हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी
सुट्टी, खेळ आणि खेळणी यांचं नातं अतूट आहे. त्याला वयाचं बंधन नाही. खेळण्यांच्या दुकानात मोठेही लहान होतात. वयाचे काटे मागे फिरतात. आवडत्या बाहुलीला पाहून विस्फारणारे डोळे, चावीच्या तालावर नाचणारं माकड पाहून वाजणाऱ्या टाळ्या, आनंदी चित्कार ही फक्त छोटय़ांची मक्तेदारी नाही असं वाटायला लावणारी खेळण्यांची दुकानं म्हणजे एक अद्भुत दुनिया आहे. या दुनियेतील २५८ र्वष जुना आणि सर्वात मोठा ब्रँड म्हणजे हॅमलीज.
इंग्लंडमधील कॉर्नवॉल परिसरात राहणाऱ्या विल्यम हॅमलीज् यांचं स्वप्नं होतं, जगातील सर्वात मोठं खेळण्यांचं दुकान निर्माण करण्याचं. १७६० मध्ये लंडनमधील हॉलबॉर्न इथे त्यांनी या स्वप्नांच्या दिशेने पहिले पाऊल टाकत खेळण्यांचं दुकान सुरू केलं. इथं मिळणाऱ्या खेळण्यांचा दर्जा उत्तम होता. ही खेळणी अनोखी होती. अल्पावधीत दुकान लहानांसह थोरांमध्येही लोकप्रिय झालं. हा काळ तेव्हाचा होता जेव्हा लंडनमध्ये मोटारकार नाही तर घोडय़ांच्या बग्ग्या फिरत. रस्त्यावर गॅसचे दिवे पेटायलाही पन्नास वर्षांचा अवधी होता. काळाची गणितं मांडताना त्यावेळी भारतात काय चालू होतं याचा विचार मनात आल्याशिवाय राहात नाही. महाराष्ट्राचा विचार करता पेशवाईचा तो काळ होता. त्या काळात ही खेळण्यांची दुनिया लंडनमध्ये अवतरत होती.
१८३७ पर्यंत हा ब्रॅण्ड हॅमलीज् इतका प्रभावी झाला की लंडन लॅण्डमार्क, जॉय एम्पोरियम म्हणून हॅमलीज्कडे पाहिलं जाऊ लागलं. खुद्द क्वीन व्हिक्टोरियाने हॅमलीज्ची दखल घेतली. १८८१ मध्ये रिजेंट स्ट्रीट लंडन येथे हॅमलीज्ची नवी शाखा सुरू झाली. आजही हे लंडनचं आकर्षण स्थळ आहे. सात मजली इमारत, ३३५ जणांचा कर्मचारी वर्ग, दहा हजारांहून अधिक वैविध्यांसह साडेचार लाख खेळणी पाहताना छोटे काय अगदी मोठेही हरकून जातात.
प्रत्येक ब्रॅण्ड ज्याप्रमाणे चढ-उताराला सामोरा जातो तेच हॅमलीज्च्या बाबतीत घडलं. पहिल्या महायुद्धाच्या काळात हॅमलीज्ची स्थिती बिकट झाली. १९३१ला ते बंद पडलं. हॅमलीज्चं खास आकर्षण असणाऱ्या घोडे जोडलेल्या डिलीव्हरी व्हॅनची चोरी झाली. पण हे कायम रहाणार नव्हतं. वॉल्टर लाइन्स यांनी विल्यम्स हॅमलीज्कडून हे स्टोअर खरेदी केलं. खूप श्रम घेतले आणि १९३८पर्यंत हॅमलीज्चं पूर्व वैभव प्राप्त करून दिलं. जुने ग्राहक हॅमलीज्कडे परत आणले. १९३८ मध्ये क्वीन मेरीने हॅमलीज्ला शाही फर्मान ( रॉयल वॉरंट) जारी केलं. हॅमलीज्ची शान वाढली.
