गायत्री हसबनीस
स्पा ही संकल्पना अगदी पाचशे वर्षांपूर्वीची जुनी. सध्या ही संकल्पना पुन्हा लोकप्रिय झाली असली तरी त्याच्याभोवती सेलेब्रिटींचे किंवा उच्चभ्रू वर्गाचे वलय आहे. बाहेरदेशी भटकंतीचा अनुभव असलेल्या तरुणाईसाठी मात्र स्पा हा सध्या परवलीचा शब्द ठरतो आहे. तरीही स्पा म्हणजे काय, तिथे आरोग्याच्या दृष्टीने नेमकी काय थेरपी घ्यावी, नवनवीन थेरपींबद्दलचे अज्ञान आणि महागडे असेल ही भावना अशा अनेक गोष्टींमुळे इच्छा असूनही तिथे जाण्याबद्दल संभ्रम असतो. स्पा क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंतांशी बोलताना याचे महत्त्व अधोरेखित होते..
‘स्पा’ या एका शब्दावरून खरं तर अनेक समज आणि गैरसमज आहेत आणि ते मुख्यत: स्पा संस्कृती, त्याचा खर्च, स्पामध्ये काम करणारे कर्मचारी कसे असतील, अशा अनेक गोष्टींबाबत आहेत. आत्ताची तरुण पिढी स्पाकडे स्टेटसच्या दृष्टीने पाहते, तर दुसरीकडे असा एक वर्ग आहे जो स्पा म्हटलं की खर्च या एकाच विचाराने दूर राहतो. सोप्या भाषेत सांगायचे तर स्पा हा आपल्या शरीराला आराम मिळावा या गोष्टीसाठी आहे. आपल्या जीवनशैलीत सध्या ताणतणाव आहेत, धावपळ आहे मात्र आराम कुठेही नाही.
मुळात स्पामध्ये फक्त सेलेब्रिटी जातात आणि आपल्याला त्याची गरज नाही, हा समज मोडीत निघण्याची गरज आहे, असं मत या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी व्यक्त करतात. स्पा ट्रीटमेंटचे महत्त्व समजावून सांगताना ‘स्पाब्युलस’ स्पाचे संचालक प्रसाद राणे सांगतात, ‘स्पा ही एक अशी ट्रीटमेंट आहे ज्यात तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा आराम मिळतो. एक सोप्पं उदाहरण द्यायचं झालं तर जिम करणारी व्यक्ती आणि जिम न करणारी व्यक्ती दोघांचीही स्वत:ची जीवनशैली असते. मात्र जिमला जाणारी व्यक्ती नियमितपणे स्वत:ला मेन्टेन ठेवते याउलट जिमला न जाणारी व्यक्ती किंवा व्यायाम न करणारी व्यक्ती सतत थकलेली, आजारांना तोंड देणारी असते. अगदी तंतोतंत हाच फरक आहे स्पा थेरपी नियमितपणे घेत असलेल्या व्यक्तींमध्ये आणि स्पाचा शब्दही न उच्चारणाऱ्या व्यक्तींमध्ये.. स्पा थेरपीत मसाजमुळे शरीरातील रक्ताभिसरण संस्था सुरळीत राहण्यास मदत होते’.
वयाची पंचविशी आली की त्यानंतर शरीराला मसाजची गरज असते. आपल्या शरीरातील स्नायूंना मसाजची गरज असते. मसाज करण्याचा फायदा म्हणजे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. त्यामुळे आरोग्याला प्राधान्य देत लोकांनी स्पा संस्कृती एकदा अनुभवायला हवी, थेरपीज समजून घ्यायला हव्यात, असे राणे यांनी सांगितले. स्पा शिक्षणात दर १५ दिवसांनंतर स्पा ट्रीटमेंट घेतली पाहिजे, असे म्हटले आहे. मसाज हा सगळ्यांनी घ्यायला हवा मात्र काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. एखाद्याला मुका मार लागला असेल किंवा खूप दुखत असेल, वेदना होत असतील तर त्या वेळी मसाज घेऊ नये, असा सल्लाही प्रसाद यांनी दिला.
स्पा मुळातच आपल्या आणि इतर देशांतही खूप वर्षांपूर्वी रुजलेली संकल्पना आहे. त्यामुळे आपल्याकडे विशेष करून आयुर्वेदिक स्पा ट्रीटमेंट मिळते. अनेकदा हॉटेल-रिसॉर्ट्समध्ये स्पा ट्रीटमेंटची सोय उपलब्ध करून दिलेली असते. त्यामुळे पर्यटनातून त्याचा जास्त प्रसार होतो आहे. मालदीव येथे ‘द रेसिडन्स’ या इन्स्टिटय़ूटमध्ये स्पा थेरपिस्ट म्हणून काम पाहणारे योगेश सावंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पामधील फरक समजावून सांगतात. ते म्हणतात, लोकांना आपण भारतात स्पा घ्यावा की परदेशात याची माहिती नसते. स्पा ही संकल्पनाच परदेशी आहे, त्यामुळे तिथल्याच (पान ३ वर) (पान १ वरून) खर्चीक-महागडय़ा उपचार पद्धती इथे उपलब्ध करून दिल्या जातात, असा लोकांचा गैरसमज आहे. दोन्हीकडे पहिला फरक असतो तो किमतीचा. परदेशात जी ट्रीटमेंट तुम्ही साडेतीन हजार रुपये खर्चून घ्याल ती इथे तुम्ही हजार रुपयात करू शकता. मात्र स्पा काय आहे हे अनुभवण्याच्या अनिच्छेमुळेच त्याभोवती गैरसमजांचे जाळे आहे, असे मत योगेश यांनी मांडले.
