नकाशावर ठिपक्यापेक्षाही छोटं अस्तित्व असणाऱ्या गावापासून क्रीडा विश्वाचा मानबिंदू असलेल्या ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास. खेळात कारकीर्द, धावण्याचं प्रशिक्षण, वॉर्मअप, ट्रॅक अशा परिभाषेचा गंधही नसलेल्या वातावरणातून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून घडण्याचा प्रवास सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊतने केसरी प्रस्तुत लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या निमित्ताने उलगडला. अडचणींचा पाढा, खडतर परिस्थितीमुळे वैैफल्य यांचा जराही उल्लेख न करता कविताने उपस्थितांना सकारात्मकतेची पुंजी दिली. बोलण्यापेक्षा धावण्यावर म्हणजेच कृतीवर भर देणाऱ्या कविताच्या कहाणीने उपस्थितांना नुसतं जिकलं नाही तर ‘खेळतं’ होण्यासाठी प्रेरणाही दिली. भविष्यात कविता राऊत घडाव्यात यासाठीची तिची धडपड व्यक्ती ते समष्टी हे क्षितिज सांधणारी होती. अॅथलेटिक्स ट्रॅक आणि शर्यतींचे मार्ग गाजवणाऱ्या कविताला ‘लोकसत्ता’च्या अरुंधती जोशी आणि रोहन टिल्लू यांनी गप्पांच्या मॅरेथॉन मैफलीत बोलतं केलं.
शहर बघण्याची प्रेरणा..
नाशिकपासून ७० किलोमीटरवर आमचं गाव आहे. गावाची लोकसंख्या ५००च्या आसपास. गावात शाळेची सोय नव्हती. म्हणून घरच्यांनी आश्रमशाळेत दाखल करण्याचा निर्णय घेतला. पहिलीपासून मी निवासी स्वरूपाच्या या शाळेतच शिकले. मुलीला लिहिता-वाचता आलं पाहिजे ही घरच्यांची इच्छा होती. मुलगी बाहेर गेली तर बसची पाटी वाचता यायला हवी इतका साधा हेतू होता. घरच्यांची स्वप्नं छोटी होती, पण त्यांचं द्रष्टेपण विलक्षण होतं. आम्ही तीन भावंडं. मोठा भाऊ आणि माझ्यात तीन वर्षांचं अंतर. लहान भाऊ त्याहून लहान. आश्रमशाळेत भावाला मार मिळाला तर मला रडू येत असे, असं आमचं घट्ट नातं. आमच्या सावरपाडय़ात शिकलेली अशी मी एकटीच मुलगी. पिण्याच्या पाण्यासाठी दोन-दोन किलोमीटपर्यंत जावं लागत असे. दैनंदिन आयुष्यातला हाच संघर्ष खेळताना कामी आला. खेळ असं काही असतं आणि त्यात कारकीर्द वगैरे घडवता येते हे ठाऊकही नव्हतं, तेव्हा. खरं तर कारकीर्द म्हणजे काय याचीच कल्पना नव्हती. घरात, गावी, आश्रमशाळेत कुठेही टीव्ही नव्हता. त्यामुळे टीव्ही पाहून प्रेरणा मिळण्याचा विषयच नव्हता. ‘शहर कसं असतं, ते बघता येईल’ या हेतूने मी स्पर्धामध्ये भाग घ्यायचे. चौथीत असताना शाळेत ४०० मीटर शर्यतीत पहिला क्रमांक मिळवला. वडील फॉरेस्ट विभागात कार्यरत होते. थोडे पैसै जमले तेव्हा त्यांनी हरसूलमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने सुरू झालेल्या शाळेत मला घातलं. आमच्या आश्रमशाळेतल्या काही मुली याही शाळेत होत्या. त्यांनी पी.टी.च्या शिक्षकांना माझ्याबद्दल सांगितलं – सर, ही खूप पळते. त्यांना हे कळल्यावर मला शालेय पातळीवरच्या शर्यतींसाठी पाठवलं गेलं. तालुका आणि जिल्हास्तरावरील शर्यतीत पहिला क्रमांक पटकावला. १९९८ साली पहिल्यांदा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले. प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी मला कुठे सराव करतेस विचारलं? तोपर्यंत मी धावण्याच्या औपचारिक शिक्षणाला सुरुवातच केली नव्हती. ते नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या शाळेत येण्याची त्यांनी सूचना केली. मात्र उत्तर प्रदेशातल्या हिंदी बोलणाऱ्या प्रशिक्षकाकडे आपली मुलगी काय शिकणार, अशी चिंता पालकांना होती. तेव्हा साधं मराठीही मला धड बोलता येत नव्हतं. त्यांच्याशी संवाद कसा साधणार असाही प्रश्न होता. मात्र मला सांभाळणाऱ्या काका-काकूंनी, विजेंदर सरांनी घरच्यांना समजावलं. मला तिथपर्यंत पोहोचायचं होतं. अखेर त्यांना पटलं आणि वेगळ्या प्रवासाला सुरुवात झाली.
