गायत्री हसबनीस

हॅट्सवरची आकर्षक कलाकुसर आपण हॉलीवूडपटांमधून पाहिली आहे. त्या हॅट्समागची आर्थिक गणितं काहीही असोत पण त्यावरची कलाकुसर, त्याचे विविध आकार-प्रकार पाहणाऱ्याला कायम आकर्षित करतात. हॅट्सची फॅशन ही हॉलीवूडमधून आता बॉलीवूडमध्ये आली आहे. त्यामुळे बॉलीवूडला पडलेली हॅट्सची भुरळ सर्वसामान्यांना भुलवल्याशिवाय थोडीच राहणार?

‘टायटॅनिक’ चित्रपटात केट विन्सलेटच्या आकर्षक रुंद हॅटकडे पाहिल्यानंतर त्या हॅटच्या लांबी किंवा रुंदीहूनही तिच्या हॅटवरची नक्षी तिच्या सौंदर्याला अनन्यसाधारण महत्त्व देऊन गेली होती. परदेशात पूर्वीच्या काळी मोठमोठय़ा राण्यांपासून आत्ताच्या नायिकांपर्यंत भल्यामोठय़ा हॅट्स वापरण्याची परंपराच आहे. व्हिक्टोरियन काळात हॅटवरचे नक्षीकाम विलक्षण असायचे, स्त्री कोणत्याही वयातील असो पण तिच्या चेहऱ्याला त्या हॅटमुळे एक वेगळा लुक मिळायचा. खरंतर हॅटचा लुक हा एकाच वेळी सोज्वळ आणि तरीही राजेशाही, देखणा असा असल्यानेच त्याचं आकर्षण आजवर कायम आहे.

सध्या ही हॅट्सची फॅ शन बॉलीवूडकरांकडून मिरवली जाते आहे. त्यांच्यामुळे हॅट्स आता आपल्याकडेही ट्रेंडमध्ये येतायेत.प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलेच्या लग्नसभारंभात प्रियांका चोप्राने जांभळ्या रंगाची हॅट परिधान केली होती. त्या हॅटवरून तिच्या फॅशन सेन्सचे कोण कौतुक झाले. प्रियांका चोप्राची आंतरराष्ट्रीय अभिनेत्री म्हणून ख्याती आहे. कुठल्याही सभारंभात पाहुणी म्हणून जाताना प्रियांकाला आंतरराष्ट्रीय फॅशनचा प्रामुख्याने विचार करावा लागतो, त्यातून त्यांच्या लग्नात उपस्थित राहताना तिने थीमप्रमाणे हॅटच्या डिझाइनपासून रंगापर्यंत सगळ्याची काळजीपूर्वक निवड करत बाजी मारली. प्रियांकाच्या आधीही बॉलीवूड अभिनेत्रींनी हॅट परिधान केल्या होत्या आणि आहेत. या सभारंभात प्रियंकाच्या हॅटचा डिझायनर होता हॉलीवूडमधील प्रसिद्ध हॅट डिझायनर फिलिप ट्रिसी. ब्रिटिश रॉयल डय़ुक आणि डचेस त्याच्या हॅट्सचे चाहते आहेत. बॉलीवूड अभिनेत्रींनी घातलेल्या हॅट्सही जवळपास परदेशी डिझायनर्सच्याच आहेत. सोनम कपूर, करिना कपूर, कंगना राणावत, दीपिका पदूकोण, ऐश्वर्या राय-बच्चन यांनी विविध डिझायनर हॅट्स ग्रेसफुली कॅरी करून दाखवल्या आहेत त्यामुळे हॅटची फॅशन हळूहळू चांगलीच रुळतेय.

हॅट्सचा वापर करण्यासाठी एखादे ऑफिशियल ओकेजनच योग्य असते, पण अनेकदा रेसकोर्सवर उपस्थित राहताना अनेक सेलेब्रिटी कलाकार हॅट्स परिधान करतात. त्यामुळे खास ‘डर्बी हॅट्स’ म्हणून काही हॅट्स बाजारात आल्या. ‘केंटकी डर्बी’ या नावाने या हॅट्स नावाजलेल्या आहेत ज्या फक्त डर्बी या हॉर्स रेसचा सन्मान म्हणून वापरतात. मुंबईत कंगना राणावतने ‘रंगून’ चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या वेळी वेगळ्या स्टाइलची काळ्या रंगाची हॅट परिधान केली होती. नताशा फुनावाला या अभिनेत्रीने देखील ‘हॅलो’ तर्फे ठेवण्यात आलेल्या हॉर्स रेससाठी नव्या लुकची हॅट वापरली होती ज्यात मोनोक्रुम लेस आणि फेदर्ड स्ट्रॅपस होते. यापूर्वीही तिने ‘किंगफिशर अल्ट्रा डर्बी’ या कार्यक्रमात फेदर्सची हॅट वापरली होती. करिनानेसुद्धा एका कार्यक्रमात न्यूड रंगांची हॅट तिच्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट चेक्सच्या वन पीसवर घातली होती.

