रश्मि वारंग- viva@expressindia.com

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

यशस्वी उत्पादनांची अनेक लक्षणं आहेत त्यातलं एक महत्त्वाचं वैशिष्टय़ं म्हणजे बाजारात टिकून राहणं. तुमच्या खात्यात जितकी अधिक वर्ष जमा होत जातात तशी तुमच्याविषयी विश्वासार्हता वाढत जाते. ब्रॅण्ड अनेक असतात पण चढ-उताराच्या स्पर्धेत जे आपल्या मार्गावरून ढळत नाहीत, ध्येय सोडून देत नाहीत त्या ब्रॅण्डस्ना विश्वासाचं पदक मिळतंच. असाच दीर्घकाळ टिकून असलेला १३२ वर्ष जुना ब्रॅण्ड म्हणजे जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन. बॅण्ड एड, जॉन्सन बेबी, क्लीन अ‍ॅण्ड क्लीअर या उत्पादनांच्या कर्त्यां ब्रॅण्डची ही कहाणी.

तो काळ १८८०च्या दरम्यानचा. रॉबर्ट वुड जॉन्सन, जेम्स वुड जॉन्सन आणि एडवर्ड मिड जॉन्सन हे अमेरिकेतील न्यू जर्सी येथील तीन बंधू सिबरी अ‍ॅण्ड जॉन्सन अशी कंपनी चालवत होते. या कंपनीत अन्य व्यावसायिकांसोबत त्यांची भागीदारी होती. १८८५मध्ये या बंधूंनी जोसेफ लिस्टर यांचं जंतुनाशक उपचारांबद्दलचं व्याख्यान ऐकलं. त्याने प्रभावित होऊन या तीन बंधूंनी वैद्यकीय व्यवसायासाठी तयार सर्जिकल ड्रेसिंगचं उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. सिबरी अ‍ॅण्ड जॉन्सनमधून बाहेर पडून जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनी स्थापन झाली. जुन्या व्यवसायातील काही करारांमुळे रॉबर्ट जॉन्सन उशिराने दोन्ही बंधूंना येऊन मिळाले. जेम्स आणि एडवर्ड यांनी कंपनीसाठी जागा शोधायला सुरुवात केली. त्या वेळी बून्सविक या छोटय़ाशा शहरातील एक रिकामी फॅक्टरी त्यांनी हेरली आणि तिथे जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या उद्योगाची सुरुवात झाली. आज आकाराने अवाढव्य अशा या कंपनीत सुरुवातीला केवळ १४ कर्मचारी होते. त्यातील ८ स्त्रिया आणि ६ पुरुष. त्या काळाचा विचार करता महिलांना नोकरीत प्राधान्य देण्याचा कंपनीचा निर्णय कौतुकास्पद वाटतो. त्यामागची भूमिकासुद्धा तितकीच महत्त्वाची. हेल्थकेअर उत्पादनांच्या कंपनीत सगळ्या घराच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या स्त्रियांचा समावेश जास्तीत जास्त असला पाहिजे. १८८६मध्ये कंपनीचं सर्जिकल ड्रेसिंगचं पहिलं उत्पादन बाहेर आलं. त्यानंतर काळाची गरज ओळखून कंपनीने एकापेक्षा एक सरस उत्पादनं बाजारात आणली. त्या काळात स्त्रियांची बाळंतपणं घरच्या घरी होत. स्वच्छतेच्या अभावापायी अनेक जणी बाळंतपणात दगावत. ही गरज लक्षात घेत जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनचा मॅटर्निटी किट बाजारात आला. वापरा आणि फेका अशी डायपर्स आली.

या सगळ्या उत्पादनांत जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या बेबी उत्पादनांची लोकप्रियता विलक्षण आहे. १८९२मध्ये जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनमधील उत्पादन तज्ज्ञ डॉ. फेड्रिक  किल्म यांना ओळखीच्या एका डॉक्टरांचं पत्र आलं. छोटय़ा बाळांच्या नाजूक त्वचेवर उठणारं पुरळ वा चट्टे याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. डॉ. किल्म यांनी त्यावर टाल्कम पावडर वापरण्याचा तात्पुरता सल्ला दिला. पण त्यातून नवजात शिशूसाठी खास एखादी पावडर तयार करता येईल, असा विचार पुढे आला आणि १८९३मध्ये जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनची सुप्रसिद्ध जॉन्सन बेबी पावडर जन्माला आली. सुरुवातीला पिवळ्या आणि लाल डब्यात ही पावडर मिळायची. कालांतराने कंपनीने पांढरा, गुलाबी रंग निवडला. जाहिरातीतील पहिली जॉन्सन बेबी होती रॉबर्ट जॉन्सन यांची नात मेरी ली जॉन्सन-रिचर्ड. त्यानंतर बेबी लोशन, साबण, तेल अशी उत्पादनं येत गेली. १९५४मध्ये जॉन्सन बेबीने चिमुरडय़ांसाठी आणलेला बेबी शाम्पू खूप लोकप्रिय झाला. ‘जॉन्सन कान्ट बर्न आईज’ ही टॅग लाइन बदलून ‘नो मोअर टीअर्स’ अशी करण्यात आली. डोक्यावरून आंघोळ हा अनेक चिमुरडय़ांसाठीचा वैतागवाडी भासणारा प्रकार त्यामुळे सुसह्य़ झाला.