काटकपणा आणि ऊर्जा हवी
कुठल्या प्रकारात खेळायचं याचा निर्णय अॅथलिटपेक्षाही प्रशिक्षक घेतो. सरावाच्या दरम्यान धावपटूचा आकृतिबंध, त्याची ताकद, तंदुरुस्ती, वेग हे प्रशिक्षक समजून घेतो. मी लांब पल्ल्याची धावपटू आहे. त्याच्यासाठी एन्डय़ुरन्सची गरज असते. ऊर्जा खेळती राहणं अत्यावश्यक असते. १०० मीटर धावण्यासाठी प्रचंड वेगाची गरज असते, आम्हाला ऊर्जेची. लांबपल्ल्याच्या धावपटूंना आहारातही द्रवरूप ऊर्जेची गरज जास्त असते. हाय प्रोटिन डाएटची तेवढी गरज नसते, एनर्जी देणारे पदार्थ लागतात. भात, केळी, ज्यूस यांचा आमच्या आहारात समावेश असतो. मासिक पाळीचा धावण्याच्या क्षमतेवर काहीच परिणाम होत नाही. आम्ही कुठलंही औषध त्यासाठी घेत नाही. या दिवसातही सराव सुरूच असतो. या काळात स्वतची काळजी कशी घ्यावी हे प्रशिक्षणादरम्यान सांगितलं जातं. मात्र वाढत्या वयाचा परिणाम जाणवतो. अॅथलेटिक्सपटूंची कारकीर्दीची व्याप्ती जास्त आहे. मॅरेथॉन शर्यतीकरता रस्त्याचा वापर होतो तर बाकी धावण्याच्या शर्यतींसाठी ट्रॅकचा उपयोग होतो. रस्त्यावर चढउतार असतात. ट्रॅक समान असतो. त्यामुळे दोन्ही प्रकारांसाठी सरावाची पद्धत बदलते. व्यायामशाळेतही जातो. मात्र पॉवर बेस्ड व्यायाम करीत नाही. अॅथलेटिक्समध्ये वजनी गटाचा निकष नसतो. काही कारणांमुळे वजन वाढलं तर धावताना काही तरी वाढीव जाणवतं. हे वजन कमी करावं लागतं. वजन कमी झालं असेल तर दुखापतीची शक्यता वाढते. अशा वेळी वजन वाढवावं लागतं. एक विशिष्ट वजन स्थिर राहणं आवश्यक असतं. प्रतिस्पर्धी खेळाडू काय करत आहेत यापेक्षा स्वत:च्या प्रशिक्षणावर भर असतो. याव्यतिरिक्त दिवसभरात आम्ही काय करत आहोत याकडे लक्ष द्यावं लागतं. रिकव्हरीचा मुद्दा महत्त्वाचा असतो.
तिरंगा उंचावतो तेव्हा..
पदक मिळतं तेव्हा तिरंगा फडकावला जातो. आपल्या कामगिरीमुळे हा तिरंगा फडकतोय ती भावना सुखावणारी असते. एरवी फक्त सैनिकांना हा मान मिळतो. मी खेळाडू आहे. देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे म्हणूनच तिरंगा फडकतो. देशाचं नाव उज्ज्वल करणारी मीही एक सैनिक आहे असंच तेव्हा वाटतं.