‘मुळात स्पा उद्योगात काही गैरव्यवहार चालतो का?, या शंकित चष्म्यातूनच स्पाकडे बघितले जाते. स्पाकडून मिळणारी ट्रीटमेंट ही चांगल्या उत्पादनांच्या आधारेच दिली जाते. मात्र याही क्षेत्रात स्पर्धा आहे. ग्राहकांना खूश करण्यासाठी अनेकदा कमी किमतीत तुम्हाला थेरपीज उपलब्ध करून दिल्या जातात. मग मसाज एवढय़ा कमी किमतीत कसे शक्य आहे, ही शंका अनेकांच्या मनात घर करते. अशा वेळी आपण कुठली ट्रीटमेंट घेतो आहोत, आपल्याला ट्रीटमेंट देणारे कर्मचारी प्रशिक्षित आहेत का, याची माहिती घ्यावी. पूर्णत: प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून ट्रीटमेंट देणाऱ्या स्पामध्ये जावे, अशी माहिती ‘स्पा सिडेस्को’चे संदेश कुलकर्णी यांनी दिली. ‘स्पामध्ये ऑईल ट्रीटमेंट दिली जाते तेव्हा हेअर ट्रीटमेंटसाठी वापरले जाणारे तेल हे एकदा डोक्याची मालिश झाल्यानंतर आपोआप ते तेल उलटरीत्या केसांमधील डॅण्ड्रफ आणि इतर घटकांसह खाली पडते. ते तेल तुम्ही एक वेळ त्वचेवर वापरू शकाल मात्र केसांना वापरून चालत नाही. अशा छोटय़ा – छोटय़ा गोष्टींबाबत काही स्पामध्ये काळजी घेतली जात नाही. स्पामधील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लोकांचा अविश्वास आणखी वाढत जातो. शिवाय, अनेकदा स्पामध्ये रूम लॉक केल्या जात नाहीत. मग ग्राहकांना भीती वाटते. म्हणून अधिकृतरीत्या नोंद झालेल्या स्पामध्येच जाणे हिताचे आहे, असेही संदेश यांनी सांगितले.
स्पा थेरपीमध्येही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज आहेत. हेअर स्पा, फुट स्पा असे प्रकार आहेत. स्त्रियांनी ब्युटी सलोनपेक्षा स्पाकडे वळायला हवे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. मात्र इथेही शरीर आणि चेहरा सुंदर ठेवण्यासाठी स्पा उपयोगी ठरू शकतो हे अनेकांना माहिती नसल्याने तिथे जाण्यास स्त्रियांकडून टाळाटाळ केली जाते. स्पा संस्कृती हा सुंदर अनुभव ठरू शकतो. त्यासाठी गरज आहे ती फक्त स्पामधील थेरपीज समजून घेण्याची, प्रशिक्षित थेरपिस्टकडून माहिती घेऊन त्याप्रमाणे या थेरपी घेतल्या तर त्याचा फायदा नक्की होईल.
स्पा थेरपींमधील हे काही प्रकार..
* स्पा थेरपी किंवा मसाज हा लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत अगदी सर्वाना लाभदायी आहे. स्पा ट्रीटमेंटमध्ये अरोमाथेरपी नियमितपणे दिली जाते. यात कमी प्रेशरचा मामला असतो. जी व्यक्ती आयुष्यात पहिल्यांदाच स्पा थेरपी घेते त्यांना अरोमाथेरपी दिली जाते. जिम करणाऱ्या व्यक्तींना बोटाने, हाताने मसल्सवर आणि बॉडी स्ट्रेचिंगसाठी डीप मसाज दिला जातो कारण त्यांच्या शरीरयष्टीला ते सूट व्हावे लागते.
* थाईथेरपी ही थायलंडकडून आलेली असून त्यात ड्राय मसाज असतो. बॅलिनेसमध्ये (इंडोनेशियन पद्धत) ऑईलचा वापर करून मसाज दिला जातो. स्विडीश मसाजसुद्धा याच प्रकारचा असतो.
* हॉट स्टोनथेरपी हा एनर्जी वाढवण्यासाठी दिला जातो. अभ्यंग मसाज हा आयुर्वेदिक मसाज आहे, ज्यात स्नेहन आणि स्वेदन असे दोन प्रकार आहेत. स्नेहन म्हणजे ऑईल मसाज तर स्वेदन म्हणजे स्टीम मसाज असतो. हा स्टीमथेरपीसारखा तो प्रकार असतो. पोटली मसाज (थाई हर्बल कॉप्रेस मसाज) या मसाजमध्ये हर्बल पॅक्स असतात जे गरम पाण्यातून पाठीला शेक देण्यासाठी असतात. फूट रिफ्लेसोलॉजी या प्रकारात आपल्या ज्या नसा आहेत त्या तळपायापर्यंत असतात मग त्यानुसार पायांवर मसाज दिला जातो. लोमी लोमी मसाज (हवाइन स्टाइन) हाही एक नावखा प्रकार आहे. कपिंग मसाजमध्ये काही व्हॅक्युम सिलिकॉन कप किंवा कॅपलरीने शरीराच्या भागांवर रक्त शोषून हा मसाज दिला जातो. हा मसाज स्पोट्स प्लेअर किंवा स्विमर घेतात.
* युरोपियन मसाज ज्या पद्धतीने आहे त्याप्रमाणे भारतीय संस्कृतीत केरळकडील आयुर्वेदिक मसाज सर्रास घेतला जातो.