बदलणाऱ्या फॅशनची चाहूल घ्यायची तर ‘लॅक्मे फॅशन वीक’ला पर्याय नाही. कपडे, रंग, फॅशन डिझायनर्सची सर्जनशीलता आणि त्यांच्या कल्पक डोक्यातून अवतरलेले फॅशनेबल कपडे त्यांच्यापेक्षा दुप्पट आत्मविश्वासाने परिधान करून रॅम्पवर टेचात वावरणाऱ्या मॉडेल्स.. असा रंगारंग देखणा सोहळा असतो. फॅशनच्या नवनिर्मितीची नांदी जिथे होते तो हा ‘लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिव्हल २०१७’ मुंबईत १६ ते २० ऑगस्ट दरम्यान रंगणार आहे. या फॅशन वीकमध्ये अनेक कसोटय़ांमधून पार पडत ‘लॅक्मे’च्या व्यासपीठावर पोहोचलेल्या नवोदित फॅशन डिझायनर्सशी बोलून यंदाच्या वीकचे वैशिष्टय़ जाणून घेऊ यात..
‘लक्मे फॅशन वीक’कडे फक्त फॅशन इंडस्ट्रीचेच नाही तर पूर्ण जगाचे लक्ष असते. या इंडस्ट्रीत नव्याने पाय रोवू पाहणाऱ्या प्रत्येक फॅशन डिझायनरला हा फॅशन वीक खुणावत असतो. वर्षांतून दोनदा होणाऱ्या या फॅशन शोसाठी दर वर्षी नवीन डिझायनर्सना संधी दिली जाते. मात्र यासाठी डिझायनर्सना खूप मेहनत घावी लागते. तुमचं कलेक्शन, पोर्टफोलिओच्या आधारावर तुम्ही प्राथमिक फेरीत पोहोचलात तरी.. खरी स्पर्धा नंतर सुरू होते. नामी फॅ शन डिझायनर्ससमोर तुम्हाला तुमचं कलेक्शन सादर करावं लागतं. या किचकट निवड प्रक्रियेतून पहिल्या झटक्यात यश मिळणं तसं अशक्यच काम आहे. हे या वीकसाठी चारवेळा प्रयत्न करूनही अपयशी ठरलेल्या निकिता म्हैसळकर या डिझायनरच्या उदाहरणावरून लक्षात येईल. ‘मी मागच्या चार सीझन्ससाठी खूप प्रयत्न केले. प्रत्येक अपयशानंतर मी अजून लक्षपूर्वक काम करत माझं कलेक्शन सादर केलं. पण काही केल्या मला यश मिळत नव्हतं. चार वेळा नापास झाल्यावर मी माझ्या पेपरचा म्हणजेच अर्थात माझ्या कलेक्शनचा मुळापासून अभ्यास केला आणि मला माझं उत्तर सापडलं. या वेळी मी माझ्या कलेक्शनमध्ये भारतीय एम्ब्रॉयडरी आणि फ्लॅट नेट वापरून डिझाइन्स केल्या आणि अखेर या सीझनमध्ये माझी निवड झाली आहे,’ असं निकिताने सांगितलं. आपापली कलेक्शन सादर करताना शोच्या थीमला धरून काम करावं लागतं. अशा वेळी डिझायनर्सच्या आविष्कार स्वातंत्र्यावर र्निबध येतात का? यावर थीम कुठलीही असेल ते सादर करण्यासाठी हवं तेवढं स्वातंत्र्य मिळवून आपलं डिझाइन सादर करणारा तोच खरा डिझायनर असतो. डिझायनरला कोणत्याही परिस्थितीत आपली सर्जनशीलता आपल्या कलाकृतीतून दाखवावीच लागते, असं तिने सांगितलं. या वेळीही ‘लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिव्हल’मध्ये दरवर्षीप्रमाणे ५० वेगवेगळ्या नवोदित डिझायनर्सचे तेवढय़ाच प्रकारचे वैविध्य असलेले कलेक्शन सादर झालं आहे. इतक्या गुणवंतांमधून सवरेत्कृष्ट निवडून त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची ही प्रक्रिया खरोखरच सोपी राहिलेली नाही.