वेगाचा बादशहा भेटला
ऑलिम्पिकदरम्यानच क्रीडानगरीत वेगाचा राजा अवलिया उसेन बोल्टला ‘याचि देही याचि डोळा’ बघता आलं. त्याच्याशी बोलणं होऊ शकलं नाही. मात्र तो जो खेळ खेळतो तोच आपण खेळतो याचा अभिमान वाटला. त्याच्याप्रमाणे पदके आपल्यालाही मिळावीत असं वाटून गेलं. ऑलिम्पिक क्रीडानगरीत सर्व क्रीडापटू राहतात. सगळ्यांच्या न्याहरी आणि भोजनाची व्यवस्था एकाच ठिकाणी असते. त्या वेळी जगभरातल्या दिग्गज क्रीडापटूंना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळते. मला जेवढं इंग्रजी येतं तेवढं अन्य देशांतल्या खेळाडूंनाही येतं. त्यामुळे इतर देशांतल्या खेळाडूंशी संवाद होतो. त्यांना मेहनतीमुळे सोयीसुविधा मिळाल्या आहेत. मीही तेवढे कष्ट घेतले तर मलाही तेवढी सोयीसुविधा मिळतील ही भावना मनात दाटते. रिओहून आल्यानंतर लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. पात्रता फेरीत जी वेळ नोंदवली होती ती देऊ शकले नाही. याचं वाईट वाटलं.
छंद एकच धावण्याचा..
सराव, स्पर्धा, प्रवास यामुळे मोकळा वेळ मिळतच नाही. आठवडय़ातून एक दिवस विश्रांतीचा असतो. जोपासण्यासाठी छंद असे काहीच नाहीत. धावणं, ते कसं सुधारता येईल, पुढे जाता येईल याचेच विचार डोक्यात घोळत असतात. चित्रपटही अगदी मोजकेच बघू शकते. राष्ट्रीय शिबिरादरम्यान ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपट दाखवण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वी नाशकात ‘दंगल’ चित्रपट पाहण्याचा योग आला. बाकी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहतच नाही. तेवढा वेळही नसतो. याच वर्षी ऑगस्टमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी तयारी सुरू झाली आहे. तिथे पदक पटकवायचं आहे.
मॅरेथॉन मूलमंत्र
सराव असेल तरच मॅरेथॉन शर्यतीत पळता येतं. मॅरेथॉनसाठी चांगले शूज असणं एवढंच साहित्य पुरेसं आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदा मुंबई मॅरेथॉनमध्ये ४२ किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. ३८ किलोमीटरनंतर चढावाचा टप्पा आला. तो क्षण अवघड होता. पुन्हा मॅरेथॉन धावणार नाही, असंच ठरवावंसं वाटलं तेव्हा. मला ही शर्यत पूर्ण करू दे, असा धावा देवाकडे केला. या शर्यतीनंतर ध्यानधारणेचं महत्त्व समजलं. मानसिक क्षमता वाढवण्यासाठी मग आर्ट ऑफ लिव्हिंग आणि ब्रह्मकुमारीचा अभ्यासक्रमही पूर्ण केला.
मॅरेथॉन सराव
आठवडय़ाला किमान १८२ ते २०० किलोमीटर इतकं मी सराव म्हणून पळते. ऑफसीझनमध्ये जास्त. कारण शरीराला शैथिल्य येतं. त्या वेळी २५० किलोमीटर आठवडय़ाला पळण्याचा सराव होतो. ४२ किलोमीटरची शर्यत पळायची असेल तर दिवसाला ३०-३५ किलोमीटर पळायला हवंच ना!
ऑलिम्पिक अनुभव
ऑलिम्पिक वारीत झिका व्हायरसची खूप चर्चा होती. आपल्याही देशात प्रसिद्धीमाध्यमांनी बातम्या दिल्या होत्या. मला मात्र ‘झिका’ची भीती वाटली नव्हती. १४ तारखेला शर्यत झाली. १५ तारखेला मला ताप आला. हा ताप संसर्गजन्य असल्यामुळे कदाचित माझ्या सहकाऱ्यांनाही तापाची लागण झाली. ओ.पी. जैशा आणि सुधा यांना स्वाइन फ्ल्यू झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र ‘झिका’ची लागण झाली नव्हती.
पहिली ‘नॅशनल’ बुटांशिवायच!
