सायली सोमण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बायकांप्रमाणे पुरुषपण निरनिराळ्या शरीरयष्टी आणि बांध्याचे असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या शारीरिक रचनेप्रमाणे त्या त्या माणसाला काय शोभून दिसेल या गोष्टी प्रत्येक वेळी बदलत असतात. साधारणत: बरेच पुरुष स्वत:च्या कपडय़ांच्या बाबतीत स्त्रियांसारखे चोखंदळ नसतात. म्हणूनच आपण आज पुरुषांची शरीररचना आणि त्यानुसार त्यांना कुठल्या प्रकारचे कपडे शोभून दिसतील, साजेसे दिसतील, कुठल्या फिटचे कपडे त्यांनी घालावेत याबद्दलची माहिती घेऊ या.

रॅम्बॉईड बॉडी शेप

या प्रकारची शरीरयष्टी असलेल्या पुरुषांचे खांदे आणि छाती रुंद असतात. त्या तुलनेत त्यांच्या कंबर आणि हिप्सची रुंदी कमी होत जाते. या प्रकारचा बांधा असेल तर कुठल्याही प्रकारचे कपडे या पुरुषांवर छान दिसतात. असा बांधा अत्यंत समतोल प्रकारचा मानला जातो. साधारणत: फॅशन इंडस्ट्रीमधील पुरुष मॉडेल्स हे जवळपास याच शरीरयष्टीचे असतात. म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारच्या कपडय़ांचे प्रयोग त्यांच्यावर करणे सहजसोपे होते. अशा पुरुषांनी सतत वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून बघितले पाहिजेत. चेक्स, स्ट्राईप्ड, प्रिंटेड अशा वेगवगेळ्या प्रकारची फॅ शन असलेले कपडे शिवाय ज्यांच्यावर सरफेस ऑर्नमेंटेशन असेल असे कपडे त्यांच्यावर खुलून दिसतात. एवढेच नाही तर लेयर्ड क्लोदिंगवर त्यांनी भर दिला पाहिजे. उदाहरणार्थ शर्ट्स किंवा टीशर्ट्सवर एखादे जाकीट, स्वेटर त्यांना छान शोभून दिसेल.

रेक्टँगल बॉडी शेप

या पद्धतीचा बांधा असलेल्या पुरुषांचे खांदे, छाती, कंबर आणि हिप्स रुंदीमध्ये एकसारखे असतात. म्हणूनच त्यांना पेहराव देताना त्यांचे खांदे रॅम्बॉइड शरीररचनेप्रमाणे रुंद दिसतील आणि कं बर थोडी कमी रुंद दिसेल, याचा विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ कॉलर असलेले टी-शर्ट, चेकर्ड शर्ट्स, आडव्या पट्टय़ांचे टी-र्शट्स, शोल्डर पॅडिंग असलेले कोट्स असे कपडे निवडले पाहिजेत. या प्रकारच्या कपडय़ांमुळे रॅम्बॉइड बॉडी असलेल्यांप्रमाणेचच याही लोकांचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसेल. स्किनी पॅँट्सऐवजी स्लिम स्ट्रेट फिट पँट्सचा वापर त्यांनी करावा.

ट्रँगल बॉडी शेप

या प्रकारची शरीररचना असलेल्या पुरुषांचे खांदे अरुंद असतात तर छाती, कंबर आणि हिप्समध्ये हे लोक जास्त रुंद दिसतात. हा बांधा असलेल्यांचे खांदे उतरते असतात. अशा वेळी या पुरुषांचे खांदे जितके रुंद दाखवता येतील तितके दाखवले पाहिजेत. तर कंबर आणि हिप्स थोडे निमुळते दिसतील याकडे कल असावा. यासाठी गडद रंगांचे कॉलरचे प्लेन शर्ट्स आणि टी-शर्ट्स, स्ट्रेट फिट जीन्स किंवा पँट्स अशा पद्धतीचे कपडे त्यांच्यावर चांगले दिसतात. आडव्या स्ट्राइप्सचे कपडे या लोकांनी टाळावेत नाही तर ते अजून जाड दिसतात. ब्लेझर घालायचे असतील तर ते शक्यतो शोल्डर पॅडिंगचे असावेत.