वेगळ्या धाटणीच्या या हॅट्स फेदर्स, नेट, रिबिन्स, बॉ, पोनी, फ्लावर्स, फ्लोरल अशा विविध हॅण्डमेड गोष्टींनी बनवलेल्या असतात पण त्यातही या सर्वाची साइज ही मोठी ठेवलेली असते; जरी हॅटची मूळ साइज लहान असली तरी हॅटवरच्या नक्षीकामातून तिला मोठा लुक दिला जातो ज्याचा परिणाम अर्थात आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. या हॅट्सवर डेकोरेशन करायला खूप वाव असतो त्यामुळे विविध डेकोरेटिव्ह हॅट्स या ट्रेंडमध्ये दिसतायेत. पॅरिस फॅशन वीकनंतर ओव्हरसाइज्ड व डेकोरेटिव्ह हॅट्स या ट्रेंडमध्ये आल्या आहेत त्यामुळे ग्लोबल फॅशनमध्ये वेलवेट, लेदर, वूल, क्नीट या फॅब्रिकसोबतच फ्रेंच फॅब्रिकच्या हॅट्सची फॅशन ट्रेंडमध्ये आहे. २०१८ या वर्षांत ओव्हरसाइज्ड आणि मिनिएचर हॅट्सचा ट्रेंड महत्त्वाचा ठरला आहे. त्याचप्रमाणे रंगांच्या बाबतीतही बेबी पिंक, स्काय ब्ल्यू, चॉकलेटी, पांढऱ्या किंवा लेमन रंगांबरोबरच सिंगल कलरपासून मल्टिकलर शेड्सवर जास्त भर आहे. रंगीबेरंगी हॅट्स वापरणं म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध वाढवण्याची संधी या विचारातून अनेक अभिनेत्री जाणीवपूर्वक त्यांची निवड करतात. जेणेकरून त्यांचा लुकही वाखाणला जातो आणि आपोआप प्रसिद्धी होते.

अशा पद्धतीच्या डिझायनर हॅट्स घातल्यानंतर ज्वेलरीसोबत कपडय़ांची फॅशनही तितकीच महत्त्वाची ठरतेय. बोटातील अंगठय़ांची फॅशन, नेकलेस, इअररिंग्स, हातातील ब्रेसलेट्स आणि सॅण्डल्स हे सगळं नीट जुळून आलं तर हॅटची युनिक फॅशन व्यक्तिमत्त्वाला एक्स्ट्रॉऑर्डिनअरी लुक देते. गाऊन हा प्रकार आता कॉमन झाला झाला आहे, परंतु स्पेशली हॅट्स वापरताना सेलिब्रेटींकडूनही गाऊन, जॅकेट आणि स्कर्ट्सचा उपयोग होतोय. हॅट्सवर गाऊन किंवा स्कर्ट परिधान करणंच योग्य ठरतंय. त्याचबरोबरीने हॅट घालण्यापूर्वी हेअरस्टाइल्सचाही विचार केला जातो. हॅटसोबत सनग्लासेसचाही फॅ शनेबल लुकसाठी वापर केला जातो. ग्रेसफुली हॅट मिरवणे व शेवटपर्यंत त्याच ग्रेसने ती हॅट डोक्यावर असूनदेखील तितक्याच आरामात इतरांशी संवाद करणे कठीण ठरू शकते. अशा वेळेस तसे एटिकेट्स पाळणे महत्त्वाचे असते. वाऱ्याने हॅट उडून जाण्याचीही शक्यता असते त्यामुळे हॅटचे फिटिंगही योग्य असावे लागते. या हॅट्समध्ये वन साइड हॅट्स आल्या आहेत ज्यात हॅट्स पूर्ण डोक्यावर न बसवता फक्त डोक्याच्या कडेला ठेवली जाते, इथे या हॅट्सना स्पेशल आतून फिटिंग केलेले असते जेणेकरून सहजासहजी डोक्यावरून त्या पडणार नाहीत. सिग्नेचर स्टाइल म्हणून हॅटची ख्याती आहेच, पण ही फॅशन अभिनेत्रींनी कॅरी केल्यानंतर त्यांच्या सौंदर्याचा हिस्सा बाजूला सारतो आणि काहीच वेळात फक्त शोभेची वस्तू म्हणून त्या हॅटच्या फॅशनकडे पाहिले जाते. ओव्हरसाइज्ड आणि अति डेकोरेटिव्ह हॅट्स अभिनेत्रींच्या डोक्यावर पहिल्या की त्या लगेचच ट्रोल होऊ न व्हायरल होतात. दीपिकाने एका प्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हरसाठी ओव्हरसाइज्ड हॅटचा लुक ठेवला होता. तिचा तो लुक ट्रोल झाला किंबहुना सोशल मीडियावर लगेचच अशा फॅशनचे ट्रोलिंग होतेच. तरीही हॅट्सची फॅ शन या सगळ्या टीकेला पुरून उरली आहे. फॅ शनविश्वात स्टाइल स्टेटमेंट म्हणून या गोल टोपीकडे नव्याने पाहिले जाते आहे!