एमटीव्ही आणि व्ही चॅनल आले, तेव्हा शेकडो वाहिन्यांच्या जंजाळात भरकटलेल्या जगभरच्या तरुणाईच्या डोळ्यांना चॅनलस्थैर्य लाभले. या संगीत वाहिन्यांनी नुसतेच कान-नेत्रांना तृप्त केले नाही, तर त्याचबरोबर सांस्कृतिक उलथापालथ केली. दृक्श्राव्य संवेदनाक्षम पिढी तयार केली. पोशाखापासून वर्तणुकीपर्यंत तसेच जगण्याच्या स्मार्ट आणि कूल भाषाशैलीपर्यंत कित्येक गोष्टी एकेका पिढीपर्यंत रिचविल्या. तेव्हा आतासारख्या रिअॅलिटी शोच्या फेऱ्यात अडकल्या नसल्याने या वाहिन्या संपूर्णपणे पाश्चात्त्य सुगम संगीताची देवाण करीत होत्या. १९९६ ते २०००च्या कालावधीमध्ये या वाहिन्यांसमोर पडीक असलेल्या तरुणाईच्या संगीत शौकावर आधीची पिढी कितीही नाखूश असली, तरी प्रत्येकाने आपापली संगीत दैवते तयार केली होती. यातील बहुतांश तरुणाईला मायकेल जॅक्सनहून अधिक गन्स अॅण्ड रोजेस, ब्रायन अॅडम्स, एमटीव्हीवर चलती असलेले बिलबोर्ड याद्यांमधील ताजे हिट कलाकार आवडत असत. जेनिफर लोपाझ, रिकी मार्टिन, एनरिके इग्लेसियस यांच्यापाठोपाठ शकीरा लॅटिन अमेरिकी संगीताचा तडका घेऊन दाखल झाली. शब्दांऐवजी या गाण्यांचा ठेका, चाल यांना महत्त्व असल्याने या काळात मुंबई-पुण्यासह इतर शहरगावांतही विवाह, सार्वजनिक महोत्सव आणि पूजांमध्ये अचानक ‘ब्राझिल’, ‘सॅटरडे नाइट’ ही नृत्यगीते वाजू लागली. या काळातच एक ब्रिटिश कोरस गाणे संगणकावर एमपीथ्री जमविणाऱ्या भारतीय तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. ‘चुंबावंबा’ नावाचा म्युझिक बॅण्ड आजही ओळखला जातो तो त्यांच्या ‘टबथंपिंग’ (आय गेट नॉक्ड डाऊन) या एकमेव गाण्यासाठी. मुळात चुंबावंबा हे आफ्रिकी वाटणारे नाव धारण करणारे हे कलाकार कट्टर ब्रिटिश आहेत. गाण्याचे वैशिष्टय़ म्हणजे तुम्हाला शब्द कळाले नाहीत, तरी तुम्हाला त्यातल्या कोरसमधील रांगडा स्वर थिरकवून सोडतो. हे गाणे एकटय़ाने गायले गेले असते, तर ऐकताच येऊ शकत नाही, इतका जीव त्यात कोरसने भरला आहे. पार्टीमध्ये नृत्यासाठी या गाण्याचा जगभरात वापर झाला आहे. वीसेक वर्षे झाली तरी हे गाणे अजून तितकेच ताजे आहे. या बॅण्डने नंतर अनेक चांगली गाणी दिली. मात्र त्यांचे कोणतेही गाणे टबथंपिंगइतकी उंची गाठू शकले नाही. एकाच गाण्यातून सुपरस्टार तयार करणाऱ्या एमटीव्हीच्या याच काळात एन्या या आयरिश गायिकेचे ‘ऑरोनिको फ्लो’ हे गाणेही गाजत होते. एन्याचे संगीत स्वत:चे खास वैशिष्टय़ राखून असते, कारण तिच्या गाण्याचे मुद्रण आणि ध्वनीसंकलन करणाऱ्या चमूने आजतागायत तिच्याखेरीज कोणत्याही कलाकारांसोबत काम केले नाही. तिची प्रत्येक गाणी तिच्याच आवाजावर प्रक्रिया करून कोरसमध्ये ऐकू येतात. एकेका अल्बमवर सातेक वर्षे काम करून तिची गाणी दाखल होतात. ऑरोनिको फ्लो (सेल अवे) या गाण्याला ऐकल्यानंतरही कोरसमधील ताकदीची पूर्ण कल्पना येऊ शकेल. या गाण्याने मिळालेल्या जगभरातील लोकप्रियतेच्या आणि पैशांच्या बळावर या गायिकेने चक्क एक किल्ला विकत घेतला. टायटॅनिक या सिनेमात सुरुवातीला येणारा आलाप हा तिच्याच वैशिष्टय़पूर्ण आवाजात आहे.