१९२० मध्ये जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनने छोटय़ा पण धावत्या-पळत्या वयोगटातील मुलांचा विचार करून आणलेलं सर्वात यशस्वी उत्पादन म्हणजे बॅण्ड एड. त्यामागची गोष्ट गमतीशीर आहे. अल्रे डिक्सन हा कंपनीचाच एक कर्मचारी. रोजच्या कामात त्याच्या बायकोचा हात अनेक वेळा कापत तरी असे किंवा भाजत असे. तिच्यासाठी तयार मलमपट्टी करावी, जेणेकरून सतत होणाऱ्या या त्रासापासून मुक्तता होईल, असा विचार डिक्सनने केला. तीच कल्पना त्याने जॉन्सन बंधूंना सांगितल्यावर सतत धडपडणारा छोटय़ा मुलांचा वर्ग समोर ठेवत जॉन्सन बॅण्ड एड जन्माला आले. सुरुवातीला बॅण्ड एड हाताने बनवले जाई. १९२४पासून ते यंत्रावर बनू लागले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जॉन्सन बॅण्ड एडचा खप विलक्षण वाढला. जखमेवर मारलेली ही हळुवार फुंकर तेव्हापासून आतापर्यंत लोकप्रिय आहे. पट्टीवर कार्टूनचा वापर करत हक्काचा बालवर्ग कंपनीने मिळवला आहे.

अतिशय जुन्या आणि अवाढव्य पसारा असलेल्या अनेक कंपन्यांपैकी जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन एक आहे. कंपनीच्या २५० सबसिडी कंपन्या ६० देशांत कारभार करतात आणि या कंपन्यांची उत्पादनं जगभरातील १७५ देशांत जातात. यावरून कंपनीचा आवाका लक्षात येतो. कंपनीची टॅग लाइन प्रत्येक उत्पादनानुसार बदलते. मात्र त्यांचा लोगो मात्र कायम तोच आहे. हा अशा फार कमी उत्पादनांपैकी एक आहे जो वर्षांनुवर्षे तसाच आहे. तो बदललेला नाही. हा लोगो जॉन्सन बंधूंपैकी जेम्स वुड जॉन्सन यांच्या सहीशी खूप मिळताजुळता आहे.

या ब्रॅण्डविषयी मध्यंतरी अनेक वावडय़ा उठल्या होत्या. पण या सगळ्या शंकांना पुरून उरत हा ब्रॅण्ड ठामपणे उभा आहे. काही ब्रॅण्डना पर्याय नसतो. जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या अनेक उत्पादनांसारखी उत्पादनं बाजारात आली पण आजही नवजात शिशूला पहिल्यांदा पाहायला जाताना जॉन्सनचा गिफ्ट बॉक्सच सोयीचा आणि विश्वासार्ह वाटतो.

तब्बल १३२ वर्ष टिकून राहण्याचं रहस्य, विचारात घेता लक्षात येतं की, ग्राहकाच्या अगदी लहान सहान गरजांचा विचार या ब्रॅण्डने केला आहे. सातत्याने नवं काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोही नवेपणाचा गाजावाजा न करता. याशिवाय या यशात या ब्रॅण्डच्या सुवासाचासुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन म्हणताक्षणी एक हळुवार मंद सुगंध, मग तो साबणाचा असेल किंवा पावडरचा, अलगद आपल्या भोवती दरवळू लागतो. त्या सुवासाशी आपलं किंवा आपल्या घरातील छोटय़ांच्या बाळपणाचं नातं जोडलेलं असतं. या सगळ्याचा परिपाक म्हणजे या ब्रॅण्डचं यश. उपचार किंवा दैनंदिन गरजा यांना हाताळण्याचं कौशल्य यातून जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन आपल्यावर जी हळूवार फुंकर मारतो त्यामुळे हा ब्रॅण्ड हवाहवासा वाटतो.

 

Story img Loader