स्वप्नील घंगाळे viva@expressindia.com
दिवसभरात फेसबुक न्यूज फीडमध्ये मेमरीज पोस्ट पाहिली नाही असे फेसबुक यूझर्स सापडणे मुश्कील झाले आहे. आता काही जण या मेमरीज शेअर करतात तर काहींना मात्र या मेमरीजचा त्रास होऊ लागला आहे. एकीकडे जे आनंदी क्षण डिजिटली शेअर केलेत त्या व्यक्तींपासून एकतर दुरावलोत किंवा ते प्रसंग कमालीचे दु:खदायी ठरले आहेत. मनातून त्या व्यक्ती, त्या आठवणी मायनस केल्या असल्या तरी डिजिटली पक्क्या झालेल्या या आठवणी काही पुढे जाऊ देत नाही राव.. अशी अनेकांची अवस्था झालीये.
‘आज पुन्हा का रे तू असा तोंड पाडून बसलाय?’ ‘अरे काही नाही नेहमीचंच ते फेसबुक मेमरीज. त्या नात्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय तर हा झुक्या पुन्हा तिथेच नेऊन ठेवतोय मला. कंटाळा आलाय मला हे इग्नोर करायचा पण. असं वाटतं तेव्हाच हे चेकइन्स आणि टॅगिंग केले नसते तर परवडलं असतं. काही सोल्यूशन आहे का?’, अगदी वैतागतच विचारलेल्या या प्रश्नाला मित्राने उपाय सुचवला, पण तो केवळ तिला ब्लॉक करण्याचा जे आधीच करून झालं होतं. कॉलेजचा नाका, व्हॉट्सअॅप चॅट किंवा चहाच्या टपरीवरच्या गप्पा या सगळीकडे हे असल्या प्रकारचे आठवणींनी त्रस्त लोक सध्या दिसू लागले आहेत. नाही तसं आठवणींनी त्रस्त लोक आधीपासूनच होते पण फेसबुकवरील मेमरीजच्या पर्यायामुळे या कडू-गोड (त्यात ब्रेकअप वगैरे असेल तर कडूच जास्त) आठवणींवरच्या खपल्या काढल्या जात आहेत. मात्र या चर्चा सध्या सुरू झाल्या असल्या तरी तांत्रिक भाषेत यालाच ‘डिजिटल फूटप्रिंट’ असे म्हणतात. म्हणजेच सोप्प्या भाषेत सांगायचं तर सोशल नेटवर्किंगवर एकदा लिहिलेला मजकूर पुन्हा कधीच मिटवता येत नाही असाच याचा अर्थ होतो.
आजच्या स्मार्टफोनच्या जगात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅट आणि अनेक वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून अनेक जण आपल्या नात्याबद्दल, प्रेमाबद्दल आणि जोडीदाराबद्दल जरा जास्तच सोशल झाल्याचे चित्र दिसते आहे. अनेक जोडपी तर एकमेकांबरोबरची प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. पण अशा जोडप्यांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण ब्रेकअपनंतर मानसिक ताणाबरोबर आता ब्रेकअपपूर्वीच्या या सोशल आठवणींमधून बाहेर येणे अनेकांना कठीण जात आहे. हा भूतकाळ अनेकांच्या मूव्हऑन झालेल्या आयुष्यात फेसबुक मेमरीजच्या रूपात पुन:पुन्हा डोकावून पाहतो आहे. बरं हे केवळ दोघांच्या नात्याबद्दलच नाही तर मित्रांच्या ग्रुपसाठीही लागू होतं. म्हणजे या गोष्टींचा पॅटर्नही आता ठरलेला आहे असं म्हणता येईल. तो आणि ती.. कॅ म्पसमध्ये प्रत्येकाला हेवा वाटावा असं त्यांचं नातं खुली किताबसारखं फेसबुकच्या माध्यमातून सर्वाच्याच ‘पब्लिक डोमेन’मध्ये दिसतं. अगदी वेगवेगळ्या साइट्सवरील