हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.
काही ब्रँडची नावं म्हणजे कोडी असतात. वर्षांनुवर्षे ते उत्पादन आपण वापरतो, पण हे कोडं काही उलगडत नाही. डाबर या नावाबद्दल असाच अनुभव येतो. डाबर हे एक आडनाव आहे की आणखीन काही हे जाणून घ्यायलाच हवं. १८८० साली पश्चिम बंगाल राज्यातील डॉक्टर एस के बर्मन आपल्या आसपासच्या परिसरात वैद्यकीय सेवा बजावत होते. कॉलरा, मलेरिया अशा भयंकर आजारांवर त्यांनी दिलेल्या औषधांमुळे अनेक रुग्णांना आराम पडला. गोरगरिबांपर्यंत सर्व वैद्यकीय सुविधा पोहोचवण्याची डॉक्टरांची मनापासून इच्छा होती. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांचं नाव सर्वदूर झालं. डॉक्टर बर्मनला स्थानिक भाषेत डाक्टर बर्मन म्हणत. त्यांचा भारतातील समृद्ध आयुर्वेदिक परंपरेवर खूप विश्वास होता. नैसर्गिक वनौषधींचा वापर जनमानसात अधिक सहज व्हावा ही त्यांची इच्छा होती. म्हणून १८८४ साली त्यांनी आयुर्वेदिक तसंच नैसर्गिक वनौषधींपासून औषधं बनवण्यास सुरुवात केली. प्रारंभी या व्यवसायाचं स्वरूप छोटंसंच होतं, पण १८९६ पासून उत्पादन मोठय़ा प्रमाणावर सुरू झालं. त्या काळात तपासणी करून स्वत:च्या मात्रेत औषधं देणारे वैद्य होते, पण सर्वसाधारण आजारांवर चालतील अशी प्रमाणित औषधं बाजारात उपलब्ध नव्हती. याच गोष्टींचा विचार करून डॉक्टर बर्मन यांनी स्वत:ची प्रयोगशाळा सुरू केली आणि नैसर्गिक वनौषधींपासून सिद्ध प्रमाणित औषधं बाजारात आणली. डाक्टर बर्मन हे नाव सुपरिचित असल्याने डाक्टर मधला ‘डा’ आणि बर्मनमधली पहिली दोन इंग्रजी आद्यक्षरे ‘बर’ घेऊन डाबर हे ब्रॅण्डनेम निर्माण झाले.
डॉक्टरांनी उद्योग सुरू केला, पण तो वाढवण्यात त्यांच्या मुलाचा सी. बर्मन यांचा वाटा मोठा होता. काही औषधे डाबरमुळे जनमानसात रुजली. च्यवनऋषींनी वेदकाळात सांगितलेले आणि चरकसंहितेत नमूद असलेले च्यवनप्राश डाबरमुळे आपल्याला कळले. शुद्ध मधासाठी आपण डाबर हनीवर निर्धास्त झालो. लहान बाळासाठी बाळगुटी घेताना ती डाबरचीच ना? हे चार वेळा तपासत आलो. त्यामागे आहे या ब्रॅण्डवरचा विश्वास. आज हा ब्रॅण्ड औषधांपलीकडे प्रचंड विस्तारला आहे. काही काही उत्पादनांची नावं वाचल्यावर तर असं वाटतं की, ‘अरेच्चा! हे डाबरचं आहे?’ ही यादी मोठी आहे. डाबर आमला तेल, डाबर वाटिका, ब्राह्मी आवला तेल, फेम फेअरनेस क्रीम, गुलाबरी, डाबर रेड टूथपेस्ट, मिसवाक, बबूल, ओडोनील, ओडोमास, सॅनीफ्रेश, ओडोपिक, रियल फ्रूट ज्यूस, होममेड गार्लिक जिंजर पेस्ट, हाजमोला, पुदिनहरा, हनीटस, डाबर लाल तेल ही आणि अशी असंख्य उत्पादन आज घराघरांत पसरली आहेत. हेल्थ केअरचीच २६० उत्पादनं आहेत. १९९८मध्ये व्यावसायिकदृष्टय़ा विचार करून बर्मन कुटुंबाखेरीज काही तज्ज्ञ मार्गदर्शकांवर डाबरची धुरा सोपवली गेली. २००० साली डाबरच्या अनेक उत्पादनांनी हजार कोटींची उलाढाल पूर्ण करत आपला दबदबा निर्माण केला. २००८ साली जर्मन कंपनी फ्रेसेनिअस एसईने डाबर इंडियाचे काही हक्क विकत घेतले. डाबरच्या विविध उत्पादनांच्या टॅगलाइन्स वेगवेगळ्या असल्या तरी संपूर्ण डाबर परिवाराचे ब्रीद आहे, ‘सेलिब्रेटिंग लाइफ’. डाबरचा नैसर्गिक वनस्पतींवरचा विश्वास आणि उत्पादनातील नैसर्गिकता जपण्याचा प्रयत्न त्यांच्या बहरत्या वृक्षाच्या लोगोतून दिसून येतो.
आज आयुर्वेदाची संपन्न तत्त्वे मांडणारी उत्पादनं मोठय़ा प्रमाणात लोकप्रिय होऊ लागली आहेत. तरी १३३ वर्षांची परंपरा सांगणारा डाबर हा तितकाच महत्त्वाचा ब्रॅण्ड आहे. काही ब्रॅण्ड आपण रोज वापरत नाही तरी आपल्याला त्यांची खात्री वाटते. डाबर हा असाच ब्रॅण्ड आहे. कधीही वापरला तरी शाश्वत!