बॅण्ड असला तर गाणी आपोआप कोरसमध्ये येतात. काही कलाकार मात्र गाण्यातील कोरसचे महत्त्व ओळखून त्या गाण्याला अधिक सौंदर्य बहाल करतात. सिया या गायिकेचे दोन-तीन वर्षांपूर्वी भारतीय शाळांमधील गॅदरिंग फेवरिट असलेले गाणे ऐकताना त्यातील कोरस वजा करता येणार नाही, इतका चपखल बसला आहे. तिने कोरसचाच वापर आय अॅम अलाइव्ह या गाण्यामध्येही सुंदर केला आहे. तिच्या ग्रेटेस्ट या गाण्यामध्येही कोरस इफेक्ट छान वठला आहे. गेल्या वर्षी ब्रुनो मार्सच्या अनेक गाण्यांतून किंवा लुईस फॉन्सीच्या डेस्पासितो या गाण्यामध्ये कोरस सापडू शकेल. जस्टिन बिबरच्या आय अॅम द वन किंवा पोस्ट मलोनच्या काँग्रॅच्युलेशन या गाण्यांचे हीट होणे त्यांतील कोरसवर पूर्णपणे अवलंबून होते. इतकेच काय, एड शीरनच्या शेप ऑफ यूमध्येदेखील त्याच्याच आवाजाचा कोरस सापडेल. कोरस फॉम्र्यूला गाण्याला सौंदर्य देत असल्याचे पाहून कित्येक शिखरावरच्या गायकांनाही आपल्या आवाजावर कोरसप्रयोग करावासा वाटत आहे. सध्या टेलर स्वीफ्टचे बिलबोर्ड यादीत असलेले डेलिकेट हे गाणे तिने कोरस गायले आहे. टेलर स्वीफ्टचे आधीचे गीतकार आणि संगीतकार आत्ता नसल्याने तिची ताजी गाणी आधीच्या गाण्यांहून बरीच फटकून वाटतात. गाण्यांमध्ये कोरसचे तुकडे पेरणारे ‘वी आर नेवर गेटिंग टुगेदर’, ‘रेड’,‘ट्रबल’ आणि ‘डेलिकेट’ यांची तुलना जरी केली, तरी तिच्या गाण्यांतील बदल कळेल.
कोरसचा वापर झालेली आणि एकाच कलाकाराने आपल्याच आवाज प्रक्रिया करून तयार केलेली प्रत्येकाला आवडणारी शेकडो गाणी असतील. गाणे ऐकताना एखादे गाणे आपल्याला परत परत ऐकण्यासाठी का आवडते, याची मेंदूत गणिते तयार झालेली असतात. अन् ती गणिते बऱ्याच वेळा कोरसवर आधारलेली असतात.
म्युझिक बॉक्स
Chumbawamba – Tubthumping
Enya- Orinoco Flow (Sail Away)
Enya – Caribbean Blue
Maroon 5 – Girls Like You
Kygo & Imagine Dragons – Born To Be Yours
Taylor Swift – Delicate
Chumbawamba – Amnesia
viva@expressindia.com