मी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी गेल्या सहा महिन्यांपासून पुण्यात एकटी राहते. घरातील धार्मिक आणि शैक्षणिक वातावरणाचा माझ्यावर पगडा आहे. मी मनापासून अभ्यास करणारी आहे, पण गेले काही दिवस मला एक मुलगा आवडू लागला. ते खरं तर सर आहेत माझे. मी क्लासला जाते तिथे ते शिकवतात, माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठे आहेत. नकळत मी त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. आमचं चॅटिंगही सुरू झालं. कोणाकडे चटकन व्यक्त न होण्याचा माझा स्वभाव, पण या एका व्यक्तीचा सहवास मला हवाहवासा वाटतो. काही दिवसांपूर्वी त्यांनी मला भेटायला बोलावून माझा नकार असतानाही शारीरिक संबंधांसाठी आग्रह केला. मला त्या दिवशी व्यक्तीचं वेगळं रूप दिसलं आहे. माझ्याप्रमाणेच अनेक मुली त्यांच्या जीवनात आल्या व गेल्या हे मला त्या वेळी समजलं. ते मुलींचा आदर करत असले तरीही शारीरिक संबंध ही केवळ एक गरज आहे असं त्यांचं मत. ते फारच फॉरवर्ड थिंकिंगचे असल्यामुळे मी जेव्हा त्यांना माझ्या मनातील भावना सांगितल्या तेव्हा मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची कमिटमेंट देण्यासाठी नकार दिला. कोणाही मुलीसोबत भावनिक नातं जोडण्यासाठी ते तयार नाहीत. त्यांच्या याच विचारसरणीमुळे मी त्याच्यासोबत बोलणं बंद केलं आहे. कारण रागाच्या भरात मला कोणालाही (त्यांना) दुखवायचं नाही. भविष्यात आम्ही एकत्र असू किंवा नसू..पण आत्ताच्या घडीला ‘त्या’ व्यक्तीला मला त्याची चूक समजावून द्यायची आहे, नात्यांचं – भावनांचं महत्त्व पटवायचं आहे. एकंदरच मला त्यांचा ‘या’ गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. पण माझी परीक्षाही जवळ आली आहे, त्यामुळे डॉक्टर यातून बाहेर पडण्यासाठी मला मार्ग सुचवा.
– अनामिका
तुझ्या स्पर्धा परीक्षेसाठी तुला ऑल दि बेस्ट. ही स्पर्धा परीक्षा द्यायचं जेव्हा तू ठरवलंस, ज्या मूळ कारणासाठी हे टय़ुशन सुरू केलंस, त्यामागची तुझी स्वप्न, ध्येय, आईवडिलांचा विश्वास यापासून तू कुठे तरी दूर जाताना दिसत आहेस. सर्वप्रथम तू ही गोष्ट विचारात घे. तू ज्या वयात आहेस त्या वयात कोणी तरी आवडणं या भावनेला विरोध करण्याचं काहीच कारण नाही. एखाद्याच्या बाबतीत कुतूहल वाटणं, आकर्षण वाटणं हे सर्रास होतं. हे कुतूहल वाटण्यासाठी त्या व्यक्तीशी तोंडओळखही पुरेशी वाटू लागते. ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्याबद्दल, विचारांबद्दल किंवा प्रत्यक्ष भेटून व्यक्त होण्याचा टप्पा आजकाल तरुणाईच्या जीवनातून उडून जात आहे. सोशल नेटवर्किंगवरून बनलेली (चॅटिंगची) शब्दांनी बेतलेली नाती जरी जवळची वाटली तरीही त्यात लपवालपवीची कडा असतेच. कारण शब्दांनी भावना निर्माण होतात, पण व्यक्तीची पारख होत नाही. प्रत्यक्ष व्यक्तीशी ओळख होतच नाही कदाचित.