लिंक्सवरील टॅगिंग असो, मिम्सवरील टॅगिंग असो किंवा हॉटेलमधले अनेक चेक इन्स, पिक्चर पाहायला गेल्याच्या पोस्ट्स, पिकनिकचे फोटो, वाढदिवसाला लिहिलेल्या प्रेमळ पोस्ट्स असं सगळं सगळं म्हणजे एकमेकांबरोबरचा प्रत्येक क्षण जणू ते सोशल करतात. पण अचानक काहीतरी फिसकटतं आणि त्यांचं ब्रेकअप होतं. पुढे प्रॅक्टिकल अॅप्रोच म्हणतं ते खऱ्याखुऱ्या आयुष्यात सावरतात, पण वर्षांनुवर्ष त्यांची डिजिटल प्रोफाइल त्यांना ही प्रकरणे विसरू देत नाही. हे असं होतं दोघांच्या नात्याचं तसंच काहीसं मित्रांच्या ग्रुपचंही होतं. आयुष्यातील एखाद्या विशिष्ट काळात काही ग्रुपबरोबर भरपूर भटकंती वगैरे होते. आणि अचानक काहीतरी फिसकटल्याने ग्रुप विखुरला जातो. त्यानंतर सुरू होते एकमेकांना इग्नोर करण्याची स्पर्धा. त्यात काही महिन्यांनी यश येतं तोच या फेसबुक मेमरीज पुन्हा शांत झालेल्या प्रकरणावर प्रकाश टाकतात आणि मग पुन्हा मानसिक त्रास ठरलेलाच. अनेकांना नाती संपल्यानंतर त्यांचा नात्यांमधील हा जगजाहीरपणा आता त्रासदायक वाटू लागला आहे. कारण कधी काळच्या गोड आठवणी काळानुसार आणि बदललेल्या नात्यानुसार नंतर कटू आठवणी बनून डिजिटल प्लॅटफॉर्मवर कायमच्या सेव्ह होतात. म्हणजे नात्यात किंवा मैत्रीतही मूव्हऑन झाल्यानंतर हा डिजिटल धागा तुम्हाला त्या व्यक्तींना कायमचे विसरू देत नाही. म्हणूनच आधीसारखं नुसत वेगळं होऊ न ‘हे नाही तर दुसरे कोणीतरी’ इतक्या सोप्प्या प्रकारे मूव्हऑन होणे डिजिटल युगात शक्य राहिलेले नाही. आपली आऊटडेटेड झालेली नाती आपल्या भूतकाळातील अपडेट्समधून क्लियर करता करता अनेकांना खूपच कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे.
डिजिटल फूटप्रिंट म्हणजे काय?
काळ्या दगडावरची रेघ असा वाक्प्रचार मराठीमध्ये न मिटवता येणारी गोष्ट किंवा दाखला या अर्थाने वापरला जातो. हाच वाक्प्रचार म्हणजे डिजिटल फूटप्रिंट असं म्हणता येईल. टेक्निकल भाषेत सांगायचे झाले तर इंटरनेटवर तुम्ही करत असलेली प्रत्येक अॅक्टिव्हिटी म्हणजे डिजिटल फूटप्रिंट. म्हणजे तुम्ही भेट दिलेल्या वेबसाइटपासून, तुम्ही इंटरनेटवर दिलेली खासगी माहिती आणि केलेले व्यवहार सर्व काही डिजिटल फूटप्रिंटचा भाग असते. सामान्य भाषेत सांगायचे तर इंटरनेटवर वाचलेला किंवा लिहिलेला प्रत्येक शब्द म्हणजे डिजिटल फूटप्रिंट.
सगळेच दु:खी नाहीत
एकीकडे काहींना या आठवणींचा त्रास होत असल्याचे दिसत असले तरी ‘जैसे थे’ असणारे अनेक जण या आठवणी पुन:पुन्हा शेअर करून सोशल नेटवर्किंगवर चांगलाच टाइमपास करताना दिसत आहेत. त्यातही खासकरून मित्रांचा एखादा ग्रुप असल्याच जुन्या टॅगिंग आणि चेकइन्स पुन्हा शेअर करून त्यावर घडून येणाऱ्या चर्चा दिवसभर पुरतील इतक्या रंगतात. म्हणूनच एकीकडे या आठवणी त्रासदायक ठरत आहेत तर दुसरीकडे याच स्ट्रेसबस्टर्सही ठरत आहेत असं म्हणता येईल.
