गायत्री हसबनीस
गेल्या अनेक वर्षांपासून फॅशन आणि त्याचे महत्त्व दिवसागणिक बदलतच गेले आहे. एकीकडे भारतीय हातमागाला नवं रूप मिळालं, प्लस फॅशनही फॅशनविश्वात रुळली. फॅशन फक्त रॅम्पपुरती न राहता ती सर्वसामान्यांपर्यंत सहज पोहोचेल अशा पद्धतीने रॅम्पवरून बाजारात उतरली याही बदलाचे आपण साक्षीदार झालो. यापुढचा फॅशनचा टप्पा नेमका कसा असेल? फॅब्रिकपासून मार्केटपर्यंत नव्या वर्षांत आणखी काय पाहायला मिळेलहेसांगतायेत सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर नचिकेत बर्वे..
या वर्षी फॅशनमध्ये असंख्य बदल पाहायला मिळाले त्यामुळे फॅशन आणि लाइफस्टाइल यांचे समीकरणही बदलत गेले. इंडोवेस्टर्न फॅशनवर भर, रेट्रो आणि विंटेज फॅशनचे पुनरागमन याचबरोबर मेन्सवेअरमध्येसुद्धा विविध हटके स्टाइल्स आणि विविध प्रकारचे कॅज्युअल लुक, फॅब्रिक-प्रिंट-कलर्स या सगळ्यात झालेले बदल या वर्षीच्या फॅशनमध्ये प्रत्यक्षात उतरलेले पाहायला मिळाले. ‘नव्या वर्षांत तुमच्या फॅब्रिकमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग असतीलच पण त्याचबरोबरीने विविध थीममधून कपडय़ांवरच्या रंगसंगतीबाबत मिस मॅच कलर आणि त्यानुसार स्टाइल्स ट्रेण्डमध्ये येतील,’ असं नचिकेत बर्वे याने सांगितलं.
फॅब्रिक आणि रंग यांचे अफलातून मिश्रण आपल्याला नवनवीन फॅशन मिळवून देते. सध्या कॅज्युअल, मल्टिकलर, कॉन्ट्रास्ट रंग असे अनेक पर्याय आहेत. मात्र याची रोजची फॅशन आणि सणासुदीची फॅशन या दृष्टीने सांगड कशी घातली जाईल, याबद्दल बोलताना, ‘रंग हे वेशभूषेला एक वेगळा दृष्टिकोन देतात त्यामुळे सणासुदीसाठी किंवा समारंभात मिरवण्याच्या दृष्टीने फॅशन करताना ब्राइट कलर्सचा जास्त विचार होईल. हे थोडे ऑफबीटही वाटेल पण ब्राइट रंग हे कूल ठरतील. त्याचबरोबर मेटॅलिक रंग त्यातही ब्रॉन्झ, सिल्व्हर, गोल्ड, कॉपर असे आहेत, जे पुढच्या वर्षी ट्रेण्डसेटर ठरतील. रंगांच्या ट्रेण्डमध्ये यापुढे टोनिंगवर भर असेल, असेही त्याने स्पष्ट केले.
सध्या फॅब्रिकमध्येही वैविध्य दिसून येतं त्यामुळे एकाच फॅब्रिकचे वेगवेगळे प्रकार सर्व प्रकारच्या फॅशनप्रमाणे वापरता येतील, असे सांगताना तस्सर सिल्क, ऑरेगंजा फॅब्रिक पुढच्या वर्षी ट्रेण्डमध्ये असतील. शिवाय, सिल्कच्या पठडीतील आणखी काही फॅब्रिक ट्रेण्डमध्ये येतील, असं ते म्हणाले. रूटिन आणि ऑफिसमध्ये वावरतानाही हल्ली सहज फॅशन अवलंबली जाते. ‘साध्या लुकमध्येसुद्धा सुंदर पद्धतीने स्टायलिश पण साध्या, हलक्या आऊटफिटवर भर असेल. आता जॅकेट्सचे प्रकारसुद्धा खूप आहेत तेव्हा कॅज्युअल वेअर म्हणून जॅकेट्सचा वापर वाढेल; त्यामध्ये शर्ट टाइप जॅकेट्सना प्राधान्याने मागणी असेल, ट्रॅडिशनल शरारा आणि लॉन्ग कुर्ता असे प्रकारही हमखास पाहायला मिळतील, असे नचिकेतने सांगितले.
