हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.
आपली खेळणी आपलं प्रतिबिंब असतात. वर्षांनुर्वष एखादं खेळणं सांभाळून ठेवताना त्यात आपली खेळण्यातली गुंतवणूक पण दिसू लागते. बाहुली तर सगळ्या चिमण्यांसाठी अगदी खास. आपलंच रूप त्या बाहुलीत पाहणाऱ्या मुलीकडे कितीही बाहुल्या असल्या तरी एक बाहुली तिच्यासाठी खास असते आणि असा हा खास ऋणानुबंध जपणारी ‘ती’ म्हणजे ‘बार्बी.’
चिंध्यांच्या, कापडी, लाकडी बाहुलीपासून ‘बार्बी’पर्यंतचा प्रवास म्हणजे मुलींच्या खेळविश्वाचाच प्रवास आहे. पुलंचं ‘अपूर्वाई’तलं वर्णन आठवतं. ‘आमच्या लहानपणी ज्यांना बाहुल्या म्हणत त्या पदार्थाचे वर्णन काय करावे? एका लाकडी ओंडक्यावर पिवळे, तांबडे, हिरवे रंग असत. ही बाहुली टेकूशिवाय उभी राहिली नाही. आणि आयुष्यात खाली बसली नाही. तिचा उपयोग खेळणे, खिळा ठोकणे, जात्याचा खुंटा बसवणे अशा विविध प्रकारे केला जाई.’ पुलंच्या या वर्णनाच्या पाश्र्वभूमीवर बार्बीचं आगमन किती वेगळं होतं ते लक्षात येतं.
१९४५ साली रूथ आणि इलियट हँडलर दांपत्याने मॅटल (टं३३ी’) नामक खेळण्यांच्या कंपनीची स्थापना केली. मुलांसाठी खेळणी बनवताना सातत्याने त्यांना काही नवं देता येईल का? याचा विचार रूथच्या डोक्यात असायचा. असंच एकदा रूथने आपल्या लेकीला कागदी बाहुलीसोबत खेळताना पाहिलं. खेळताना ती बाहुली कधी चिअर लिडर होत होती तर कधी डॉक्टर. ते दृश्य पाहताना मुलींच्या भावविश्वाला साकारेल अशी बाहुली बनवण्याचा विचार रूथच्या डोक्यात आला. त्यानंतर कुटुंबासह स्वित्र्झलड येथे सहलीला गेले असताना रूथने जर्मनमेड ‘लीली’डॉल पाहिली. ती रूथच्या कल्पनेतील बाहुलीशी मिळतीजुळती होती. मात्र ही बाहुली मुलांच्या खेळण्यासाठी नाही तर शोकेसमध्ये प्रदर्शनासाठी उपलब्ध होती. याच ‘लीली’डॉलवरून प्रेरित होऊन रूथने असंख्य डिझाइन्स आजमावली. त्यातून एक मॉडेल तयार झालं. सोनेरी केसांच्या देखण्या रूपाच्या या बाहुलीला रूथने आपल्या मुलीच्या बार्बराच्या नावावरून सुबक नाव दिलं.. बार्बी..
१९५९ मध्ये न्यूयॉर्क सिटीतल्या टॉयफेअरमध्ये पहिली बार्बी विक्रीसाठी ठेवण्यात आली. तीन डॉलर्स किमतीची ही बाहुली अनेक अर्थानी खास होती. अधिकतर बाहुल्या त्याकाळी बाळरूपात आढळायच्या. त्यामुळे त्या बेबीडॉलपेक्षा भविष्यात आपण एक तरुणी म्हणून कसे दिसू याचा आदर्श आपल्या रूपातून देणारी ही सोनेरी केसांची, झाकपाक कपडे करणारी तरुण बाहुली मुलींना भावली. पहिल्याच वर्षी तीन लाख बाहुल्यांच्या खपासह बार्बी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. पहिली बार्बी ताठच्या ताठ होती. १९६५ साली तिचे मुडपणारे पाय आणि उघडझाप करणारे डोळे आले. १९६७ साली तिची कंबर तिला हलवता येऊ लागली. या बदलांवर छोटय़ा मुली खूश होत्या. ही बार्बी खूप साऱ्या वेषांमध्ये विविध कार्यक्षेत्रं घेऊन त्यांच्यासमोर येत होती. ती कधी नर्स होती, कधी अंतराळवीरांगना तर कधी आर्किटेक्ट. आतापर्यंत अशी १८० कार्यक्षेत्रं बार्बीने स्वत:मार्फत चिमुकल्या डोळ्यांत रुजवली आहेत.
