विनय नारकर

भारतीय हवामानासाठी सुती वस्त्रं जास्त सुसंगत आहेत. कापूसही इथे अमाप पिकतो. भारतीय सुती वस्त्रांनी जगावर अधिराज्य गाजविले. पण रेशमाची लकाकी आणि सळसळ कलासक्त भारतीय मनाला प्राचीन काळापासून मोहीत करत आली आहे.

nude painting
अन्वयार्थ: असभ्य, म्हणून अश्लील!
29th October 2024 Horoscope Today
Daily Horoscope, 29 October : धनत्रयोदशीला मेष, सिंहसह…
ratan tata wealth ratan tata rs 10000 crore wealth ratan tata net worth 2024
Ratan Tata Wealth : रतन टाटांची दहा हजार कोटींची संपत्ती; लाडक्या टिटोसाठीही हिस्सा राखला
corporate gifting gift trend on diwali occasion diwali gifts ideas for friends diwali gifts for family zws 70
भेटवस्तूंचा ट्रेण्ड
Vines are best used in hanging structures
निसर्गलिपी : झुलत्या रचना…
History of Bandhani
History of Bandhani: सिंधू संस्कृती ते अजिंठा; पाचहजार वर्षांच्या बांधणी-गाठी उलगडतात तेव्हा!
Harappan cooking techniques
Harappan Indus Valley Civilization: उलगडली हडप्पाकालीन खाद्यसंस्कृती; भांड्यांच्या अवशेषांमध्ये नेमके सापडले काय?
chhatrapati Shivaji maharaj statue collapse
मालवण : राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी वेल्डिंग करणाऱ्या तिसऱ्या आरोपीला अटक

भारतीय हवामानासाठी सुती वस्त्रं जास्त सुसंगत आहेत. कापूसही इथे अमाप पिकतो. भारतीय सुती वस्त्रांनी जगावर अधिराज्य गाजविले. पण रेशमाची लकाकी आणि सळसळ कलासक्त भारतीय मनाला प्राचीन काळापासून मोहीत करत आली आहे. भारताने जरीच्या विणकामात केलेल्या प्रगतिला रेशमामुळे इतकी झळाळी मिळाली. वस्त्रपरंपरेला, वस्त्रकलेला आपल्या समाजात, आपल्या मनात जिव्हाळ्याचे स्थान कायमच राहिले आहे. प्राचीन संस्कृत साहित्यातही याचे प्रतिबिंब उमटले आहे. वस्त्रपरंपरेचे दस्तऐवजीकरणही याद्वारे साध्य झाले आहे.

प्राचीन भारतात झाडाच्या सालीपासून आणि किडय़ापासून मिळालेले असे रेशमाचे दोन प्रकार होते. रेशीम किडय़ाच्या, कोषापासून बनलेले ‘कौषेय’ अशी फोड पाणिनीने आपल्या ‘अष्टाध्यायी’ ग्रंथात, चौथ्या अध्यायात दिली आहे. यालाच ‘कौशेय’ किंवा ‘कौशिक’ असेही म्हटले जाई. हे मुख्यत: एक प्रकारच्या बोरीच्या झाडावर वाढणाऱ्या कुसवारी या किडय़ापासून मिळायचे.

पातंजलीने ‘शातक’ नावाचे उत्तरीय व ‘शाती’ (यापासून ‘साडी’ या शब्दाची उत्पत्ती झाली असे मानले जाते), ही कौषेय वस्त्रे मथुरेत विणली जात होती, अशी नोंद केली आहे.

पाणिनीच्याही बऱ्याच आधी, यजुर्वेदातल्या ‘शतपथ ब्राह्मण’मध्ये ‘कौशं वास: परिधापयति’ असा उल्लेख आहे. हिंदू धर्म विधींमध्ये कौषेय वस्त्र परिधान करण्याला बरेच महत्त्व आहे. कौषेय वस्त्राला पवित्र मानले गेले आहे. यज्ञामध्ये सहभागी होताना स्त्रियांनी ‘चंदातक’ तर पुरुषांनी ‘तप्र्य’ हे कौषेय वस्त्र परिधान केले पाहिजे, असे सांगितले आहे. यज्ञ, विधी, पुजेमध्ये सुती वस्त्र वापरले असता, दुपारी भोजनसमयी ते पुन्हा धुवून वापरणे गरजेचे आहे. परंतु, कौषेय वस्त्र मात्र न धुता कितीही वेळा वापरता येऊ  शकते. किंबहुना, हे ओले असताना वापरणे अपवित्र मानले गेले आहे.

‘मिताक्षरा’ ग्रंथानुसार, कौषेय अस्वच्छ वा अपवित्र होऊ  शकत नाही. ते काही कारणानी अस्वच्छ झाल्यास, त्यास सूर्य प्रकाश दाखवून, हाताने झटकून किंवा फक्त पाणी शिंपडून पवित्र करता येते. कौषेय हे हवेने धुतले जाऊ  शकते, असंही म्हटलं जायचं.

मनु स्मृतीमध्येही कौषेयाबद्दलचे काही उल्लेख आले आहेत. यात कौषेय स्वच्छ करण्यासाठी क्षारयुक्त माती वापरावी, असं सांगितलं आहे. मनुस्मृतीमध्ये वस्त्र चोरी केल्यावर भोगावयास लागणाऱ्या परिणामांबद्दलही सांगितले आहे. कौषेयाची चोरी केली तर पुढच्या जन्मी तीतर पक्षी होणार, क्षौमा म्हणजे लिनन चोरल्यास मंडूक आणि सुती वस्त्र चोरल्यास पाणकोंबडी होणार, अशी भीती घातली आहे.

रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांमध्ये कौषेयचे उल्लेख आहेत. वाल्मीकी रामायणात, बालकांडामध्ये जनक राजाने त्याच्या चारही मुलींना हुंडय़ामध्ये कौषेय, सुती आणि क्षौमा वस्त्रे दिली, असं लिहिले आहे. अयोध्याकांडामध्ये सीतेला ‘कौषेयवसिनी’ म्हणजे नेहमी कौषेय वस्त्रे परिधान करणारी, असं संबोधलं आहे. पुढे, भरत जेव्हा रामाच्या भेटीसाठी अरण्यात येतो आणि त्या वेळेस तृणशय्येवर सीतेच्या कौषेय वस्त्राचे धागे पाहून खूप व्यथित होतो, असे वर्णन आहे.

महाभारताच्या ‘सभापर्वा’त कौषेय वस्त्राचा उल्लेख येतो. युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञावेळी देशोदेशीच्या राजांनी त्याला दिलेल्या भेटींचे वर्णन आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कौषेय वस्त्राया भेटी मिळाल्याचे सांगितले आहे.

कृष्णाची पट्टराणी असलेल्या रुक्मिणीचे शुभ्र कौषेय हे प्रिय वस्त्र असल्याचे व यशोदा क्षौमा वस्त्र परिधान करीत असल्याचे भागवत पुराणात सांगितले आहे. समुद्रमंथनातून लक्ष्मी प्रकटली असता तिला ‘पीतांबर’ हे कौषेय वस्त्र अर्पण केले, असेही भागवत पुराणात सांगितले आहे. रामाच्या आवडीचे वस्त्र म्हणून पीतांबराचा उल्लेख सगळीकडे होतो. तुलसीदासानेही ‘पीतांबरधारी’ रामाचे वर्णन केले आहे. श्रावणी पौर्णिमेची ‘राखी’ असो वा अनंत चतुर्दशीचे ‘अनंत बंधन’ हातात बांधल्या जाणाऱ्या धाग्यांचा मान मात्र पीतांबराचाच.

‘दिव्यावदान’ या बौद्ध कथा असलेल्या ग्रंथातही काही कौषेय वस्त्रांबद्दल माहिती मिळते. त्यात चीनमधून आलेल्या रेशमी वस्त्रास ‘चीनांशुक’ असे म्हटले आहे. कालीदासाच्या ‘कुमारसंभव’मध्येही चीनांशुकाचा उल्लेख येतो. ‘दिव्यावदान’मध्ये त्याशिवाय पट्टांशुक, धौतपट्टा, काशीकांशुक वा काशीका अशा कौषेय वस्त्रांचा संदर्भ येतो. काशी नगरामध्ये विणले गेलेले काशीकांशुक आणि काशीक वस्त्र ‘काशी’ या शब्दाचा अर्थही ‘चमकणारा’ असा आहे. त्यामुळे या वस्त्रांना दुहेरी अर्थ मिळाला आहे.

कालिदासाच्या नाटकांमधील व बाणभट्टाच्या ‘हर्षचरित’ मधील वस्त्रांबद्दल आपण आधीच्या लेखात सविस्तर माहिती घेतली आहे. बाणभट्ट त्याच्या, ‘कादंबरी’मध्ये राजकुमार चंद्रपीड, ‘इंद्रयुधजलांबर’ आणि ‘इंद्रायुधाजलवर्णनशुकोत्तरिया’ ही वस्त्रं परिधान करतो, असे वर्णन केले आहे. या वस्त्रांवर निरनिराळ्या आकारात रंगीबेरंगी पट्टे असतात. ही वस्त्रे गुप्त काळात बनू लागली, असा संदर्भ कौटिल्याच्या अर्थशास्त्रात सापडतो. अशी वस्त्रे अजिंठय़ाच्या चित्रांतही पाहायला मिळतात. अर्थशास्त्रात काशीक, पौद्रक, चीनपट्टा, मगधिका अशा अन्य कौषेय वस्त्रांची व ती जिथे विणली जायची त्या ठिकाणांची माहिती मिळते. मथुरा, कलिंगमथुरा, कलिंग, काशी, चम्पा किंवा भागलपूर आणि पुंद्र देश (बंगाल, उडिशा व आसाम) ही विणकामाची मुख्य केंद्र सांगितली आहेत.

चालुक्य राजा, सोमेश्वर (तिसरा) याने ‘मानसोल्लास’ (११२४-११३८) या आपल्या ग्रंथात भारतीय कला आणि कारागिरीबद्दल सुरेख विवेचन मांडले आहे. त्यामध्ये राजांसाठी विणण्यात येणाऱ्या वस्त्रांची व त्यांच्या ठिकाणांची लांबलचक यादी दिली आहे. त्यात चोला साम्राज्यामधील नागपटणा, गुजरातमधील अहालिलपताका, पंजाबमधील मुलस्थान वा मुलतान, कलिंग आणि वंग ही भारतीय नावे येतात.

आधुनिक काळातही भारतीयांचे रेशमाचे वेड तसेच आहे. कालौघात काही वस्त्र परंपरा टिकल्या, काही बदलल्या, काही नष्ट झाल्या पण रेशमाची झळाळी मात्र तसूभरही कमी झाली नाही. किंबहुना ही रेशीमगाठ आणखी घट्ट झाली आहे.