अगदी आपल्या वाटणाऱ्या पदार्थाचं मूळ परदेशी असतं तर परक्या देशातून आलेल्या एखाद्या पदार्थाचं कूळ आपल्याच प्रांतात सापडतं. आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा हा प्रयत्न.
खाद्यसंस्कृती ही नदीप्रमाणे जिथे वाहत जाईल तिथे समृद्धी आणणारी असते. आपल्या स्वसंस्कृतीमधले खाद्यपदार्थ आपल्यासाठी खास असतातच पण परकीय संस्कृतीमधले काही पदार्थ आपल्या जीवनात असे बेमालूम मिसळले जातात की, त्यांना आपल्या आयुष्यातून वगळणं केवळ अशक्य होतं. असे असंख्य पदार्थ आहेत. पण त्यापैकी एक असणाऱ्या बिस्किटांशिवाय भारतीय घरांची कल्पनाच करता येऊ शकत नाही. चाय बिस्कुट हा अनेकांचा सकाळचा नाश्ता आहे. पण त्याहीपलीकडे आकर्षक पॅकिंगमधल्या महागडय़ा बिस्किटांपासून इराणी हॉटेलात नगावर मिळणाऱ्या बिस्किटांपर्यंत आणि आपल्या घरातल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या बिस्किटांपासून ते चहाच्या टपरीवरील काचेच्या बरणीतील नानकटाईपर्यंत ही बिस्किटं सर्वसंचारी आहेत. ती इतकी आपलीशी झाली आहेत की, बिस्किट्स हे अनेकवचन आपल्याला माहीत असूनही त्यांचं बिस्किटं हेच देशी रूप तोंडात बसतं.
आपल्या घरातील पाहुणचाराचा महत्त्वाचा भाग ठरलेला हा पदार्थ कौन देशसे आया है? हा विचारबिचार आपण करत नाही. कारण एकतर आपलं कर्तव्य पोटपूजेशी असतं आणि दुसरं असं की पदार्थ कोणत्याही देशातून येवो त्याला भारतीय रुपडं देण्यात आपण पटाईत आहोत. पण तरीही जाणून घ्यायचं झालं तर बिस्किटांचं मूळ आहे रोमन संस्कृतीत. लॅटिनमध्ये बिस म्हणजे दोनदा आणि कोक्टस म्हणजे बेक वा कुक केलेले. दोन वेळा बेक केलेला पदार्थ म्हणजे बिस्किट अशी या पदार्थाच्या गुणधर्माला जागणारी साधी सोपी सुटसुटीत व्याख्या आहे. दोन वेळा बेक म्हणताना पहिल्यांदा बेक आणि दुसऱ्या वेळेस स्लो अवनमध्ये ड्राय अशा कृती इथे होतात. फार फार शतकांपूर्वी रोमन शेफ अपॅशियसने दिलेली पाककृती पाहा. उत्तम दर्जाचं गव्हाचं पीठ पाण्यात उकळून त्याची पेस्ट प्लेटमध्ये पसरवावी ती सुकली की, तिच्या वडय़ा पाडून त्या कुरकुरीत होईस्तोवर तळाव्या व नंतर मधासोबत खायला द्याव्या. ही पाककृती म्हणजे आपल्या बिस्किटांचं आद्यरूप.
बिस्किटं ही पूर्वापार आमआदमीचं खाणं म्हणून पाहिली गेली. या पदार्थाच्या निर्मितीचा हेतू चवीपेक्षा टिकाऊपणाशी अधिक जोडला गेला आहे. प्राचीन काळी रोमन मंडळी लांबच्या प्रवासाला जाताना सोबत बिस्किटं नेत असत. कारण ती साठवायला सोपी होती. शिवाय नेताना खराब होणे, सांडणे, लवंडणे असली भानगडच नव्हती. त्यामुळे हे प्रवासी खाणे होते. विशेषत: खलाशी वा सैनिक मंडळींच्या कामाचा विचार करता बिस्किटं त्यांच्यासाठी वरदान ठरली.
