, पण आजही दिवाळी येण्याआधी हा फराळगंध घराघरांतून येतोच. फराळाची संकल्पना नेमकी का व कधीपासून अस्तित्वात आली, असले प्रश्न चकलीच्या वेटोळ्यात गुरफटलेल्या, अनारशांच्या तुपकटपणात हरवलेल्या मनाला पडत नाहीत. तरीही त्याचा शोध घेण्याचा छोटासा प्रयत्न करू या.
दिवाळी आणि फराळ यांचा शेतीप्रधानतेशी जवळचा संबंध आहे. दिवाळी नेमक्या अशा टप्प्यावर येते, जिथे शेतकऱ्याने राबून केलेल्या कष्टाचं फळ धान्यरूपातून घरी येत असतं. पर्जन्यकाळात देहभान विसरून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला थोडं गोडधोड खाऊन विश्रांत आनंद साजरा करण्याचा पूर्ण अधिकार निश्चितच असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविध प्रकारची धान्यं गोडाधोडासाठी त्याच्या हातात असतात. त्यामुळे थकलेल्या शरीराला काही पौष्टिक द्यावं, येणाऱ्या थंडीसाठी शरीरात स्निग्धता साठवावी या हेतूने दीपावलीशी फराळ जोडला गेला आहे. याव्यतिरिक्त उपनिषद काळात पिकं तयार झाल्यावर करायच्या ‘पाकयज्ञ’ नामक संकल्पनेचा उल्लेख आढळतो. नव्या धान्याची खीर, नव्या भाताचे पोहे, पोह्य़ाचाच गोड पदार्थ या यज्ञासाठी बनवला जाई. आजही कोकणात दिवाळीच्या पहिल्या दिवशी, ‘चावदिवसाला’, घरोघरी गूळपोहे का बनवले जातात त्याचा संबंध यातून उलगडतो. मात्र फराळ म्हणून आपण जे पदार्थ तयार करतो त्यांचा उल्लेख तुलनेने खूप अलीकडच्या काळातला आहे. ११ व्या शतकात जगप्रवासी आल्बेरुनी याने दिवाळी उत्सवाचं वर्णन केलं आहे. या काळात अपूप (घारगे), शालिपूप (अनारसे), शंखपाल (शंकरपाळी), शष्कुली (करंजी किंवा वडी), चणकपुरिका (बेसनाच्या तिखट पुऱ्या), चक्रीका (चकली) यांचा उल्लेख होतो. आज चिवडा, चकली, शंकरपाळी, करंजी, लाडू याशिवाय दिवाळीची कल्पनाच करता येत नाही.
यातल्या चिवडय़ाचा विचार करता यजुर्वेदात तांदळाच्या पाच जाती सांगितल्या आहेत. याच काळात पोहे बनवण्याची तसेच पोह्य़ापासून बनवलेल्या ‘प्रधुक’ नामक पदार्थाची कृतीही आढळते. हा ‘प्रधुक’ म्हणजे चिवडय़ाचा पूर्वज.
गुप्तवंशानंतरच्या काळात चिरोटय़ासारख्या एका पदार्थाला ‘पत्रिका’ म्हटलं आहे. मात्र या साऱ्या पदार्थात धान्यं व त्यांच्या डाळींचाच उल्लेख येतो. १९व्या शतकात पाश्चात्त्य देशांत साखर व मैद्याचा सुकाळ झाल्यावर भारतस्वारीवर आलेल्या युरोपियनांमुळे आपण फराळातल्या अनेक पदार्थात त्यांचा वापर करू लागलो. पदार्थ बनवण्यातल्या सुलभतेमुळे हा वापर दिवसेंदिवस वाढतच गेला.
चकली भारतभरात प्रिय आहे. काही ठिकाणी ती चकुली, काही ठिकाणी चकरी, तर दक्षिण भारतात ती मुरुक्कूआहे. हे काटेरी वेटोळे त्याच्या चक्राकार रूपामुळे चकली ठरले. फराळातील शुभशकुनी करंजी भारतभरात गुजिया असली तरी बिहारमध्ये पुरुकिया किंवा पेडकिया म्हणून ओळखली जाते. गुजरातमध्ये ती घुघरा होते. कोकण व गोव्यात नेवऱ्या म्हणून नाव मिळवते, तर ‘सीकेपीं’च्या घरात कानवले म्हणून मिरवते.
शंकरपाळीत शंभू महादेव कसे प्रगटले, हा प्रश्न लहानपणापासून सतावत राहतो. पण शंखपालचा शंकरपाळी अपभ्रंश झाल्याने हा चमत्कार घडतो. महाराष्ट्राबाहेर ही शंकरपाळी शक्करपारा म्हणून भाव खाते. अनारसे या शब्दाचा लहानपणापासून फटाक्यातल्या अनारशी उगाचच बादरायण संबंध जुळतो. अनारसे म्हणजे येरागबाळ्याचं काम नोहे! त्यामुळे सगळ्याच घरांत अनारसे होत नाहीत. खास सुगरणीच त्यासाठी पदर खोचतात. शिवाय हा काही लाडू वा चकलीसारखा एका दिवसाच्या तयारीचा पदार्थ नाही. साधारणपणे दोन बाजूबाजूच्या राज्यांत एखादा पदार्थ सारखाच प्रसिद्ध असतो, पण अनारशांसाठी ओळखली जाणारी राज्यं म्हणजे बिहार व महाराष्ट्र. एक उत्तर भारतात तर दुसरे दुसऱ्या टोकाला. महाराष्ट्रातून हा पाहुणा तिथे गेला की बिहारमधून इथे आला, पत्ता लागत नाही. सध्या विविध साधनांनी सारं जगच जवळ आलंय. सर्व पदार्थ सगळीकडे मिळू लागले आहेत. तरीही प्रत्येक प्रांत दीपावलीच्या पदार्थाची खासियत जपून आहे.
फलाहार या शब्दाचा अपभ्रंश असलेल्या फराळात फळांचा पत्ता नसला तरी लाडू, चकली, चिवडा, करंजी हे पदार्थ मात्र फराळात बहार आणतात. शेतकऱ्यांसाठी गोडधोड किंवा येणाऱ्या थंडीची सोय हा या फराळामागचा मूळ हेतू कितपत उरलाय, हा प्रश्नच आहे. सणाच्या निमित्ताने जिभेचे चोचले मात्र या फराळातून छान पुरवले जातात.
फराळाचं पण एक समीकरण आहे. घरोघरी फराळ तयार होताना त्या सुगंधामुळे कधी एकदा चकलीचा तुकडा मोडतोय, लाडवाचा घास घेतोय असं होऊन जातं. दिवाळीत घरोघरी फराळाचीच ताटं समोर आली की मात्र अतिपरिचयात अवज्ञा होते. फराळ नको हो! असा अजिजीचा सूर लागतो. दिवाळी संपताच डब्यातला चिवडा, चकली, लाडू जसे तळ गाठू लागतात, आपल्याला पुन्हा फराळाचे डोहाळे लागतात. फराळातला प्रत्येक पदार्थ म्हणजे चैन आहे. चकलीचा स्वभाव काटेरी पण खमंग, करंजी सारणगोड तुडुंबपणा दाखवणारी, शेव चटकदार तर शंकरपाळी खुसखुशीत. ही सारी वैशिष्टय़े नको नको म्हणत असताना आपल्याला स्वत:कडे खेचून नेतात. कशाला हो? कोण खाणाराय इतकं? असं म्हणता म्हणता संपलेल्या चिवडय़ाचा शेवटचा खारट चुरा बोटाच्या तळावर दाबत मुखात सरकतो.
एखाद्या नांदत्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य हरहुन्नरी असतो. त्याची स्वत:ची ओळख असते. पण कुटुंबात आल्यावर तो स्वपणा बाजूला ठेवून कुटुंबातला एक होतो.. तसंच या चकली, चिवडा, करंजी, लाडवाचं आहे. दिवाळीत ते फराळ म्हणून एक होत आपल्याला खाऊगिरीचा पुरेपूर आनंद देतात. दिवाळीनंतर जिममध्ये जायला हवं बुवा! अशी स्वत:चीच समजूत काढत दरवर्षी तितक्याच प्रेमाने आपण फराळ फस्त करीत राहतो. फराळाशिवाय दिवाळी हे समीकरण जुळतच नाही. दिवाळी म्हणजे अपार आनंदाचा सण आणि त्यातला काहीसा गोड, काहीसा तिखट व बराचसा खुसखुशीत ठेवा म्हणजे फराळ!!!.. त्यामुळे आपणा सर्वाना दीपावलीच्या खमंग शुभेच्छा!