हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.
ब्रॅण्ड्सची निर्मिती ही एक मजेशीर गोष्ट आहे. म्हणजे कुणा एकाला एखादी कल्पना सुचते, त्याप्रमाणे तो आपला ब्रॅण्ड विकसित करतो मग मागून इतर सगळे त्याचं अनुकरण करू लागतात. असे एकाच उत्पादनाचे खूप सारे ब्रॅण्ड्स उपलब्ध झाले की ग्राहकांचा गोंधळ वाढतो. पण काही ब्रॅण्ड्स असे असतात की वर्षांनुवर्षे त्यांना स्पर्श करण्याचा कुणी विचारही करू शकत नाही. ‘डेटॉल’ हा असा ब्रॅण्ड आहे. अनेक वर्षे या ब्रॅण्डला कोणी प्रतिस्पर्धी नव्हता. मात्र आता प्रतिस्पर्धी निर्माण होऊनही डेटॉलवरचा लोकांचा विश्वास अबाधित आहे.
साधारण १९२७च्या दरम्यान ‘पॅराक्लोरोमेटाक्सीलेनॉल’ हे जंतुनाशक विकसित करण्यात आलं. या लांबलचक नावामुळे त्याचा ‘पीसीएमएक्स’ असा शॉर्टफॉर्म करण्यात आला. सुरुवातीच्या काळात या जंतुनाशकाचा वापर इस्पितळातील शस्त्रक्रियांपुरता मर्यादित होता. पण त्याची उपयुक्तता दैनंदिन जीवनातही लक्षात आल्यावर ते सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू झाले. नावाचा विचार करता (जे पूर्ण वाचण्याचे आपण कष्टही घेत नाही) ही शास्त्रीय संज्ञा समजायला कठीण म्हणून या जंतुनाशक द्रव्याचे नामकरण करण्यात आले. हे जंतुनाशक विविध फॉर्मुल्यांसह विविध नावाने विकले जात असे. पण जो फॉम्र्युला आणि जे नाव खऱ्या अर्थानं प्रस्थापित झालं ते म्हणजे ‘डेटॉल’.
‘रॅकीट अॅण्ड सन्स’ हे घरगुती वापराचा स्टार्च, नीळ यांचे उत्पादक होते. त्यांनीच १९३०च्या दरम्यान डेटॉल ब्रॅण्ड बाजारात आणला. ‘रॅकीट अॅण्ड सन्स’ जॉन बेनकिझर यांच्या कंपनीत सामील झाल्यावर ‘रॅकीट बेनकिझर’ अर्थात आरबी ग्रुपकडून डेटॉल ब्रॅण्ड विकला जाऊ लागला. या कंपनीची अन्य उत्पादनं म्हणजे स्ट्रेपसील गोळ्या, व्हीट हेअर रिमूवर. भारतात डेटॉल १९३२-३३ पासून आहे. जंतुनाशक ही वैद्यकीय वापराची गोष्ट सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात रुजवणं तसं कठीणच होतं. पण जे जंतुनाशक डॉक्टर्स वापरतात त्याबद्दल लोकांच्या मनात साधारणपणे अधिक विश्वास दिसतो, त्यामुळे डेटॉल स्वीकारलं गेलं. अर्थात आज जशी घराघरात डेटॉल बाटली असते तशी तेव्हा नक्कीच नव्हती, पण वापर हळूहळू वाढत गेला. भारतात डेटॉल स्थिरावण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे १९८२-८३ दरम्यान लोकांच्या मनात विविध आजारांबद्दल निर्माण झालेला फोबिया. नव्वदच्या दशकात सॅवेलॉन येईपर्यंत डेटॉलला पर्याय नव्हता. जवळपास ८० वर्षांचा हा ऋणानुबंध आजही ताजा आहे. लहान बाळांचे कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारं जंतुनाशक ते मोठय़ात मोठय़ा जखमांचं र्निजतुकीकरण करणारा संरक्षक असा त्याचा आधार कायम आहे. हॅण्डवॉश, साबण, शेविंग क्रीम ते बॉडीवॉश अशा विविध रूपात डेटॉल आपल्या सुरक्षेसाठी सज्ज असतं. हॅण्डवॉशच्या कॅटेगरीत एकटय़ा डेटॉलचं मार्केट ५० टक्क्यांहून अधिक आहे.
डेटॉल साबण भारतात आणताना चक्क फॅमिली साबण म्हणून आणला गेला, पण डेटॉल लिक्विडशी ही प्रतिमा मिळतीजुळती नव्हती त्यामुळे तो प्रयत्न फारसा यशस्वी ठरला नाही. १९८४ मध्ये हाच साबण त्याच्या मूलभूत जंतुसफाईच्या गुणांसह बाजारात आणला गेला आणि आजवर जंतुसफाईसाठी आपल्याला ‘डेटॉल डेटॉल हो’ शिवाय फारसं काही पटत नाही.
डेटॉलची बाटली ही आधीपासूनच आकारानं औषधांच्या बाटल्यांच्या आकाराशी मिळतीजुळती ठेवली गेलीय त्यामुळे तो आकार आपल्या मनावर एक विशिष्ट परिणाम करतो. शिवाय डेटॉलच्या लोगोमधला तो तलवारसदृश उभा क्रॉससुद्धा डॉक्टर मंडळींच्या चिन्हाशी मिळताजुळता ठेवण्यात आला आहे. त्यातून त्याचं वैद्यकीय अस्तित्व सतत मनावर ठसत राहतं. जागतिक आरोग्य संस्थेने डेटॉलची घेतलेली दाखल महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वपूर्ण औषधी द्रव्यांच्या यादीत त्याचा समावेश आहे.
डेटॉलच्या विविध उत्पादनांच्या टॅगलाइन्स वेगवेगळ्या आहेत. हेल्थी स्किन हेल्थी यू, ऑलवेज स्टे प्रोटेक्टेड अशा टॅगलाइन्स सोबत आपल्याला मनापासून पटणारी टॅगलाइन म्हणजे ‘बी हण्ड्रेड पर्सेट शुअर’. १०० टक्के खात्री देणारी उत्पादने अनेक असली तरी ग्राहकांना १०० टक्के विश्वास वाटणं महत्त्वाचं असतं आणि तो विश्वास अगदी खात्रीशीरपणे डेटॉल बाबतीत आपल्याला जाणवतो. घरच्या कपाटात, इस्पितळातील सर्व महत्त्वाच्या औषधांमध्ये, प्रथमोपचार पेटीत डेटॉल हमखास आढळतं.
मधाच्या रंगाचं हे द्रावण पाण्यात मिसळल्याक्षणी कसं धवल रंग प्राप्त करतं हे पाहणं हा अनेकांच्या लहानपणीचा छंद असतो. डेटॉलचा विशिष्ट गंध कितीही प्रयत्न केला तरी लपवता न येणारा. गंध मनात विविध भावना निर्माण करतात हे सत्य मानलं तर डेटॉलचा विशिष्ट गंध मनात स्वच्छतेचा, सुरक्षिततेचा भाव आपोआप जागा करतो. डेटॉल वापरताना आपण १०० टक्के शुअर असतो. आणि म्हणूनच देह मंदिराच्या शुद्धतेसाठी सत्य सुंदर मंगलाची नित्य आराधना म्हणजे डेटॉल.
viva@expressindia.com