या निवड प्रक्रियेबद्दल बोलताना फॅशन वीकचे प्रमुख आणि आयएमजी रिलायन्सचे मुख्य अधिकारी जसप्रीत चंडोक यांनी प्राथमिक निवड फेरीसुद्धा तीन वेगवेगळ्या स्तरांवर घेतली जाते, असं सांगितलं. सुरुवातीला निवडलेल्या ५० डिझायनर्समधूनही केवळ ३० जणांची निवड होते. त्यांचं संपूर्ण कलेक्शन त्यांना फॅ शन वीकच्या ज्युरीजसमोर सादर करावं लागतं. आणि या वेळी मात्र त्यातल्या केवळ पाच सर्वोत्तम डिझायनर्सची निवड होते. ‘नवनवीन कल्पना, नव्या-वेगळ्या तंत्रांचा वापर करून आपली डिझाइन्स सादर करणाऱ्या सर्जनशील मनांच्या शोधात आम्ही असतो. प्रतिष्ठित डिझाइनर लेबलला शोभेल असं कलेक्शन आम्ही डिझायनरच्या कलेक्शनमध्ये शोधत असतो, असं जसप्रीत यांनी स्पष्ट केलं.
‘लक्मे फॅशन वीक’मध्ये ‘जेन नेक्स्ट’ या मंचाद्वारेही नवीन डिझायनरला ‘जेन नेक्स्ट फॅशन डिझायनर’मधून संधी मिळते. या विषयी यंदा ‘जेन नेक्स्ट फॅशन डिझायनर’ म्हणून निवड झालेला अक्षत बनसाय सांगतो की, इतक्या मोठय़ा फॅशन वीकसाठी निवड होणं हे स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. मी नेहमी विचार करायचो की मला माझं करिअर लॅक्मेसारख्या मोठय़ा मंचाद्वारे करायचं आहे. शिकत असताना मी जेव्हा जेव्हा फॅशन वीक बघायला यायचो तेव्हा मी स्वत:ला त्या मंचावर पाहायचो. ही पूर्वतयारी महत्त्वाची असते. मी माझं कलेक्शन बनवतानाही नेहमी माझ्या कल्पना-विचार असा कॅनव्हास तयार करूनच कामाला सुरुवात करतो. त्यामुळे मला कोणतीही थीम दिली तरी मी त्यातून माझं कलेक्शन हवं तसं निर्माण करू शकतो. उदाहरणार्थ माझ्यासमोर फु लांची थीम दिली तर मी त्याचा सगळ्या बाजूने अभ्यास करेन. फुलाच्या प्रत्येक भागाला मी लहान लहान ऑब्जेक्टमध्ये रूपांतरित करून त्याचा वापर डिझाइनसाठी करेन,’ असं अक्षत म्हणतो.
तर फॅशन डिझायनरसाठी निवड प्रक्रिया, डिझायनिंग आणि स्वत:चं कलेक्शन सगळ्याच पातळीवर स्वातंत्र्य महत्त्वाचं असतं, असं याच ‘जेन नेक्स्ट’साठी निवड झालेला डिझायनर दीपक पाठक सांगतो. ‘माझं शिक्षण कोलकातामध्ये झालं. मी तिकडच्या ‘डायमंड हार्बर’ या जागेवरून प्रेरित होऊन माझं कलेक्शन बनवलं आहे. तिकडे खूप मोठा समुद्रकिनारा आहे. जिथे मी नेहमी जायचो. त्याच आठवणीतून मी हे कलेक्शन बनवलं आहे. मीही मागच्या सीझनसाठी खूप प्रयत्न केले होते, पण माझी निवड झाली नाही. त्यानंतर मी आणखी माझं काम वाढवलं. तेव्हा कुठे या वर्षी माझी निवड झाली,’ असं सांगणारा दीपक ‘फॅशन वीक’ हा तरुण डिझायनर्सना जगासमोर आणणारा खूप मोठा मंच आहे. एखाद्या शोसाठी काही थीम असेल तर प्रत्येक डिझायनर वेगळ्या पद्धतीने विचार करतो. प्रत्येकाची वेगळीच विचार प्रक्रिया असते. मात्र फॅशन डिझायनर्सना नेहमीच थीम समोर असली तरी कलेक्शन कसं बनवायचं याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळतं, हेही स्पष्ट करतो. फॅशनच्या विश्वात केवळ सर्जनशील डिझायनर्स आणि कलाकृती आणून तिथेच न थांबता त्यासाठी मोठी बाजारपेठ उभा करणाऱ्या या शोकडे म्हणूनच जगभरातील लोकांच्या नजरा उत्सुकतेने खिळलेल्या असतात!