आपला लाडका बाप्पा यायला दोन दिवस राहिले आहेत. सजावट, नवीन कपडे, सगळी तयारी जोरात चालू असेलच! फक्त तेवढीच तयारी करू नका; या वर्षी तुम्हाला आरत्यासुद्धा स्पष्ट आणि शुद्ध म्हणायची प्रॅक्टिस करावी लागणार आहे, कारण आरत्यांमधल्या चुकीच्या उच्चारांवर आता नेटिझन्स लक्ष ठेवून आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ‘व्हॉट्सअॅप’वीरांनी आरतीतल्या उच्चारांच्या चुकांवर मार्मिक टिप्पणी करायला सुरुवात केली आहे. दास रामाचा वाट पाहे ‘सजणा’ म्हणणाऱ्यांना ‘सजणा’ कोण ते विचारा, अशा पद्धतीचे मेसेज व्हॉट्सअॅपवर सध्या धुमाकूळ घालतायत. लंबोदर पितांबर ‘फळीवर वंदना’ म्हणणाऱ्यांना म्हणावं, त्या वंदनाला खाली उतरवा. ओवाळू आरत्या ‘सुरवंटय़ा’ येती, ‘लवलवती’ विक्राळा, म्हणणाऱ्यांना आरतीची पुस्तकं द्या, असं नेटिझन्स म्हणतायत. ‘दीपक जोशी’ नमोस्तुते म्हणणाऱ्यांना सादर प्रणाम आणि त्यांना आरतीसोबत परवचासुद्धा शिकवा, अशा भाषेत नेटिझन्स चुकीच्या उच्चारांवर ‘कमेंट्स’ करतायत, त्यामुळे बीवेअर! सगळ्या चुकांकडे सगळे लक्ष ठेवून आहेत, हे लक्षात असू द्या आणि इतरांना बोलण्याचा चान्स देऊ नका.
आणि हो, आपला बाप्पा सगळ्या संकटांमध्ये आपल्यावर कृपादृष्टी ठेवून असतो, आपल्या प्रत्येक हाकेला धावून येतो, आपल्या सगळ्या संकटातून आपल्याला तरून जायला मदत करतो. त्याला ‘संकष्टी’ पावावे म्हणून फक्त एका दिवसापुरता आशीर्वाद मागू नका, ‘संकटी’ पावावे म्हणून प्रार्थना करा. तसंच लवकरात लवकर आरतीची पुस्तकं एकदा नजरेखालून घाला, नाहीतर ऐन गणपतीत एकमेकांची तोंडं बघत बसाल आणि ज्युनिअर के.जी.मधली मुलं प्रार्थना म्हणताना नुसते ओठ हलवतात तशी अॅक्टिंग करत राहाल, असं नेटिझन्स आता म्हणायला लागले आहेत. बाकी तयारी सुरू राहू द्या. गणपती बाप्पा मोरया!
– वेदवती चिपळूणकर