मार्च महिना सुरू होतो, तोच रंगोत्सवाने. अं..अं.. इथे होळीचा संबंध नाही. हा निसर्गाचा रंगोत्सव. वसंत ऋतू सुरू झालेला असतो, त्यामुळे नवीन फुटणारी पालवी, वेगवेगळी फुलं, फळं यांचं रंबीबेरंगी विश्व तापणाऱ्या उन्हातही सुखावणारं असतं. पण या सगळ्या रंगोत्सवाचा आनंद लुटायला सोडाच, त्याकडे बघायलाही आम्हाला मुळीच वेळ नसतो. का? का म्हणजे काय? एकीकडे ऑफिसेस्मध्ये फायनान्शिअल इअर एंडिगची गडबड आणि दुसरीकडे आमच्या परीक्षांची टाइमटेबल्स लागतात.

टाइमटेबल परीक्षेचं असलं, तरी ते ऑलिम्पिकचं असल्यासारखे वेगवेगळे खेळ सुरू होतात. दहावीची परीक्षा तर सुरू झालीच. कॉलेजच्या परीक्षाही जवळ आल्या. कॉलेज परीक्षेसाठी आधी नोट्स जमवणं, परीक्षेच्या टाइमटेबलनुसार अभ्यासाचं टाइमटेबल आखायचं, प्रॅक्टिकल्स, सबमिशन्स, जागरणं हे मॅनेज करत धावायचे असतंच, शिवाय वर्षभराचा अभ्यास काही दिवसांत पूर्ण करण्यासाठी लांब उडीही मारायची असते. आमची उडी उंचच असावी अशी पालकांची अपेक्षाही पूर्ण करायची असते. नेमही असतोच इथे. शूटिंगचा नाही..अभ्यासाचा. जो नुसता धरून चालत नाही, पाळावाही लागतो. मग अर्थातच येतो स्ट्रेस, टेन्शन- न बोलावता! असं म्हटलं, की आईचा हमखास डायलॉग येतो, ‘तो येऊ नये यासाठी वर्षभर प्रयत्न केले असते, तर नसता आला तो. या आयत्या वेळच्या धावपळीने आजारी पडलीस तर तो स्ट्रेस आमच्याही डोक्यावर येईन बसेल.’ ही धावपळ दरवर्षीची, आणि आईचं बोलणंही दर वर्षीचंच. तरी वर्षांनुवर्ष तेच घडत राहतं, उलट नाही घडलं, तरच चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. वर्षभर अगदी नियोजनपूर्वक अभ्यास केला, तरी स्ट्रेस हा येतोच.

‘परीक्षेच्या काळात स्ट्रेस येणं स्वाभाविक आहे. स्ट्रेसचे दोन प्रकार असतात. युस्ट्रेस आणि डिस्ट्रेस. सोप्या भाषेत सांगायचं, तर युस्ट्रेस म्हणजे चांगला स्ट्रेस, ज्यामुळे ताण असला तरी आपण चांगली कामगिरी बजावतो. डिस्ट्रेस म्हणजे, ज्यामुळे आपल्याला त्रास होतो. या ताण आणि त्रासाचं त्याच वेळी नियोजन आणि निर्मूलन करायला हवं’, असं क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट प्रज्ञा माने सांगतात.

प्रत्येकाची अभ्यास करण्याची स्वत:चा पद्धत असते. त्यामुळे कमी वेळ अभ्यास करूनही मैत्रिण जास्त मार्क्‍स मिळवते आणि मला खूप वेळ अभ्यास करूनही कमी मार्क्‍स मिळतात अशी तुलना करू नये. त्यामुळे आपल्या ताणात भरंच पडते. परीक्षेदरम्यान येणाऱ्या ताणामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक बदल घडतात. अति झोप किंवा झोप अजिबात न येणे, सतत खात राहणे किंवा भूक न लागणे असे टोकाचे बदल होतात. पण अशा ताणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येकाच्या आपापल्या काही युक्त्या असतात. आवडतं संगीत ऐकणं, मेडिटेशन करणं, प्राणायाम करणं हे ताण हलका करण्यासाठी केले जाणारे कॉमन उपाय आहेत. हॉस्टेलवर राहणारे विद्यार्थी ताण हलका व्हावा म्हणून काही काळ घरी रहायला जातात किंवा कुटुंबीयांच्या संपर्कात तरी राहतात.

टॉपर असलेला शुभम निफाडकर स्वत:च्या आधीच्या मार्कशीट्स बघतो, ते मार्क्‍स बघून त्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि अभ्यास करण्यासाठी आणखी ऊर्जा मिळते, आणि आलेला ताण निघून जातो.
थोडा वेळ अभ्यासातून ब्रेक घेऊन गाणी ऐकणे किंवा चित्रं काढणे अशा मला आवडणाऱ्या गोष्टी मी करते आणि चॉकलेट खाते, त्यामुळे माझा ताण हलका होतो असं नम्रता योगी सांगते.

प्रियांका साळगांवकर म्हणते, अभ्यास करताना मी छोटा ब्रेक घेते तेव्हा मित्रमैत्रिणींशी गप्पा मारते. मित्रमैत्रिणी हे अल्टिमेट स्ट्रेस बस्टर्स असतात.

आपला ताण हलका करणाऱ्या या छोटय़ा छोटय़ा गोष्टी अनुभवातून कळत जातात. मित्रमैत्रिणींनी सांगितलेले उपाय उपयोगी पडतीलच असं नाही. कदाचित त्यामुळे एकाग्रता कमी होऊ शकते, लक्ष विचलित होऊ शकतं. म्हणून हा तणाव नियंत्रित करण्यासाठी स्वत:च्या क्षमता आणि आवडी ओळखून उपाय योजणं महत्त्वाचं आहे. स्ट्रेस असणं ही काही चुकीची किंवा गंभीर बाब नाही. पण प्रज्ञाने सांगितल्याप्रमाणे तो युस्ट्रेस असायला हवा, सकारात्मकता, ऊर्जा देणारा. जो असणं गरजेचं आहे, त्यामुळेच आपल्याकडून चांगले रिझल्ट्स मिळू शकतात. अशा पॉझिटिव रिझल्ट्स साठी, स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी आणि अर्थातच परीक्षेसाठीही ऑल दी बेस्ट!
(या लेखासाठी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट प्रज्ञा माने यांच्याकडून माहिती मिळाली.)

युस्ट्रेस आणि डिस्ट्रेस बॅलन्ससाठी काही टिप्स

  •  प्रत्येक पेपरपूर्वी किती सुट्टय़ा आहेत हे बघून अभ्यासाचं नियोजन करावं, प्रत्येक दिवसासाठी स्वतंत्र टाइमटेबल बनवावं.
  • दिवसातला किमान अर्धा तास शारीरिक व्यायामासाठी ठेवावा.
  • अभ्यासाच्या मधल्या वेळात गाणी ऐकावीत, आवडणाऱ्या किंवा मोटिव्हेशनल गाण्यांची स्वतंत्र प्लेलिस्ट बनवावी.
  • किमान सहा तास झोप घ्यायलाच हवी.
  • मित्रमैत्रिणींशी तुलना न करता अभ्यासाची स्वत:ची शैली असू द्यावी, पालकांनीही अपेक्षांचं ओझं मुलांवर लादू नये.
  • दीर्घ श्वसनासारखे व्यायाम करावेत.
  • परीक्षेच्या काळात अनेकांना कॉफी पिण्याची सवय असते, पण त्यामुळे अस्वस्थता वाढते. म्हणून त्याऐवजी डार्क चॉकलेटचा तुकडा चघळावा.

Story img Loader