धावण्याच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली, पण माझ्याकडे शूज नव्हतेच. दोन राष्ट्रीय स्पर्धामध्ये अनवाणी पायांनीच पळले मी. २००१ मध्ये गांधीनगर येथे झालेल्या स्पर्धेत अनवाणी पायांसह धावताना तिसरी आले. त्यानंतर चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेत शूज मिळाले, पण बुटांची सवय नसल्याने कामगिरी घसरली. सिंथेटिक ट्रॅकवर शूज घालून धावलं तर पायांना ग्रिप मिळते हे प्रशिक्षकांनी समजावून सांगितलं. मात्र सवय नसल्याने शूज घालून धावण्याचा सरावासाठी मला खूप वेळ गेला. विश्व हिंदू परिषदेची आश्रमशाळा असल्याने आधीही माझा दिवस रोज सकाळी ५ वाजता दिवस सुरू व्हायचा. सूर्यनमस्कार घालायचो. पण हा व्यायाम आहे, शरीराला आवश्यक आहे हे नाशिकला येईपर्यंत कळलं नव्हतं. आजही सकाळी ४ वाजता दिवस सुरू होतो आणि रात्री साडेनऊपर्यंत संपतो. विजेंदर सरांनी वसतिगृहाऐवजी त्यांच्या घरी राहण्याची व्यवस्था केली आणि मुलीसारखी काळजी घेतली. एखादा माणूस आपल्यासाठी एवढं करतो, तर त्यांच्या ऋणासाठी जिंकणं आवश्यक आहे असं वाटायचं. त्यांनी माझ्यासाठी एवढं केलंय त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा एकच उपाय वाटायचा, तो म्हणजे सर्वोत्तम प्रदर्शनासह जिंकणं. २००४ मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले. मलेशियात जाण्यासाठी निघाले तेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच विमानात बसले. लहानपणी गावातील घरात असताना बाहेर विमानाची घरघर ऐकू आली की, आम्ही विमान पाहण्यासाठी अंगणात धूम ठोकायचो. त्याच विमानात आपण बसलोय यावर माझा विश्वासच बसला नाही. हॉटेल कधीच पाहिलं नव्हतं. त्यातून थेट पंचतारांकित हॉटेलात राहण्याची ती पहिलीच वेळ होती. न्याहरी आणि भोजनासाठी तिथे असणारे पदार्थ पाहून अवाक झाले. काय खायचं, काय नाही हेच कळेना. शेवटी थोडी फळं घेतली आणि जेवण संपवलं. मात्र माझा नेहमीचा आहार बदलल्याने कामगिरीवर परिणाम झाला. त्यातून चांगल्या सरावासाठी, कामगिरीसाठी आहाराचं महत्त्व पटत गेलं.
आहारआचरणाचा सराव
आइसक्रीम, पाणीपुरी पाहिलं की आमच्याही तोंडाला पाणी सुटतं. परंतु ते खाता येत नाही. एक दिवस सराव केला नाही किंवा चुकवला तर १५ दिवस पिछाडीवर पडायला होतं. ही हानी भरून काढणं अत्यंत कठीण असतं. वर्षभराची मेहनत वाया जाऊ शकते. विभिन्न वातावरणात धावण्यासाठी आम्ही स्वत:ला बदलवून घेतो. वर्षभराचं वेळापत्रक ठरलेलं असतं. त्यानुसार सराव करतो. सुरुवातीला तसं नव्हतं. साधा वॉर्मअप म्हणजे काय असतं हे ठाऊक नव्हतं. सुरुवातीला स्पर्धाच्या वेळी शहरातले धावपटू वॉर्मअप करताना दिसायचे. ते करत आहेत म्हणजे ते शरीराला फायद्याचं हे जाणवायचं, म्हणून ते बघून वॉर्मअप करायला सुरुवात केली. मग प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर शरीर गरम करण्याचं, स्ट्रेचिंगचं महत्त्व कळलं. धावणं हा खडतर व्यायाम आहे. त्यासाठी शरीराला तयार करणं अत्यावश्यक असते.