त्यानंतर आला दुसऱ्या महायुद्धाचा काळ. पाच वेळा हॅमलीज् स्टोअरवर बॉम्बगोळे पडले. पण मालक आणि कर्मचारी इतके निडर की टिन हॅटस् घालून का होईना धावत पळत सेवा देत त्यांनी दुकान चालू ठेवलं. बंदची पाटी झळकू दिली नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर सर्व काही पूर्ववत झालं. १९५१ च्या फेस्टिव्हल ऑफ ब्रिटनमध्ये हॅमलीज्चा मान विशेष होता. क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांनीसुद्धा त्यांच्या आजीने त्यांना बालपणी हॅमलीज्मधून आणून दिलेल्या खेळण्यांच्या आठवणी सांगितल्या आणि हॅमलीज्सोबत जपलेला आपला हळवा कोपरा व्यक्त केला. १९५५ मध्ये हॅमलीज्साठी दुसरं शाही फर्मान जारी केलं गेलं. १७६० पासूनची ही बालपण जपणारी परंपरा आजतागायत कायम आहे. सध्या नानकिंग इथल्या ‘बॅनर’ या प्रसिद्ध चायनीज फुटवेअर आणि फॅशनवेअर हाऊसकडे हॅमलीज्चे मालकीहक्क आहेत. हॅमलीज्ची परंपरा जगभर पसरली आहे. आशियातील पहिलं हॅमलीज् स्टोअर मुंबईत २०१० मध्ये सुरू झालं. भारतात हॅमलीज्ची मोजून ५० आऊटलेट्स आहेत.
लाकडाची ठकी आणि कापडी चेंडू याच्या खूप पुढे जात आज भारतीय खेळण्यांचं विश्व समृद्ध होतं आहे. तिथे जगातील सर्वोत्तम आणि प्रचंड वैविध्य जपणाऱ्या खेळाच्या दुकानाचा ब्रॅण्ड भारतात दाखल होणं ही सुखावणारी गोष्ट आहे. जायंट बेअर हॅमलीज् आणि हॅटी हे हॅमलीज्चे मॅस्कॉट आहेत. ‘फाइनेस्ट टॉईज इन द वर्ल्ड’ ही टॅगलाईन हॅमलीज् सार्थकी लावतं.
तुम्ही कुठल्याही हॅमलीज् स्टोअरमध्ये जा. तिथे अगणित खेळणी वयोगटाप्रमाणे, खेळण्याच्या प्रकाराप्रमाणे नीट लावलेली असतात. खेळण्यांच्या विविध ब्रॅण्डस्चं जणू संमेलन भरलेलं असतं. त्यात मुलांना गुंतवणारी, त्यांच्यासोबत खेळणारी, प्रात्यक्षिकं दाखवणारी चतुर आणि कल्पक कर्मचारी मंडळी पाहता पाहता एक उत्साहाने भरलेलं खेळविश्वच समोर उभं करतात. आत शिरणारं मूल इथं जाऊ की तिथे जाऊ असं थुईथुई नाचत असताना त्यांना आवरणारे पालकही मनाने तिथेच गुंतलेले असतात. अगदी काहीच खरेदी केलं नाही तरी जगभरात खेळण्यांच्या दुनियेत काय काय नवं आलंय याची सुंदर झलक पाहायला मिळते. हॅमलीज् ब्रॅण्डच्या लोगोतील ती चकाकत्या ताऱ्यांची चमकदार दुनिया आपल्या मनात पसरत जाते.
हॅमलीज्चं हे एक अनोखं जग आहे. चित्रपटात कसा नायक धावता धावता मोठा होतो तसं हॅमलीज्मध्ये पाय ठेवताच मनावरची प्रौढत्वाची पूटं गळून नकळतच आपण सानुले होऊन जातो. बालदोस्तांच्या कल्पनाशक्तीला तर पंखच मिळतात. त्यामुळे प्रौढत्त्वी नीज शैशवास जपण्यासाठी २५८ वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेल्या हॅमलीज्ची वारी एकदा तरी नक्की करावी!
viva@expressindia.com