नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
कोजागरी पौर्णिमा. वर्षांतले सर्वात सुंदर चंद्र दर्शन. वर्षांतली सर्वात सुंदर रात्र! शुभ्र चांदणे, हळूहळू लागणारी थंडीची चाहूल, गार, गुलाबी होत जाणारा मंद वारा, घट्ट मसाला दूध आणि सोबतीला खास रात्रीची, चंद्राची गाणी! चंद्र.. जणू एक न संपणारी वहीच. जिच्यावर कितीही कविता लिहिल्या तरी ती भरतच नाही. कवी-गीतकार लोकांचा अगदी हुकमाचा एक्का. शकील बदायुनी साहेबांचे ‘चौधवी का चाँद’.. रफीसाहेबांचा रेशमी आवाज. आहाहा! असेच प्रेयसीच्या सौंदर्याला ‘चौधवी के चाँद’ची उपमा असलेले माझे अजून एक खूपच आवडते गाणे म्हणजे इब्न-ए-इन्शा या शायरची ‘कल चौधवी की रात थी, शब् भर रहा चर्चा तेरा; किसने कहा वो चाँद है, किसने कहा चेहरा तेरा..’ ही गम्जम्ल. ही जगजीतजी आणि गुलाम अली खाँसाब दोघांनी वेगवेगळ्या चालीत गायली आहे. दोन्ही आवृत्त्या जगप्रसिद्ध आहेत. गुलाम अली साहेबांची मला जास्त आवडते. त्यात कौतुकाबरोबरच एक लडिवाळ, काहीसा खटय़ाळ भावसुद्धा डोकावतो. याची ‘यूटय़ूब’वर वेगवेगळ्या मैफलीतले रेकॉर्डिग्स आहेत. प्रत्येक रिकॉर्डिगमध्ये वेगवेगळी मजा आहे.
प्रेयसी आणि चंद्र यांचा मेळ घालणारे अजून एक अप्रतिम गाणे म्हणजे देवदास (२००२) मधले ‘वो चाँद जैसी लडम्की इस दिलपे छा रही है..’ उदित नारायणजींचा धबधब्याच्या तुषारांसारखा आवाज, नुसरत बद्र यांचे शब्द, इस्माइल दरबारचे संगीत आणि भारतीय सिम्फनीचा उत्तम नमुना असलेले संगीत संयोजन. ‘चंदा रे चंदा रे कभी तो जमीं पर आ..’ हरिहरन, साधना सरगम, जावेद अख्तर आणि ए. आर. रेहमान.. क्या बात! ‘एआरआर’चे एक फारच भारी रात्रीचे गाणे- ‘खामोश रात..’ ‘तक्षक’ चित्रपटातले. मेहबूब यांचे शब्द, रूपकुमार राठोड यांचा मऊ मुलायम आवाज, सरगम, गिटार.. फारच वरचे गाणे आहे हे. गंमत म्हणजे या गाण्याचे रेकॉर्डिगसुद्धा चेन्नईमध्ये रात्री २ ते ५ या वेळेत झाले होते! रात्रीची माझी अजून काही आवडती हिंदी गाणी म्हणजे – ‘फिर वही रात है’ (किशोरदा, आरडी बर्मन), ‘रात का समा’ (हसरत जयपुरी, एसडी, दीदी- ‘जिद्दी’) ‘चाँद फिर निकला’ (मजरूह, एसडी, दीदी- ‘पेइंग गेस्ट’) आणि खास शंकर जयकिशनशैली मधील, उत्कट, सुरेल चालीच्या जोडीला सिम्फनीचा सुरेल वापर असलेली दोन गाणी- ‘ये रात भीगी भीगी’.. मन्नाडे आणि दीदी, दीदींचा कमाल ओवरलॅपिंग आलाप आणि ‘रात के हमसफर’ रफीसाब आणि आशाताईंचे अजब रसायन.