फॅशन मुळात पहिल्यांदा कॉलेज कॅम्पसमध्ये उतरते. कॅम्पसच्या फॅशनवर सध्या इंडोवेस्टर्न फॅशनचा प्रभाव आहे हे नचिकेतला पटत नाही. त्याउलट, पूर्णपणे मॉडर्न लुक त्यांना जास्त आवडतो, असं तो म्हणतो. शिवाय, इंडोवेस्टर्न फॅशनही वेगवेगळ्या प्रसंगात स्टाइल स्टेटमेंट म्हणून वापरली जाईल मात्र त्यात भारतीय फॅशन आणि डिझायनिंगवर जास्त भर असेल. उदाहरणार्थ, पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज आणि त्यावर ब्रोकेट जॅकेट किंवा प्लेन वेस्टर्न शर्ट त्याखाली ब्रोकेट लॉन्ग स्कर्ट.. यात ब्रोकेट प्रिंट हे देशी आहे तर जॅकेटचा मॉडर्न लुक त्यावर वेगळा ठरतो. डिझायनिंग, पॅटर्न आणि प्लेन रंग हे मॉडर्न लुकमध्ये फीट करता येतात आणि हा ट्रेण्ड ट्रॅडिशनल कपडय़ांवरही सहज उपलब्ध होतो, असा सल्लाही त्याने दिला.
साठ ते सत्तरच्या दशकांतील फॅशन समर आणि विंटर कलेक्शनमध्ये प्रामुख्याने दिसते आहे. नचिकेतच्या मते जेव्हा जुनं नव्याला भेटतं तेव्हा त्यातूनच फॅशन पुढे जात राहते. विंटेज लुक किंवा रेट्रो लुक हे परत ट्रेण्डमध्ये जरी आले तरी त्यात त्या पूर्वीच्या जुन्या स्टाइल्स पूर्णपणे नव्या अवतारात दिसणार नाहीत. तर त्या स्टाइलचा वापर करीत नवीन फॅशन लुक डिझाइन केलेला पाहायला मिळेल. फॅशनचा असा संगम नेहमीच पाहायला मिळतो, मात्र मिक्स फॅशनची संकल्पना नवीन वर्षांत जास्त प्रभावीपणे दिसेल. ‘पॅटर्न्समध्ये लेयरिंग नक्कीच असेल. नव्या प्रिंट्सवर मॉन्टाजचा विचार केला जाईल,’ अशा वेगळ्या, आजच्या काळातील कल्पनांची जोड फॅशनला असेल, असे तो म्हणतो. आजवर फॅशन वर्तुळात दिसणारी फॅशन फॉलो होत होती. यापुढे वैयक्तिक फॅशन महत्त्वाची ठरेल. एखादी फॅशन फॉलो करण्यापेक्षा त्यातही नेहमीचे नियम मोडून माझ्या विचारांप्रमाणे बदल करीत स्वत:चा लुक स्वत:च डिझाइन केला जाईल. मग ते भरजरी लेहंग्यावर स्निकर्सचा प्रयोग असो किंवा आणखी काही.. मला आरामदायी वाटेल आणि कल्पकही दिसेल, असा प्रत्येकाचा फॅशनविचार विकसित होईल, असे नचिकेत म्हणतो.
वास्तविक पाहता येत्या काळात फॅशन ही कोण्या एका देशाची राहणार नाही. सोशल मीडियामुळे जग इतकं छोटं झालं आहे की रशियन, फ्रेंच, जपानी कुठल्याही देशातील फॅशन तुम्हाला आकर्षित करू शकते. आणि त्या पद्धतीने त्याची माहिती घेऊन, ते फॅब्रिक त्या पद्धतीने मागवून, डिझाइन करून घेऊन ती फॅशन सहज फॉलो करता येईल. फॅशनची ही देवाणघेवाण मोठय़ा प्रमाणावर वाढेल तसतसे अधिकाधिक ट्रेण्ड्स टप्प्याटप्प्यावर पाहायला मिळतील आणि फॅशनचा प्रवाहो विस्तारण्यासाठी हा मोठाच बदल ठरेल, असे सूतोवाचही नचिकेतने केले.