डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना! थिअरी ते प्रॅक्टिकलमधल्या गमतीजमतीमुळेच डाएटचा संकल्प धुळीला मिळतो. डाएटचं मनावर घेतलेल्या टीनएजर मुलीची ही डायरी त्यासाठीच!
आई! मावशी कशी आहे? खरं तर बरोबर प्रश्न चुकीच्या वेळेस विचारला. असं तुमचं कधी होतं का? आपल्याला एखादा प्रश्न विचारायचा असतो. तो आपण या वेळी विचारला तर आपल्याला माहीत असतं की, त्यावरून रामायण घडणार आहे, प्रश्न का विचारला म्हणून पश्चात्तापाची वेळ येणार आहे. प्रश्नाचा नसला तरी उत्तराचा रोख आपल्याकडे वळणार आहे आणि त्यानिमित्ताने जगाला उद्देशून आणि साऱ्या पिढीचाच उद्धार होणार आहे. थोडक्यात, ‘आ बल मुझे मार!’ सिच्युएशन.
तर.. ‘मावशी कशी आहे?’ विचारलं आणि हे सगळं ऐकलं. पहिलं आईचं स्वगत, मग आताच्या पिढीतल्या मुलींना उद्देशून बडबड आणि शेवटी मात्र उपयुक्त सल्ले. त्या उपयुक्त सल्ल्यांसाठी हे सगळं लिहिते आहे. तुम्ही सर्व तिच्यासमोर असता तर तुमची काही खैर नव्हती, हे लक्षात ठेवा. पण उद्देश चांगला अर्थातच, हे खरं.
काय ह्य़ा सध्याच्या मुली. काय तुमची लाइफस्टाइल.. ती मावशी बघ. तुझ्यासारखीच वेळी-अवेळी खाण्याची सवय होती. नको तितकी जागरणं, झोपेचा अभाव, ताण या सगळ्यामुळे किती त्रास होतोय तिला. वेळीच काळजी घेणं किती महत्त्वाचं असतं हे वेळ गेल्यावरच उमगतं. आता वेळ तुमच्या हातात आहे, तर तुम्ही सर्व वेळेला महत्त्व देत नाही. हवा तितका वेळ तुमच्या आजूबाजूला जणू बागडत असतो. पण तो सत्कारणी लावणं जमत नाही. आत्ता या वयापासूनच काही चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत, म्हणजे पुढचं सगळं व्यवस्थित होतं. पण तुमचं सगळं आयुष्य ‘नंतर’ या शब्दाभोवती फिरणारं. व्यायाम कर- नंतर, अभ्यास- नंतर, घर आवरणं- नंतर, स्वयंपाक शिकणं- नंतर.. सगळं नंतर. या नंतरला वेळ नसतो आणि नंतर वेळ अशी येते की काही करून त्याचा फायदा नसतो..
तुम्ही मुली वयात येता, प्रेमात पडायची अक्कल असते. पण जरा व्यायाम करतील तर शपथ. व्यायामामुळे शरीराला एक शिस्त लागते. व्यायामामुळे स्नायू मजबूत होतात. हाडं भक्कम होतात. शरीराला एक प्रकारचा पीळदारपणा येतो. आपलं व्यक्तिमत्त्व बनायला मदत होते.. आई बोलत होती. आपणच आपल्या शरीराला दिलेला त्रास व काढलेला घाम आपलं व्यक्तिमत्त्व कसं घडवू शकतो? हा केवळ मनात आलेला प्रश्न न विचारलेलाच बरा, असा विचार करून मी गप्प बसले. पण तेवढय़ात सर्व तरुण जवान डोळ्यासमोरून गेले. प्रजासत्ताक दिनाचा राजपथवरील सोहळा चित्रपटासारखा डोळ्यापुढून गेला. ‘प्रहार’ सिनेमा इतक्या वेळा बघितलाय की, त्यात नाना पाटेकरांनी जवानांकडून करवून घेतलेला व्यायाम बघून शरीर नुसतं फुरफुरायला लागतं.
आई सांगत होती, आम्ही लहानपणी स्काऊट-बुलबुलमध्ये जायचो. व्यायाम करायचो मग जी काही भूक लागायची की, समोर माणूस दिसला तरी खाऊ शकू एवढी. आत्ताच्या तुम्ही मुली व्यायाम नाही, त्यामुळे खाणंही नाही. नाही तर सर्व उलटं.. छातीपेक्षा पोट मोठं. या सर्वात तुम्हाला कळत नाही की तुमच्या प्रजननशक्तीवर इतका वाईट परिणाम होत असतो.. या वयात कळत नाही आणि पुढे कळून उपयोग नसतो. प्रजननशक्तीसाठी पौष्टिक आहार लागतो. मासिक पाळी नियमितपणे येणं हे अत्यंत गरजेचं आहे. स्त्रीचं स्त्रीपण त्यात आहे. चौरस आहार गरजेचा आहे. खाण्याच्या वेळा सांभाळणं, दर तीन तासांनी पौष्टिक खाणं हे गरजेचं आहे. फळं, भाज्या पालेभाज्या महत्त्वाच्या. त्यातून जीवनसत्त्वं मिळतात. डाळी, उसळी, अंडी, मांस-मच्छी आपल्याला प्रथिनं देतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते व शरीराची कार्यक्षमता वाढते. नियमितपणे मर्यादित प्रमाणात पिष्टमय पदार्थाचं सेवन शरीराला सक्षम बनवतं. मेंदूला पूरक ऊर्जा देतं. गरज नसताना मदा, साखर, तेलकट गोष्टींनी वजन वाढतं. सारखं सारखं मॅकडोनल्ड, बर्गरकिंग, मॅड ओवर डोनट, केएफसी वगरेमधलं फास्टफूड, गरज नसताना शीतपेय, आइस्क्रीम, चॉकलेट खाणं सर्वात वाईट. खूप साखर शरीराला आळशी बनवते. चयापचय क्रियेवर परिणाम करते. तुम्ही मुली ३०-३५ पर्यंत मूल व्हायची वाट बघता. काही जणी ४० पर्यंत जातात, तरी खरी कारणं कळत नाहीत.
तरुण वयात अरबटचरबट खात, वजन वाढवून ठेवलंत की त्याचे परिणाम होतात मोठेपणी. मग लग्नासाठी म्हणून भरपूर पसे देऊन स्लीिमग क्लिनिकमध्ये जालही तुम्ही. थोडय़ाशा कष्टात गरजेपुरतं बारीक होताही तुम्ही तेवढय़ापुरत्या. ते काही हेल्दी शरीर नाही. ते बारीक होणं म्हणजे अशक्त होणं. या सगळ्याचा परिणाम प्रजननशक्तीवर होत असतो. मग पुन्हा भरपूर पसे देऊन उपचार करून घ्यावे लागतात.. काय होणार या पिढीचं! अखेर या समेवर येऊन आई शांत झाली. इतकं बम्बार्डिग माझं डाएट शेडय़ुल कायम ठेवायला आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठून व्यायाम करायला पुरेसं होतं.