लग्नानंतर कारर्कीद बहरली
लग्न झाल्यावर कविताची कारकीर्द संपली असं लोक म्हणत होते. माझी कामगिरीत घसरण झाली होती. खेळ सोडावा असे विचार मनात डोकावत होते; परंतु नवरा आणि सासरच्यांनी भक्कम पाठिंबा दिला. लग्न झाल्यानंतर कारकीर्दीला खीळ बसते असा गैरसमज आहे. तालुका ते आशियाई स्तरापर्यंत पदक पटकावून कर्तृत्व सिद्ध केलं आहे. तर एकदा क्रीडा विश्वातल्या सर्वोच्च अशा ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करायचं होतं. मी लग्नानंतर तीन वर्षांत ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व केलं. लग्नानंतर पाच दिवसांत राष्ट्रीय शिबिरासाठी रवाना झाले. सासरच्या प्रोत्साहनामुळेच हे शक्य झालं. सासरच्यांनी स्वयंपाक येतो का हेदेखील आतापर्यंत विचारलं नाही. लग्न झाल्यावर मोकळी होऊन खेळू शकले. पती महेश तुंगार एमएसईबीमध्ये इंजिनीअर आहेत. त्यांची शिफ्ट डय़ुटी असते. स्वत:ची नोकरी सांभाळून ते माझ्यासाठी वेळ देतात. त्या अर्थाने त्यांची डबल डय़ुटी होते. पहाटे माझ्याआधी त्यांचा अलार्म वाजतो. मी खेळावर लक्ष केंद्रित करते आणि बाकी गोष्टी ते सांभाळतात. पहाटे आणि संध्याकाळीही ते माझ्याबरोबर सरावाला उपस्थित असतात. जीपीएस लावून ते माझ्याबरोबर सरावात सहभागी होतात. माझी कारकीर्द बहरण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
पैसा, प्रसिद्धी चांगली पण..
खेळाडूला यश मिळालं की विविध स्वरूपाची निमंत्रणं येतात. जाहिरातींचे करार, सदिच्छादूत म्हणून संधी मिळते. परंतु या कार्यक्रमांमध्ये बराच वेळ जातो. सरावाला कमी वेळ मिळतो आणि कामगिरीवर परिणाम होतो. यासाठी दोन्ही आघाडय़ांवर संतुलन राखण्याची गरज आहे.
आणखी कविता घडवायच्या आहेत..
एक कविता राऊत घडली यावर थांबून चालणार नाही. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करेल अशी किमान आणखी एक कविता घडवायची आहे, यासाठी अकादमी स्थापनेचा विचार आहे. सरकारने मला क्लास वन अधिकाऱ्याची नोकरी दिली आहे. सध्या मी ‘ओएनजीसी’त काम करतेय. पण राज्य सरकारची नोकरी मिळावी यासाठीदेखील प्रयत्न आहेत. केंद्राच्या नोकरीपेक्षा राज्य सरकारच्या सेवेत कदाचित पगार कमी मिळेल, पण मला ग्रामीण भागात काम करायची संधी मिळेल. मी आदिवासी विभाग कार्यक्षेत्र म्हणून देण्याची विनंती सरकारला केली आहे. इथे राहिले तर आणखी कविता घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतील. २०१० पर्यंत आमच्या सावरपाडय़ाला जायला साधी पायवाट होती. दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मी पदक पटकावलं. गावात जल्लोषात स्वागत झालं. काही महिन्यांतच आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकाचा रंग बदलला. या मधल्या काळात गावी जाण्यासाठी डांबरी सडक झाली. आज माझ्या गावात चौथीपर्यंत शाळा आहे आणि ही शाळा ‘डिजिटल’ आहे. गावात पाण्याची टंचाई आहे. या प्रश्नासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
महाराष्ट्राची स्थिती चांगली!
एनआयएस पतियाळा आणि बेंगळूरुयेथील केंद्रांमध्ये मी गेली दहा र्वष राष्ट्रीय संघाच्या शिबिराच्या निमित्ताने जाते आहे. या दोन ठिकाणी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध होतात. मनात येताक्षणी वस्तू मिळणार नाही, पण मागणी केल्यास काही दिवसांतच आवश्यक साहित्य उपलब्ध होतं. हरयाणा हे राज्य क्रीडा क्षेत्रासाठी मिळणाऱ्या सोयीसुविधांच्या बाबतीत अग्रणी आहे. परंतु आपल्या राज्याची स्थितीही चांगली आहे. राष्ट्रीय शिबिरात भारतातल्या विविध राज्यांतल्या मुली एकत्र राहतो. राजकारणी किंवा अन्य कोणी माणसं काय म्हणतात याचा परिणाम होत नाही. मला एकदाही भेदभाव किंवा तत्सम गोष्ट जाणवलेली नाही.
