‘खेडय़ाकडे चला’ असं गांधीजी केव्हाच सांगून गेलेत. स्मार्टफोनमध्ये फार्मव्हिल खेळात शेती करणारी मंडळी खऱ्या गावात जाऊन शेती करणार का, प्रश्नच आहे. पण इन्स्टाग्रामवरचं एक गाव सध्या व्हायरल झालंय. शेतीसाठी नाही पण निसर्गासाठी.

समकालीन मंडळी फेसबुकिंग करत असताना आम्ही ऑर्कुटात होतो. ते दुकान बंद झाल्यानंतर आम्ही फेसबुकचे गिऱ्हाईक झालो. तोपर्यंत मंडळी इन्स्टाग्राम मुक्कामी पोहचली होती. छुपा सामाजिक दबाव अर्थात पीअर प्रेशरमुळे आम्हाला या ग्रामाकडे वळावे लागले. उच्चारतानाच जिभेचा एवढा व्यायाम होतोय; प्रत्यक्षात किती अवघड असेल! इन्स्टावर फोटो अपलोड केलाय, कसला फाडू आलाय. कमेंट्स स्क्रोल करून बघ असं कानावर पडलं की, आम्हाला एकदमच टेक्नो निरक्षर वाटायचं. इन्स्टंट इन्स्टाग्रामवर अकाऊंट काढावं वाटायचं. बँकेतही हल्ली झटपट अकाऊंट उघडून देतात- धन असो की नसो. मग आम्ही तंत्रस्वामींचा सल्ला घेतला. इन्स्टाग्राम म्हणजे काय रे भाऊ? हा आमच्या चेहऱ्यावरचा प्रश्न त्यांनी त्वरित ओळखला. उगाच थिअरी ऐकवत बसण्यापेक्षा त्यांनी आम्हाला इन्स्टाग्राम अकाऊंटच उघडून दिलं. ते म्हणाले- ऑर्कुटवर कोण लोक तुझं प्रोफाइल बघून गेले हे रापत बसायचास. फेसबुकवर स्टेटस किंवा फोटो अपलोड करुन त्यावर कमेंटा आणि लाइक्सचा पाऊस पडावा अशा प्रतीक्षेत असायचास. इथे जरा वेगळं आहे. इथे फोटो टाकायचा, शक्यतो स्वत: काढलेला पण तशी सक्ती नाही आणि फोटोविषयी लिहायचं. निबंध नाही, थोडक्यात आटपायचं. म्हणजे थोडं फेसबुक आणि थोडं ट्विटर असं.