मराठीतली काही आवडती रात्र गाणी म्हणजे- ‘शुक्रतारा मंद वारा’, ‘चंद्र आहे साक्षीला’ आणि अर्थात बाळासाहेबांचं- ‘चांदण्यात फिरताना’- आशाताई, बासरीचा काय सुंदर वापर! ‘धरलास.. हात’ मधली चालीतील उडी, एकूणच अचंबित करणारी चाल. सुरेश भटांचे ‘श्वास तुझा मालकंस स्पर्श तुझा पारिजात’, ‘काजल रातीनं ओढून नेला..’ पुन्हा आशाताई, सुधीर मोघ्यांचे शब्द आणि हॉण्टिंग चाल! दीदींनी गायलेले ‘सुन्या सुन्या मैफिलित माझ्या.. अजूनही चांद रात आहे..’ पुन्हा एकदा सुरेश भट. सुरेश भट-पंडित हृदयनाथ मंगेशकर जोडीचे सर्वात भारी, केवळ बाप गाणे- ‘तरुण आहे रात्र अजूनी’! खरे तर हे एकटेच गाणे एक प्लेलिस्ट आहे! भावोत्कटतेची सर्वोच्च पातळी, आशाताईंचा आर्त स्वर, ‘बिलासखानी तोडी’चे सूर, हरिप्रसाद चौरसियांच्या बासरीचे वेड लावणारे पीसेस.. हे एकच गाणे किती तरी वेळा मी रात्रभर ऐकत बसलो आहे. या गाण्याची अनेक इंटरप्रिटेशन्स आहेत. कोणी म्हणते हे प्रियकराच्या मृत्यूवर लिहिलेले आहे, तर कोणी अजून काही. खुद्द बाळासाहेबांनी मात्र हे स्पष्ट केले आहे की हे एक शृंगारगीतच आहे किंबहुना शृंगार-गम्जम्ल आहे. मला हे गाणे प्रत्येक वेळी वेगवेगळी प्रेरणा देते. कधी कधी हे गाणे ऐकताना जाणवते की, आपण किती छोटे आहोत! असली निर्मिती आपल्याच्याने होणे बापजन्मात शक्य नाही. हताश व्हायला होते. तर कधी उलटे हरल्यासारखे, काही करू नये असे वाटले की, हे गाणे म्हणते, ‘एवढय़ातच त्या कुशीवर वळलास का रे? सांग या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू?’ असे म्हणून ते विचारते.. मोठमोठी स्वप्ने पाहिली आहेत, त्यांना काय उत्तर देणार? ‘रातराणीच्या फुलांचा गंध तू मिटलास का रे?’मधून हे गाणे मला या जगाकडे सौंदर्यदृष्टीने पाहायला सांगते. हे गाणे ऐकून झाल्यावर प्रत्येक वेळी एक नवा मी मला सापडतो.
योगायोगाने कोजागरी २७ तारखेला आणि बाळासाहेबांचा वाढदिवस २६ तारखेला आलाय. त्यामुळे पुढच्या आठवडय़ात पुन्हा बाळासाहेबच!
हे ऐकाच..
गुलजारांची ‘नज्म्म’
कोणी आज चंद्रावर गेले, गुलजारसाहेबांचे एक घर नक्कीच सापडेल. गुलजारसाहेब जणू चंद्रावरच राहतात आणि त्यांच्या काव्याचा चंद्राशी वरचेवर संबंध येतच असतो. गुलजारसाहेबांच्या कवितांचा असाच ‘नज्म्म’ नावाचा अल्बम आहे. त्यात ४०च्या वर कविता गुलजार यांनी स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड केल्या आहेत. जवळजवळ प्रत्येक कवितेत चंद्र, रात्रीचा उल्लेख आहेच. नक्की ऐका. गुलजारसाहेबांच्या आवाजातले काव्यवाचन म्हणजे जणू गाणेच!
जसराज जोशी- viva.loksatta@gmail.com