बार्बी घराघरांत स्थिरावल्यावर ‘मॅटल’ कंपनीने तिचा परिवार आणला. बार्बीला पूर्ण नाव देण्यात आलं. ‘बार्बरा मिलीसेंट रॉबर्ट.’ तिचा बॉयफ्रेंडसुद्धा आहे, ‘केन कार्सन’. त्यानंतर तिचा इतर मित्रपरिवार आणि कुटुंब विस्तारतच गेलं. विविध टप्प्यांवर बार्बीला प्रचंड लोकप्रियतेसोबत रोषालाही सामोरे जावे लागले. बार्बीच्या आखीव देहाकडे पाहात अगदी तस्संच दिसण्याचा अतिरेकी अट्टहास छोटय़ा मुलींत निर्माण होणं हा एक वादाचा मुद्दा होता. तिची शरीरयष्टी बालमनासाठी पूरक नाही हादेखील एक भाग होता. या सगळ्या दोषांचा विचार करत बार्बीत बदल करण्यात आले. गोऱ्यापान रूपासह काळ्या-सावळ्या रंगाची बार्बी अवतरली. इतकंच नाही तर विविध देशांच्या संस्कृतीप्रमाणे तिचा पेहरावही बदलला. १९८७ साली भारतात बार्बी पहिल्यांदा आली. १९९६ मध्ये ती भारतीय स्त्रीच्या साडीच्या पेहरावात अवतरली. मात्र तिच्या पाश्चिमात्य पेहरावाइतकं तिच्या भारतीय रूपाचं कौतुक काही झालं नाही. बार्बीच्या असंख्य रूपातलं खास नोंदवण्यासारखं रूप म्हणजे कॅन्सरग्रस्त मुलींची अवस्था लक्षात घेऊन तयार केलेली केसविरहित ‘एला’ नामक बार्बी.
बार्बीचं प्रत्येक रूप, तिचे कपडे, तिचं कपाट, तिचा सगळा संसार चिमुरडय़ांना नेहमीच आपलासा वाटला आहे. बार्बीच्या वेगवेगळ्या रूपांचा संग्रह अनेक छोटय़ा मुलींचं स्वप्न असतं. मात्र संगणक आणि मोबाईल युगात बार्बीच्या विक्रीत घट झालेली दिसून आली आहे. चिमुरडय़ांचं सगळं जगच आता आभासी होऊ लागलं आहे. या आभासी जगात बाहुलीचं स्वप्नविश्व त्यांना किती जोपासता येईल ते काळच ठरवेल. तरीही आईबाबांचं बोट धरून खेळण्यांच्या दुकानात शिरलेलं छोटं पिल्लू जेव्हा विस्फारलेल्या डोळ्यांनी पापण्यांची उघडझाप करत त्या बार्बीकडे आजही पाहताना दिसतं, त्यावेळी चिमण्या जिवांशी जोडलेल्या सगळ्या काळ्या सावल्या क्षणांत स्वप्निल होऊन जातात.
बार्बी हा केवळ ब्रँड नाही. बार्बीज मॉम रूथ हँडलर यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर बार्बी म्हणजे आपण कोण व्हावं हे चिमुकल्या जिवांनी बाहुलीच्या माध्यमातून पाहिलेलं स्वप्न आहे. बार्बी एक वास्तव समोर आणते. हो! स्त्रीदेखील निवड करू शकते. म्हणून तर बार्बीची टॅगलाइन आहे, ‘यू कॅन बी एनिथिंग..’
अनेक चिमुकल्या डोळ्यांत स्वप्न भरणाऱ्या, त्यांच्या जगण्याला कल्पिताची जोड देणाऱ्या या लहान बाहुलीची सावली म्हणूनच खूप मोठी आहे. खरंच ‘हर लाइफ इन प्लास्टिक इज फँण्टॅस्टिक..!’
viva@expressindia.com