wearहौस
‘एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो रमेशबाबू..’ याच डायलॉगच्या आवेशात सांगायचं झालं, तर ड्रेसला परफेक्ट मॅच होईल अशा बटणांचे महत्त्व काय असतं हे एक फॅशनप्रेमीच सांगू शकतो. एक छोटंसं बटन.. बरं त्याचं काम काय तर ड्रेसची दोन टोकं एकमेकांना बांधून ठेवायची. त्यांची जागा शक्यतो ड्रेसच्या पुढच्या बाजूला असते. पण कधीकधी ते पाठच्या बाजूलाही विराजमान होतात. शर्ट्सच्या बाबतीत बोलायचं झालं, तर त्याचं महत्त्व अनन्यसाधारण. कधीतरी स्लीव्ह, शोल्डर पट्टी, नेकलाईन अशा काही जागा हेरून ही मंडळी त्यावर विराजमान होतात आणि लक्ष वेधून घेतात. बरं आता या छोट्याशा वाटणाऱ्या बटणाबद्दल इतकं ऐकल्यावर ‘काहीही हां’ म्हणावंसं वाटत असेल तर त्या आधी एक छोटासा प्रयोग करा. तुमच्या ऑफिसच्या शर्टला वेगवेगळ्या रंगाची, आकाराची बटन लावून बघा. काय.. कल्पना सहन होतं नाही ना? म्हणून तर म्हटलं हे ‘छोटा पॅकेट बडा धमाका’ आहे.
अर्थात म्हणूनच यांच्यासोबत खेळायला, वेगवेगळे प्रयोग करायला अजूनच मजा येते. मुलांसाठी सोप्पा प्रयोग म्हणून एखाद्या दोन किंवा तीन रंगी फॉर्मल शर्टच्या बटनपट्टीला रंगसंगतीनुसार दोन वेगवेगळ्या रंगाची पण एकाच आकार आणि साईजची बटन लावा. रंगीत चेक्स, िपट्रच्या शर्टला सहसा डार्क शेडची बटन लावली जातात. त्याऐवजी त्यांना शर्टातील सर्वात ब्राईट रंगाची बटन लावा. तुमचा शर्ट सहजच उठून दिसेल. त्याला जादा डिटेिलगची गरजच पडणार नाही.
हल्ली शर्टला स्टँडर्ड साईजची बटणंलावण्यापेक्षा थोड्या लहान आकारातील बटन दोन-तीनच्या गटांनी लावली जातात. बटनपट्टीमध्ये केलेला हा छोटासा प्रयोगही भाव खाऊन जातो. त्यामुळे पुढच्या वेळेस तुमच्या टेलरला अशी बटनपट्टी तयार करायला नक्की सांगा. सध्या लांब बाह्य़ांच्या (फुल स्लीव्ह) कुर्त्यांचा ट्रेंड आहे. पण यातला तोचतोचपणा टाळायचा असेल तर स्लीव्हला छान बटनपट्टी बनवा. बरं ही बटनपट्टी वापरलीच पाहिजे असं काही नाही. केवळ शोभेसाठीही बनवू शकता. नेकलाईन पुराण आपण मागच्या लेखात पाहिलंच. त्यातही बटणं महत्त्वाची भूमिका बजावतात.
कुर्ता किंवा ड्रेसच्या मागच्या बाजूला शोभेसाठी एखादी दोन-तीन बटणांची बटणपट्टी बनवून घेतली तरी ड्रेसला उठाव मिळतो. मॅक्सी ड्रेसच्या स्लीटच्या सुरवातीला दोन बटणांची बटनपट्टी करून त्यापुढे बटन लावून त्याला बटणपट्टीचा गेटअप देता येईल. एखादं छान डिझायनर बटन ड्रेसच्या शोल्डर पट्टीला लावा आणि दुपट्ट्याला काजं करून दरवेळी दुपट्टा या बटनामध्ये खोचा. (हा प्रयोग साडीचा पदर आणि ब्लाउजसोबत सुद्धा करता येईल) सतत दुपट्टा सांभाळायची कटकट वाचेलच आणि हटके लुकसुद्धा मिळेल.
10
हिवाळ्याच्या मौसमात छान शाल गुरफटून सकाळी ऑफिस किंवा कॉलेजला जायला मजा येते खरी, पण सतत सटकणाऱ्या शालीचा हळूहळू कंटाळाही येतो. त्याऐवजी तुमच्या खांद्याच्या मापानुसार शालीच्या एका बाजूला बटन आणि काजं लावा. जादाचा भाग मोकळा सोडा. यामुळे तुमची गरसोय सुद्धा टळेल आणि शाल दिसायला सुद्धा स्मार्ट दिसेल. लांब स्कार्फचा याच ट्रिकने फॅशनेबल केप करता येईल.
बाजारात एक चक्कर मारली, तर बटनांच्या विविधतेने थक्क व्हायला होईल. शंख, फुलं, भौमितिक आकार, इंग्रजी बाराखडी, पेझ्ली अशा विविध आकारात बटणं पहायला मिळतात. पोटली बटन, क्रोशाची बटणं घरच्याघरी सहज बनवता येतात. रंगीत खडे, मोती, शिमर वापरून त्यांनाही ग्लॅमरस करता येत. लाकडाच्या बटन्सवर तुम्हाला वेगवेगळ्या रंगांनी रंगवता सुद्धा येतात. थोडा बाजार धुंडाळाल तर िपट्रेड किंवा तुमच्या पसंतीच्या डिझाईन्स िपट्र केलेली बटणं मिळतात. हुक्सचा समावेश बटनांच्या यादीत करता येऊ शकतो. ओव्हरसाईज, रंगीत हूक्स हल्ली पहायला मिळतात. ते दिसायला सुंदर असतातच आणि त्यांना झाकायचा मोह तुम्हाला कधीच होणार नाही. ड्रेसमध्ये गरजेचे असूनही आतापर्यंत बटणं लपवण्याचा प्रयत्न केला जाई. पण याच एलिमेंट्सना फोकसमध्ये आणलं, तर मात्र ड्रेसची मजा अजूनच वाढते. त्यामुळे या छोट्या नवाबांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका.