सोशल नेटवर्किंग साइटवर सध्या गाजत असणारा यू टय़ूबर म्हणजे ‘लव रुद्राक्ष’. यू टय़ूब फॅन फेस्टसाठी दिल्लीकर ‘लव’ मुंबईत आला होता. त्याच्या यूटय़ूब वाहिनीसाठी एक व्हिडीओ इथे मुंबईतच शूट करण्याचं ठरवलं. इन्स्टाग्राम व स्नॅपचॅटवर त्याने तसं पोस्ट केलं आणि यात सहभागी होण्यासाठी अपीलही केलं. त्याच्याशी इन्स्टाग्रामवरून संपर्क साधून या एपिसोडचा भाग व्हायचंय हे सांगितलं. आमच्या मैत्रिणीने इन्स्टाग्रामवरूनच ते जुळवूनही आणलं. एरवी प्रेक्षकांच्या भूमिकेत असणाऱ्या आम्हाला प्रत्यक्ष व्हिडीओचा भाग होता आलं.

हे पहिल्यांदा कळलं तेव्हा .. ‘आर यू सीरियस? लव रुद्राक्ष.. भेटणार आहे?’ अशीच आमची प्रतिक्रिया होती. (अर्थातच प्रतिक्रिया व्हॉट्सअ‍ॅपवरची – डोळे वटारलेल्या इमेजीची!). ज्याचे व्हिडीओ ब्लॉग आम्ही अगदी वेडय़ासारखे पाहतो, ज्याला फॉलो करतो त्या ‘लव रुद्राक्ष’च्या व्हिडीओत आम्ही दिसणार या विचारानेच आम्ही अक्षरश: बावरलो होतो. लव रुद्राक्ष कसा असेल? त्याला अ‍ॅटिटय़ूड तर नसेल ना? याबरोबरच त्याचे व्हिडीओ कसे बनतात, स्क्रिप्ट कशी असते, शूट कसं होतं? असे अनेक प्रश्न आमच्या मनात होते. लव रुद्राक्ष हे काही या अवलियाचं खरं नाव नाही. म्हणजे लव हे पहिलं नाव असलं तरी त्यापुढे रुद्राक्ष कसं जोडलं हा धम्माल किस्सा आहे. रुद्राक्ष नावाच्या मित्राबरोबर तो सुरुवातीचे व्हिडीओ करायचा म्हणून लव रुद्राक्ष हे नाव त्यांनी चॅनेलला दिलं; पण नाम में क्या रखा है.. ‘वॉस्सप ब्रो’ असं म्हणत हा दिल्लीवाला यूटय़ूबर फॅन्सच्या थेट मनात जाऊन बसला आहे.

तर.. इन्स्टाग्रामवर ठरल्याप्रमाणे वांद्रय़ाच्या कार्टर्स रोडला असणाऱ्या ‘सीसीडी’मध्ये आम्ही भेटलो. खूप दिवसांनी कामानिमित्त भेटलेले मित्र जसे एकमेकांची खिल्ली उडवत आरामात वावरतात अगदी तसाच आमचा वावर होता.. आम्ही एकमेकांना पहिल्यांदा भेटत असूनही! दिलखुलास गप्पा मारता मारता एका तासाभरातच आम्हा आठ अनोळखी लोकांची सॉलिड टीम तयार झाली. आमच्या आठ जणांच्या ग्रुपमध्ये दोन यू टय़ूबर्स होते (लिओन आणि कौस्तव). या वेळी लव रुद्राश्रच्या व्हिडीओचा विषय होता दिल्ली विरुद्ध मुंबई. मुंबईकरांचा मुंबईबद्दलचा अपरंपार अभिमान, स्मार्टनेस दिल्लीकरांना कसा दिसतो, त्याचं धमाल चित्रण या व्हिडीओत करायचं ठरलं. ‘लव’ने व्लॉगसाठी स्क्रिप्ट स्वत: लिहून आणली होती, पण शूट जसजसं पुढे गेलं तसंतसं त्याने स्क्रिप्टमध्ये काही बदलही केले. मधूनच आमचे सल्ले घेऊन तेही त्याने या व्हिडीओमध्ये वापरले. स्क्रिप्टही फार सोपी, आपल्या रोजच्याच भाषेत लिहिली होती, त्यामुळे आम्हाला त्यावर काम करणं जास्त सोपं गेलं. ट्रायपॉड, कॅमेरा अँगल्स, माइक सारं काही नीट समजावून मजेमजेतच हे ‘टेक’ झाले. आमच्यातले एक-दोन अपवाद वगळता शूटिंग आणि अ‍ॅक्टिंगच्या नावाखाली आमची पाटी कोरी; मात्र त्या दिवशी असं अजिबात जाणवलं नाही. शूटिंग चालू असतानाच मोबाइलचा फ्रंट कॅमेरा सुरू करून हा ‘लव’मध्येच स्नॅपचॅट करत होता. कॅफेमध्ये, दुकानांतून शूट करण्यासाठी परवानगी काढण्यापासून सगळे प्रयत्न आमच्यासमोरच सुरू होते.

शेवटच्या शॉटसाठी आमचं लोकेशन ठरलं – बॅण्डस्टँड. किंग खानच्या ‘मन्नत’ बंगल्याजवळच्या परिसरात आल्यावर तिथे उभ्या असणाऱ्या मुलांनी या ‘लव रुद्राक्ष’ला ओळखलं. मग त्या फॅन्ससोबत सेल्फी वगैरे आटोपल्यावर शेवटचा सीन शूट झाला. निघताना आमचाही ‘सेल्फी मोड’ सुरू झाला. काही तरी नवं केल्याचा आनंद होता. हा आनंद आमच्या ‘डीपी अपडेट’वरून तर अक्षरश: ओसंडून वाहत होता. प्रोफेशनल ‘यूटय़ूब’सोबतचा हा अनुभव आमच्यासारख्या ‘यूटय़ूब’ प्रेक्षकांसाठी नक्कीच नवा आणि हवाहवासा वाटणारा होता.

 

– संयुक्ता आंबेरकर, विवेक सावंत

Story img Loader