योग्य वेळी मदतीचा हात हवा
मुलं-मुली लहान असतानाच त्यांना चांगल्या दर्जाचं प्रशिक्षण मिळालं तर उपयुक्त ठरू शकतं. राष्ट्रीय पातळीवर गेल्यावर क्रीडापटूंना सोयीसुविधा मिळू लागतात. हेच सगळं तालुका पातळीपासून मिळू लागलं तर आपलेही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरल्या दिग्गजांना टक्कर देऊ शकतात. विदेशी खेळाडूंच्या तुलनेत आपण जराही मागे नाही. राष्ट्रीय विजेतेपद पटकावल्यावर भारतीय संघाच्या शिबिरासाठी निवड होते. मग नोकरी शोधावी लागते. कारण आर्थिक स्थैर्य लाभलं तरच खेळाडू मुक्तपणे खेळावर लक्ष केंद्रित करू शकतात. ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केल्यानंतर मला प्रायोजकत्व मिळालं आहे. खेळ सोडण्याच्या टप्प्यावर असताना आता हे प्रायोजकत्व आणि आर्थिक मदत मिळतेय. ऑलिम्पिकला आपण मागे का पडतो याचं कारण यामध्ये आहे. क्रिकेटेतर खेळाडूंनी राष्ट्रकुल आणि आशियाई दर्जाच्या स्पर्धामध्ये पदक पटकावताना आम्ही कुठेही मागे नसल्याचं सिद्ध केलं आहे. क्रिकेट सोडून दुसऱ्या खेळांना खासगी कंपन्यांनी पाठिंबा दिल्यास परिस्थिती बदलू शकते.
रिओचं पाणी
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पाणी न दिल्याच्या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, त्यामध्ये समजुतीची गफलत झाली. ऑलिम्पिक संयोजकांनी शर्यतीच्या मार्गावर पाण्याची व्यवस्था केली होती. परंतु त्या दिवशी आद्र्रता प्रचंड असल्याने पुरवलेलं पाणी कमी पडलं. धावपटू ओ. पी. जैशा आणि मी २००६ पासून एकत्र सराव करत आहोत. पण रिओतला प्रकार प्रशिक्षक आणि संघव्यवस्थापन यांच्यात परिस्थिती समजण्यावरून गडबड झाली. वैयक्तिक ऊर्जाद्रव्यासंदर्भात व्यवस्थापकांनी विचारणा केली. तेव्हा ओ. पी. जैशा अनुपस्थित होती. वैयक्तिक ऊर्जाद्रव्यांच्या आठ बाटल्या मिळू शकतील, असं स्पष्ट करण्यात आलं, मात्र मी संयोजकांनी पुरवेलेलं पाणी पिणं पसंत करीन असं सांगितलं होतं.
‘त्यांच्या’ जिंकण्याचं रहस्य
केनिया, नायजेरिया, इथिओपियाचे खेळाडू धावण्यात माहीर असतात. काटक असतात. पण ते वेगळं काहीच करत नाही. आपला जगण्याचा संघर्ष असतो तसाच त्यांचाही असतो. अफाट कष्ट करण्याची त्यांची तयारी असते, क्षमता असते. प्रशिक्षणाच्या निमित्ताने २०१२ मध्ये मी पाच महिने केनियात होते. त्यांचं आयुष्य समजून घेता आलं. मानसिक संघर्ष करण्याची त्यांची क्षमता प्रचंड आहे.
अॅथलेटिक्स सोडणार नाही!
कोणताही खेळाडू ठरवून खराब कामगिरी करत नाही. अपयश खेळाचा भाग आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना आपल्यामुळे तिरंगा फडकला पाहिजे, हाच विचार डोक्यात असतो. कोणी काहीही म्हटलं तरी मजा करण्यासाठी भारतीय खेळाडू ऑलिम्पिक किंवा कोणत्याही मोठय़ा स्पर्धेत जात नाहीत. प्रसारमाध्यमांत आमच्या हेतूविषयी शंका घेतल्यावर राग येतो. अशा वेळी मानसिक संतुलन राखणं प्रशिक्षणाचा भाग असतो. क्रिकेट तसंच अन्य खेळांच्या तुलनेत अॅथलेटिक्सला कमी महत्त्व आणि प्रसिद्धी मिळते याची जाणीव आहे, पण म्हणून हा खेळ सोडावासा वाटत नाही. खेळ कोणताही असो, प्रत्येक खेळाडू जिंकण्यासाठी मेहनत घेतो.
खेळाकडे कारकीर्द म्हणून नाही तर सुदृढ जीवनशैलीचा पर्याय म्हणून युवा पिढीने पाहावं. खेळायला सुरुवात करण्यासाठी वयाची अट नाही, नियमित सराव मात्र महत्त्वाचा. स्वत:च्या क्षमतेवर विश्वास असेल तर ताण येत नाही.