तुझ्या आयुष्यात आलेल्या या माणसाचे विचार योग्य की अयोग्य हे ठरवण्यापेक्षा ‘हे’ (त्या व्यक्तीला बदलण्याचे) विचार तुला स्वत:ला कितपत पटतात हे जाणणं महत्त्वाचं. परीक्षा महत्त्वाची वाटते की या माणसाला बदलणं? या प्रकरणात ‘त्याचा’ स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन गरज, उपभोग, सोय या शब्दांत बसणारा दिसत आहे. कदाचित कित्येक पुरुषांचा आजही हाच दृष्टिकोन असेल. गुरुशिष्य नात्यात असे विचार मनात येणं तितकंसं योग्य नाही. मुलींना भुलवण्याचा हा एक प्रयत्न दिसत आहे. अशा किती जणांना तू बदलणार? त्यांना नात्यांचं महत्त्व पटवणार? आणि जर तुला हा प्रयत्न करायचाच आहे तर मग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन मिळालेल्या संधीतून कदाचित तू हे साध्यही करू शकशील.. खूप मोठय़ा पातळीवर. असं नाही का तुला वाटत? सध्या तुझ्या आयुष्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे, हे तुझं तुलाच ठरवावं लागेल आणि त्यावर ठाम राहावं लागेल. एका व्यक्तीमुळे तू तुझ्या ध्येयाशी, स्वप्नांशी फारकत घेणार का? इतकं महत्त्व देण्याइतपत ती व्यक्ती आहे का याचाही विचार करावा लागेल. व्यक्तीला बदलणं, त्याचा दृष्टिकोन बदलणं यापेक्षा परीक्षेचा अभ्यास या क्षणी महत्त्वाचा असायला हवा, कारण त्यातूनच पुढचं यश मिळणार आहे आणि त्यातून तुला अपेक्षित अनेक गोष्टी साधणं शक्य होईलआणि म्हणूनच तुला परीक्षेसाठी मनापासून..ऑल दि बेस्ट.
मोकळं व्हा!
आपलं आयुष्य वेगवान झालंय हे खरंय. पण या वेगाशी जुळवून घेताना बऱ्याचदा आजच्या तरुणाईचीही प्रचंड मानसिक ओढाताण होतेय. बदललेल्या लाइफमध्ये ताणही वेगळे आहेत. मनाची घालमेल तीच आहे, पण कारणं वेगळी आहेत. अभ्यास, परीक्षा, रिलेशनशिप, ब्रेक-अप, एकटेपणा, रॅगिंग.. अशा एक ना दोन असंख्य गोष्टीत नैराश्याचे क्षण येतात. निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा काय करावं सुचत नसतं. याचा मानसिक त्रास होतो आणि कुणाकडे तरी सल्ला मागावासा वाटतो. कुणाबरोबर तरी आपला प्रश्न शेअर करावासा वाटतो. असा कुणी तरी त्या वेळी लागतो, जो आपलं म्हणणं ऐकून घेईल, समजून घेईल आणि योग्य तो सल्ला देईल. द्विधा मन:स्थितीतून, मानसिक गुंत्यातून आपल्याला मोकळं करील, आपल्या मनातली भीती, द्वेष, शंका दूर करील. आपला प्रश्न किती साधा आहे, बाष्कळ आहे, फालतू आहे, असं म्हणून आपल्याला हसणार नाही.. तू किती मूर्ख आहेस, अशी आपली टर उडवणार नाही.. असं कुणी तरी तेव्हा हवं असतं. मनात खोलवर रुतून त्रास देणारे प्रश्न उलगडण्यासाठी असंच कुणी तरी हवं असतं. लोकसत्ता व्हिवामधली ही जागा तुमच्या अशाच बावरलेल्या मनासाठी दिली आहे. ही जागा तुमची आहे. तुम्ही इथे मोकळेपणानं व्यक्त व्हा. मुंबईतील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे तुमच्या प्रश्नांना उत्तरं देतील. डॉक्टरांपर्यंत पोचण्यासाठी तुमचे प्रश्न viva@expressindia.com या ई-मेल आयडीवर आम्हाला पाठवा. सब्जेक्टलाइनमध्ये ‘बावरा मन’ असं जरूर लिहा.