पर्यावरणाबद्दल जागरूकता आता सगळ्या क्षेत्रांत दिसून येत आहे. फॅशनच्या क्षेत्रातही ‘इको फ्रेंडली फॅशन’ रुजत आहे. जगभरातील या नव्या स्वागतार्ह प्रवाहाची नोंद भारतीय फॅशन उद्योगानेही घेतलेली दिसतेय. पर्यावरण पूरक फॅशनमध्ये पर्यावरणाला सुसंगत कपडय़ाचा वापर महत्त्वाचा असतो. त्याशिवाय रिसायकल अर्थात कपडय़ाचा पुनर्वापरही अपेक्षित असतो. नुकत्याच सुरू झालेल्या यंदाच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’ पाश्र्वभूमीवर ‘ग्रीन वॉर्डरोब’ नावाने एक कलेक्शन सादर करण्यात आलं. यामध्ये नामवंत डिझायनर्सनी पर्यावरणपूरक फॅशनची झलक दाखवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोठय़ा फॅशन शोच्या वेळी किंवा मोठय़ा समारंभांना उपस्थित राहणाऱ्या सेलेब्रिटींसाठी खास रेड कार्पेट अंथरलेलं असतं. त्यावरून रेड कार्पेट फॅशन ही संकल्पना रुढ झाली. लॅक्मे फॅशन वीक सुरु होण्यापूर्वी आठवडाभर आधी ग्रीन वॉर्डरोब ही थीम असलेल्या फॅशन शो आयोजित केला होता. त्यानिमित्त रेड ऐवजी ग्रीन कार्पेट असा शब्दप्रयोग रुढ करण्यात आला. अभिनेत्री काजोल आणि युवा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी या फॅशन शो ला हजेरी लावली. या ग्रीन कार्पेटवरील सेलेब्रिटी म्हणून त्यांना या वेळी गौरवही करण्यात आला. लॅक्मे फॅशन वीकच्यी मुख्य समारंभाची धामधूम मुंबईत सुरू आहे. देशातल्या या महत्त्वाच्या फॅशन इव्हेंटमध्ये कालचा संपूर्ण दिवस सस्टेनेबल फॅशनला वाहिलेला होता.

२९ मार्चपासून लॅक्मे फॅशन वीकची मुंबईत सुरुवात झाली आहे. ग्रॅण्ड फिनाले येत्या रविवारी (३ एप्रिल) होईल. या मुख्य फॅशन वीकची धामधूम सुरू होण्याअगोदरच काही दिवस पर्यावरण सजगता वाढवणारा ग्रीन वॉर्डरोब हा खास फॅशन शो आयोजित करण्यात आला. सुती, खादी, ज्यूट आदी पर्यावरणप्रेमी कापड वापरून यातली डिझाइन्स सादर झाली. याशिवाय कापडाचा पुनर्वापर अर्थात रिसायकलिंग हे तत्त्व या डिझाइन्समध्ये वापरलं गेलं. अनिता डोंगरे, उज्ज्वल दुबे, अनाविला मिश्रा, करिष्मा रहानी, अनीत अरोरा आदी नामवंत डिझायनर्सनी हे पर्यावरणपूरक फॅशनचं कलेक्शन सादर केलं. हिंदी चित्रपटसृष्टीतील काजोल आणि सिद्धार्थ मल्होत्रासारखे काही तारे या खास शोला उपस्थित होते. या वेळी सादर झालेल्या कलेक्शनमध्ये सुती आणि ज्यूटचा मोठा वापर होता. सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामात असे सुती कपडेच जास्त सोयीचे आहेत आणि त्याचाच ट्रेण्ड निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता.

लॅक्मे फॅशन वीक समर रिसॉर्ट २०१६च्या उद्घाटनाचा फॅशन शो प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने केला. गुरुवारी ३१ मार्च रोजी सस्टेनेबल फॅशनसाठी एक दिवस राखून ठेवण्यात आला होता. फॅशन वीकमधल्या इंडियन टेक्स्टाइल डेच्या जोडीने या दिवशी सस्टेनेबल फॅशन या तत्त्वाला अनुसरून डिझाइन्स सादर करण्यात आली. यामध्ये वेंडेल रॉड्रिक्स, गौरांग, परोमिता बॅनर्जी, स्वाती विजयवर्गी यांची कलेक्शन सादर होणार होती. यंदाच्या सीझनच्या ग्रॅण्ड फिनालेसाठी रविवारी डिझायनर रोहित बाल आपलं कलेक्शन सादर करणार आहे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green carpet for green wardrobe