काय कराल?
* आपण एखाद्या नात्याबद्दल किती गंभीर आहोत याचा दोघांनी एकदा विचार करा.
* तुमचं नातं किती सीरियस आहे. त्याचे भविष्य काय आहे याचा विचार करूनच ते सोशल नेटवर्किंगवर जगजाहीर करायचे की नाही ठरवा
* गरज असेल तरच एकमेकांबद्दल सोशल नेटवर्किंग साइट्सवर पोस्ट करा
* जोडीदाराच्या संमतीशिवाय त्याला एखाद्या पोस्टमध्ये टॅग करणे टाळा
* कितीही जवळची व्यक्ती असली तरी खासगी फोटो, महत्त्वाची माहिती कधीही डिजिटल माध्यमांवरून शेअर करू नका.
* एखादं नातं फिसकटलचं तर त्या व्यक्तीबरोबरच्या नको असलेल्या किंवा भविष्यात त्रासदायक ठरू शकतील अशा सगळ्या पोस्ट डीलीट करा. व्यक्तीच्या प्रोफाइलवर जाऊन ‘सी फ्रेण्डशिप’ पर्यायमध्ये जाऊ न तुम्हाला जुने टॅग्स डीलीट करता येतील.
* वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यानंतर तुमच्या जोडीदाराच्या किंवा मित्रमैत्रिणींच्या सोशल नेटवर्किंग अकाऊ ण्टवर नजर ठेवणे टाळा.
* मेसेजस, व्हॉट्सअॅप चॅट सर्व काही डीलीट करण्याचा पर्याय या नात्यांच्या गुंत्यातून बाहेर येण्यासाठी फायद्याचा ठरू शकतो
* डिजिटल आठवणींमध्ये अडकून राहण्याचे टाळण्यासाठी वर्तमानात स्मार्ट पद्धतीने वागा म्हणजे भविष्यात भूतकाळाचा त्रास होणार नाही.
आज आपल्याला अनेक जण फेसबुक मेमरीजच्या माध्यमातून त्यांचे काही वर्षांपूर्वीचे अपडेट्स पुन्हा शेअर करताना दिसतात. अनेक जण गमतीमध्ये या गोष्टी शेअर करत असले तरी सध्याच्या स्मार्टफोनच्या काळात सगळीकडेच डिजिटल फूटप्रिंट (डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेअर केलेली माहिती)चा प्रभाव वाढतो आहे हे लक्षात घेणेही गरजेचे आहे. लाइक आणि कमेन्टसाठी आपल्या खासगी गोष्टी किती सोशल करायचे हे ज्याचे त्याने ठरवायला हवे. आपण आपले आयुष्य किती सोशल करायचे या संदर्भातील मर्यादा प्रत्येकाने निश्चित करायला हव्यात. डिजिटल माध्यमातील आठवणींमधून बाहेर येण्यास हल्ली तरुणांना त्रास होत असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळेच ब्रेकअपनंतर पुढच्या नात्याबद्दल विचार करताना आधीच्या नात्यासंदर्भातील सर्व काही मोकळेपणे जोडीदाराला सांगायला हवे. डिजिटल माध्यमातून जोडीदाराला भूतकाळ कळल्यास नात्यांमध्ये कटुता येते. नातेसंबंधाव्यतिरिक्त नोकरीच्या ठिकाणीही तुमचे डिजिटल फूटप्रिंट तपासले जातात. अनेक कंपन्या आता डिजिटल माध्यमावर व्यक्तीचा वावर कसा आहे हे तपासतात. त्यामुळे आता डिजिटल अकाऊ ण्ट म्हणजे व्यक्तीची व्हर्च्युअल ओळख असते. म्हणूनच सोशल नेटवर्किंगवर वावरताना जपून पोस्ट करायला हव्यात. याचा खासगी तसेच व्यावहारिक जीवनातही बराच फायदा होतो.
– उन्मेश जोशी (रिस्पॉन्सिबल नेटिझम)