ओव्हल बॉडी शेप

नावाप्रमाणेच असलेल्या या प्रकारच्या बांध्यातपण खांदे अरुंद असतात. आणि त्यांच्या पोटाचा किंवा कमरेकडचा भाग जास्त असतो. इतर पुरुषी बांध्यांप्रमाणे या प्रकारामध्ये पण तुमच्या पेहरावाचा कल खांदे रुंद आणि खालचा भाग कमी रुंद दाखवण्याकडे असला पाहिजे. म्हणूनच उभे स्ट्राइप्स असलेले शर्ट, उभ्या प्रिंटचे शर्ट किंवा टी-शर्ट्स या लोकांवर जास्त चांगले दिसतात. पँट्स अगदीच ढगळ नाही पण स्ट्रेट फिटच्या जास्त चांगल्या दिसतात.

वर दिलेल्या माहितीवरून तुम्हाला थोडाफार अंदाज आलाच असेल की आपला बांधा कुठल्या प्रकारचा आहे. कुठल्या कपडय़ांमुळे आपले व्यक्तिमत्त्व खुलून दिसणार आहे. आपले स्टाइल स्टेटमेंट ठरवताना या माहितीचा तुम्हाला फायदा नक्कीच होईल. पण त्याचबरोबर मी मागच्या लेखात जसे स्त्रियांच्या फॅ शनच्या बाबतीत म्हटले होते तसेच कोणत्याही व्यक्तीसाठी आत्मविश्वास हा सर्वात उत्तम पेहराव आहे. तो कधीही स्वत:पासून वेगळा करू नका. आणि फक्त या लेखात लिहिले आहे म्हणून या फॅ शन टिप्स फॉलो करू नका, तर तुमच्या दैनंदिन आयुष्यात कामाच्या ठिकाणी किंवा इतर वेळी वावरताना तुम्हाला हे कपडे अतिशय सोईस्कर आणि आरामदायी वाटतील अशाच प्रकारचे कपडे परिधान करा. फॅ शनचा विचार करताना कम्फर्ट आणि स्टाइल यांचा योग्य समतोल साधता आला पाहिजे हे कायम लक्षात ठेवा!

इन्व्हर्टेड ट्रँगल बॉडी शेप

हा बांधा असलेल्या पुरुषांचे खांदे आणि छाती रॅम्बॉईड शरीरयष्टी असणाऱ्या पुरुषांपेक्षा जास्त रुंद असतात. त्यांची कंबर आणि हिप्सच्या भागाकडे येताना त्यांच्या शरीराचा आकार त्रिकोणाएवढा निमुळता होत जातो. या प्रकारच्या शरीरयष्टीमध्ये खांदे – छाती आणि कंबर – हिप्स या सगळ्या जागांमधील रुंदीत भरपूर तफावत असते. त्यात समतोल साधणे गरचेचे असते. यासाठी कंबरेचा भाग थोडा रुंद दिसेल अशा पद्धतीचे कपडे त्यांनी घालावेत. उदाहरणार्थ शर्ट इन केले तर कंबर हायलाइट करण्यासाठी बेल्ट जरूर घालावा, आडव्या स्ट्राइप्सचे शर्ट किंवा टी-शर्ट घालायचे असतील तर त्याच्या वरच्या रेषा कंबरेच्या बाजूला असायला हव्यात. किंवा मग व्ही नेक पद्धतीचे टी-शर्ट्स, जम्पर्स परिधान केले तर त्यांच्या रुंद छातीकडे कमी लक्ष वेधले जाते. त्यांच्यावर सध्या खूप चर्चेत असलेले अ‍ॅसिमेट्रिकल पद्धतीचे कुर्तेही शोभून दिसतील.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guide for men on how to dress based on their body shape