आता सोशल मीडिया फॅमिलीचा भाग म्हटल्यावर व्हायरल गोष्टी ओघाने आल्याच. ‘हूज हू’ म्हणजे सेलेब्रिटी गटातली माणसं हल्ली इन्स्टाग्रामवर पडीक असतात. पण सध्या व्हायरलत्व एका वेगळ्याच प्रोफाइलने मिळवलंय. हे प्रोफाइल आहे एका गावाचं. समजून घ्यायला थोडं कठीण आहे पण ग्रामवर गाव आहे खरं. उत्तराखंड राज्यातल्या मुनिसिआरी जिल्ह्य़ातलं आणि निसर्गाचा मुक्ताविष्कार अनुभवणारं सारमोळी गावाचं हे प्रोफाइल. भारतातलं हे पहिलं ‘कम्युनिटी बेस्ड’ इन्स्टाग्राम प्रोफाइल आहे. पर्वतराजीत वसलेल्या गावात नंदनवन कशाला म्हणतात याची अनुभूती मिळू शकते. एखाद्या घराच्या खिडकीतून शुभ्रधवल बर्फाच्छादित डोंगर दिसतात. एखाद्या छोटय़ा घराच्या खिडकीतून अनोखे रंग धारण केलेला अतिदुर्मीळ पक्षी दिसतो. विविधरंगी आणि विविधढंगी अशी पर्वतराजी, दऱ्या, वृक्षवेली, प्राणी, पक्षी, तलाव, सूर्योदय, सूर्यास्त, संधीप्रकाश असे भन्नाट अनुभव देणारं हे गाव आहे. श्वासोच्छ्वासाचा आवाज ऐकायला अशी अद्भुत शांतता, शून्य प्रदूषण यामुळे ही मेजवानी आणखीनच स्पेशल होते. ८००० फूट उंचीवरचं गाव. बेताची लोकवस्ती, कनेक्टिव्हिटीचा नेहमीच प्रश्न. इंग्लिशही तोडकंमोडकं. मग या गावाचं इन्स्टाग्राम प्रोफाइल तयार व्हावं आणि त्यावर नियमितपणे एकापेक्षा एक सरस फोटोंची मेजवानी सादर व्हावी. ती कहाणी आणखी रोचक. उत्तम पगाराची नोकरी सोडून शिव्या नाथ ही तरुणी जग फिरायला बाहेर पडली. (रँ्र५८ं म्हणजे देवनागरीत शिव्या असंच नाव आहे. नावाआडून शिवी देण्याचा आमचा जराही प्रयत्न नाही.) जगाचा कानोसा घेण्याआधी आपल्याच देशाच्या कानाकोपऱ्यात मुशाफिरी करावी या उद्देशाने शिव्या सारमोळीत पोहचली. इथला निसर्ग पाहून अवाक झाली. आपण मोजके क्षण लेन्सबंद करून परत जाऊ पण गावकरी १२ महिने २४ तास या किमयागार निसर्गाचे रुप अनुभवतात. ती चित्रबद्ध कशी होणार, हा प्रश्न तिला पडला. शिव्याच्या साथीला गिर्यारोहणपटू मल्लिका व्हिर्डी आणि त्यांची टीम संलग्न झाली. मल्लिका सारमोळीत कार्यरत माटी संघटनेसाठीही काम करतात. ही संघटना महिलांतर्फे ‘होमस्टे’चं व्यवस्थापन, लोकरीचं उत्पादन व विपणन तसंच दारु व वृक्षतोडबंदी या गोष्टींवर काम करते. एप्रिल महिन्यात सारमोळीत ‘हिमल काळसूत्र’ नावाचा पारंपरिक उत्सव असतो. त्यावेळी विकिपीडियातर्फे डिजिटल वर्कशॉप घेण्यात आलं. स्मार्टफोन्सची संख्याही मर्यादित होती. ‘जिओ’ जी भर के नसल्यामुळे फोटो काढून ते अपलोड करणं अवघड होतं. पण युवा मंडळींनी उत्साह दाखवला आणि एक चळवळच सुरू झाली. एकेकटय़ाने फोटो अपलोड करून फार लोकांपर्यंत पोहोचता येणार नाही. पण गावाचं प्रोफाइल असेल तर व्याप्ती वाढेल हा विचार करून ‘व्हॉइस ऑफ मुनिसिआरी’ तयार झालं. आपल्यासारख्यांच्या घरातून समोरच्या बिल्डिंगवर ड्रेनेजमुळे उगवलेली झाडं दिसतात. सारमोळीकरांचं वेगळं आहे- त्यांच्या घरातून दिसणारी प्रत्येक गोष्ट फ्रेमावी अशीच आहे.

‘हे रिकामपणाचे धंदे आहेत. निसर्ग पाहून जेवायला मिळत नाही’ हे वाग्बाण येणं साहजिकच. पण याच फोटोंच्या माध्यमातून सारमोळीत ‘होम स्टे’ करायला येणाऱ्या मंडळींची संख्या वाढू लागलेय. अनवट निसर्गाची आवड असणारी वेडी मंडळी सारमोळीत दाखल होऊ लागली आहेत. त्यांना गाइड म्हणून स्थानिकांना संधी मिळू लागली आहे. साध्या स्मार्टफोनमधून एवढे भारी फोटो येतात मग तगडय़ा लेन्समधून धमाल फोटो येतील हे जाणून अनेक फोटोग्राफर मंडळी सारमोळीच्या दिशेने रवाना होत आहेत. डोंगरांच्या कुशीत तंबूत राहण्याचा कॅम्पिंगचा अनुभव घेण्यासाठी रानवेडे सारमोळीत जमा होऊ लागले आहेत. भारत आणि चीनची बॉर्डर जवळ असलेलं मात्र जवळचं रेल्वेस्टेशन ११ तासांवर असणारं सारमोळी इन्स्टाग्रामवर सध्या हिट आहे. सामाजिक संस्था, सुजाण पर्यटक, फूडब्लॉगर यांनी सारमोळीत येण्यास उत्सुकता दर्शवली आहे. मे महिन्यात गावकऱ्यांसाठी फोटोग्राफी+इन्स्टाग्राम वर्कशॉप होणार आहे. तुमच्याकडे शिलकीत बरे स्मार्टफोन असतील तर जरूर पाठवा असं आवाहनही संबंधितांनी केलं आहे. सारमोळीचं कास पठार होऊ न देणं एवढं आपल्या हाती आहे.

viva.loksatta@gmail.com