आजकाच्या बिस्किटांचं वैशिष्टय़ त्यांचा सहज तुकडा पडून तोंडात विरघळण्यात आहे. पण बिस्किटांच्या सुरुवातीच्या काळात ती जास्तीत जास्त कडक करण्याकडे मंडळींचा कल असायचा. कारण हेच होतं की प्रवासात, बोटीवर, सैन्याच्या सामानात ती कशीही हाताळली जाणार. डबे हिंदकळणार. अशावेळी ती तुटता उपयोगाचे नाही. त्यामुळे बिस्किटं कडकच असायची व खाताना ती कॉफीत बुडवून खाल्ली जायची. हा संदर्भ वाचल्यावर खूप बरं वाटलं. कारण कोणत्याही औपचारिक कार्यक्रमात बिस्किटं पुढे केली जातात, पण ती चहा वा कॉफीत बुडवून खाणं शिष्टाचारसंमत मानलं जात नाही. का? ते परमेश्वर जाणे! यापुढे आपण तर बुवा ठरवलंय. बिस्किटं चहात बुडवून खाताना बिलकूल बिचकायचं नाही. कोणी मध्ये शिष्टाचार आणलेच तर सरळ सांगू या की, आम्ही परंपरा जपतो.
गमतीचा भाग सोडा, पण या बिस्किटांच्या नावाचा आणखी एक मजेशीर इतिहास आहे. सैनिकांसाठी तयार बिस्किटं अशी कडक असायची की त्यांना ‘स्टोन ब्रेड’ म्हटलं जायचं. मराठीत दगडी पाव असं भाषांतर म्हणजे साक्षात दाताखाली बिस्किटाऐवजी खडाच. आणि एक उल्लेख असा की इंग्रज, स्कॉटिश व डच मंडळींनी अमेरिकेत बिस्किटं नेली तेव्हा त्यांना ‘टी केक्स’ म्हटलं जायचं.
एकूण काय, तर बिस्किटांची दुनिया बदलत बदलत आज अशा टप्प्यावर पोहोचली आहे की, प्रवासी खाणे म्हणून निर्माण झालेला हा पदार्थ खरंच प्रवास करत जगभरातल्या जवळपास प्रत्येक घरात पोहोचला आहे. आमआदमी ते हायप्रोफाइल डिझाइण्ड कॅटेगरी असा हा प्रवास वर्धिष्णू आहे. शिवाय पूर्वीचा कडकपणा सोडून या बिस्किटांनी स्वीकारलेली मृदुताही गोडच.
काही पदार्थ दुर्मीळतेने खास बनतात. बिस्किटाची खासियत मात्र त्याच्या सर्वसामान्य असण्यातच आहे. इंग्रज सायबाशी जोडलेल्या नात्यामुळे एक काळ असा होता की बिस्किट्स खाणाऱ्यांना धर्म बुडाल्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागलं होतं. आणि आजचं चित्र तर सर्वज्ञात आहे. मुलाने पसंत केलेल्या सुनेला पहिले नावं ठेवावी आणि नंतर तिचे सद्गुण अनुभवल्यावर ती लाडकी सून व्हावी तसंच आपल्याकडे बिस्किटांचं झालं. पदार्थामधली ही स्वगुणाने बंधनांच्या साखळ्या मोडायची ताकद म्हणूनच विलक्षण वाटते.
खास आवडीनिवडीच्या पलीकडे, दमूनभागून आल्यावर समोर चहाचा कप आणि आवडत्या बिस्किटांचा पुडा यावा. चहात बुडवल्यावर रसातळाला जाणार नाही, मध्येच कपडय़ांवर उडी घेणार नाही याची काळजी घेत बिस्किटाचा अलगद तुकडा मोडावा. चहात जसं ते बिस्किट विरघळतं ना तशीच विरघळल्याची अनुभूती आपण घेतो यात शंकाच नाही.