व्हायरल म्हटल्यावर केवळ इन्फेक्शनच डोळ्यासमोर येते. पण नेटविश्वात सैरावैरा होणे म्हणजेच व्हायरल अशी मायाजालाची परिभाषा. मायाजालाला व्यापून टाकणाऱ्या इन्फेक्शनची गोष्ट – ‘व्हायरलची साथ’मध्ये.
व्हायरलची साथ
सन्मय वेद हा गुजरातमधल्या कच्छ भागातला टेक्नोक्रॅट म्हणावा असा माणूस. कामाच्या निमित्ताने तो इंटरनेटवर वेगवेगळी डोमेन नेम (डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूने सुरू होणारा कुळपत्ता) धुंडाळत होता. डोमेन नेम मिळालं की अर्धी मोहीम फत्ते तुमची. ठाशीव ब्रँडेड युनिक ओळख मिळते तुम्हाला. तुमचं स्वामित्व (कॉपीराइट) राहतं त्यावर. व्हर्च्युअल का होईना तुम्ही मालक होता त्या पत्त्यावर राहणारे. कंपनीचं किंवा स्वत:च्या नावाचं डोमेन नेम मिळवण्यासाठी फार स्पर्धा असते. आपल्याकडे आरटीओकडे ९९९९ नंबर मिळवण्यासाठी असते तशी.
अशी हुडकोगिरी सुरू असताना सन्मयच्या मांडी संगणकाच्या(लॅपटॉप) स्क्रीनवर एक डोमेन अवतरलं. तो चक्रावला. त्याने आजूबाजूला पाहिलं, आपण स्वप्नात तर नाही यासाठी चिमटाही काढला. अहो, का म्हणून काय विचारता. खरेदीसाठी उपलब्ध डोमेनचं नाव होतं-गुगल.कॉम! साक्षात मायाजालातलं सगळ्यात खपणीय आद्य डोमेन कसं मिळू शकतं? हा प्रश्न त्यालाही पडला. सुवर्णसंधी सोडता कामा नये या विचारातून त्याने पुढची प्रोसेस पूर्ण केली. आणि थोडय़ाच वेळात त्याच्या इनबॉक्समध्ये ‘गुगल.कॉम’ हे डोमेन अधिकृतपणे तुम्हाला देण्यात येत आहे असा खुद्द गुगलकडून मेल आला. सन्मय प्रोसेस पूर्ण करत असतानाच गुगलच्या शक्तिशाली सव्र्हरमध्ये हायअलर्टचा बझर झाला. मदमस्त जमीनदाराला घरदार, वाडी-अंगण, गायीगुरं, ऐतिहासिक दागिने, भांडीकुंडी हे सगळं क्षणार्धात यकश्चित पामराला द्यावं लागलं तर कसं होईल तसंच झालं. इकडे सन्मय वेडा व्हायचा बाकी होता. आठखंडी विश्वकोशाचा संपादक झाल्यासारखं वाटलं त्याला. अहो, अगदी आतापर्यंत ‘ग’ म्हटलं की ‘ग’ ची बाधा होणे हा वाक्प्रचार आठवायचा आम्हाला. पण गुगलजींच्या आगमनानंतर ‘ग’चा स्पेक्ट्रमच बदलला. तर असा गुगलमालक झाल्याचा सन्मयचा आनंद अवघं ६० सेकंद टिकला. जगभरातल्या शक्तिशाली गुगल सुरक्षा यंत्रणा जागृत झाल्या आणि त्यांनी सन्मयच्या हाती गेलेल्या साम्राज्याची घरवापसी केली अधिकृतपणे.
सन्मयला कळेचना की हा काय मॅटर आहे. मित्रांच्या प्रॅन्कचे शिकार तर नाही ठरलो आपण अशी शंकाही आली. तेवढय़ात त्याला दुसरा मेल आला गुगलकडून, बक्षिसाचा. आपण पार जांगडगुत्यात अडकलो असंच वाटू लागलं त्याला. पण हे बक्षिसाचं खरं होतं. गुगलचे जगभर हितचिंतक पसरलेले, तेवढेच शत्रूही. शत्रू कुठूनही हल्ला करू शकतो हे ओळखून गुगल कंपनी स्वत:च आवतण देते. आमची सिस्टम क्रॅक करा. तुम्हाला बक्षीस मिळेल, आम्ही ती तटबंदी मजबूत करू. म्हणजे कसं ‘आमच्या घरातली भगदाडं सांग असं चोराला सांगायचं आणि ती बुजवून चोराचं आदरातिथ्य करण्यासारखं’. ‘गुगल सिक्युरिटी रिवॉर्ड्स’ असं गोंडस नाव आहे पुरस्काराचं. तर सन्मयला याअंतर्गत ६,००६.१३ डॉलर्स एवढी प्रचंड रक्कम जाहीर झाली.
बक्षिसाचा असा अतरंगी आकडा का यातही मेख आहेच- 6006.13 हा आकडा नीट पाहिला तर यातून ‘गुगल’ असे शब्द दिसतात म्हणे. सन्मय खाऊनपिऊन सुखी घरातला. त्याने ही रक्कम प्राथमिक शिक्षणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला देण्याचं ठरवलं. ही वार्ता गुगलपर्यंत पोहचली. त्यांनी ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ला जागत बक्षीसरक्कम दुप्पट केली. सन्मयने ही रक्कम संस्थेला सुपूर्द केली आणि एक वर्तुळ पूर्ण झालं. सन्मयनं बक्षीसरक्कम गुलदस्त्यात ठेवली होती. परवाच गुगलने गेल्या वर्षीचा अहवाल रिलीज केला, त्यातून आकडय़ांचा खेळ समोर आला. केवळ घर राखण्यासाठी गुगलने गेल्या वर्षभरात तब्बल ३०० मिलिअन डॉलर्स खर्च केलेत. आतापर्यंत शत्रूला बेसावध ठेवून गनिमी कावा करण्याची मेथड माहिती होती; पण शत्रूला बक्षिसी देऊन साम्राज्य वाढवण्याची शक्कल भारी की नाही.. उगाच ग-गुगलचा झालं नाही मंडळी!
कोणी ‘गुगल’ घ्या..
सन्मय वेद हा गुजरातमधल्या कच्छ भागातला टेक्नोक्रॅट म्हणावा असा माणूस.

First published on: 05-02-2016 at 01:40 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How things get viral on internet