प्रत्येक गाणे हे प्रेमगीत किंवा प्रेमभंगगीत ठरवता येण्याजोगे त्यातले शब्द जबरी अथवा जहरी असतात. आबालवृद्धांकडून गेल्या शतकभरात प्रेमानंद अथवा प्रेमविरहाच्या गाण्यांना सर्वाधिक मागणी राहिली आहे. ‘प्रेमदिवसा’निमित्ताने समाज माध्यमांवर प्रेमगीतांना ऊत येईल आणि त्याच्या अतिशयोक्त आशयात कबुतरबाज पिढी हरवून जाईल. एमटीव्ही युगात ओरिजनल व्हिडीओट्रॅक बनून सिनेमांसाठी गाणी तयार होऊ लागली, तेव्हा अनेक म्युझिक बॅण्ड आणि कलाकार अधिक प्रकाशझोतात आले. टायटॅनिकमधील ‘माय हार्ट विल गो ऑन’ या गाण्यामुळे सलीन डिऑन या कॅनडियन कलावतीचे गानकर्तृत्व साऱ्या जगासाठी खुले झाले. भारतात इंग्रजी गाणे ऐकण्याची मक्तेदारी अल्पसंख्याकांकडून बहुसंख्येकडे १९९६ सालातील या एका गाण्यामुळे आली. या काळात बॉयझोन आणि बॅकस्ट्रीट बॉइज या विशी-पंचविशीच्या मुलांच्या बॅण्डने साऱ्या जगभरातील तरुणाईला प्रेमळ गीतांची दीक्षा दिली. जुन्या गाण्यांना नव्या प्रकारे गाणाऱ्या या बॅण्ड्सचा पाश्चिमात्य देशाइतकाच आशियाई राष्ट्रांतही प्रभाव पडला. बॉयझॉन बॅण्डमधील रोनन केटिंगच्या ‘व्हेन यू से नथिंग अॅटऑल’ या गाण्याची कैक व्हर्शन्स उपलब्ध आहेत. हे गाणेही मूळ नाही. पण लोकप्रियतेच्या बाबतीत ते इतर गाण्यांहून पुढे आहे. एका बागेतील बाकडय़ाच्या कोपऱ्यात बसलेल्या रोनन केटिंगवर चित्रित झालेल्या या गाण्यावर टॉम हँक्सच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा प्रभाव असण्याची शक्यता जास्त आहे. संपूर्ण गाणेच गमतशीर आहे. त्याच्या प्रेमाळलेल्या शब्दांइतकेच हे चित्रीकरण पाहण्याजोगे आहे.
सलिन डिऑनच्या ‘माय हार्ट विल गो ऑन’ला बिगरइंग्रजी घरात आजही आवडीने ऐकले नि पाहिले जाते. पण या गाण्यानंतरही तिने फार सुंदर गाणी तयार केली. त्यातले ‘स्टुअर्ट लिटिल’ या चित्रपटासाठी तयार करण्यात आलेले स्वप्रेमावरचे गाणे ‘आय अॅम अलाइव्ह’ सर्वाना आवडू शकेल. या गाण्याच्या दोन्ही व्हर्शन्समध्ये एक खेळण्यातील विमान आहे. एकामध्ये चित्रपटातील नायक उंदीर चालवितो आणि दुसऱ्यात मुलगा रिमोट कन्ट्रोलद्वारे विमान फिरविताना, विमानाच्या इंजिनाच्या सांगाडय़ामध्ये सिलिन डिऑन गाणे गाताना उभी दिसते. टायटॅनिकच्या बोटीनंतर तिचा गानप्रवास विमानात चित्रित करण्याची इथली कल्पकता पाहण्याजोगीच आहे. या गाण्यातील खेळण्यातील विमानाच्या चित्रीकरणावरून याच काळातील आणखी एक स्वप्रेमाचे गीत चटकन लक्षात येते ते म्हणजे शेरील क्रो हिचे ‘एव्हरीडे इज वायंडिंग रोड’ या गाण्याचे चित्रीकरण. एका लहान मुलाच्या हातातून निसटलेल्या या विमानाच्या प्रवासासोबत शेरील क्रो हिचा गाणंभर सुरू राहणारा संवाद पकडून ठेवणारा आहे. एखाद्या कोळीगीतासारखी सुरुवात
वाटणारे आणि नंतर त्यातल्या सर्वच वाद्य-सूर आणि चित्रीकरणाशी एकरूप झालेले हे गाणे नव्वदोत्तरी पिढीच्या बंडखोरीचे प्रतीक आहे. पण त्यातली जादू या गाण्याच्या आणि गायिकेच्या चटकन प्रेमात पाडणारी आहे. प्रेमदिवसानिमित्ताने समाजमाध्यमं देत असलेल्या पाहायच्या आणि ऐकायच्या आत्ताच्या फॉरवर्डेड यादीत कदाचित न सापडणारा आणखी एक बॅण्ड म्हणजे ‘सिक्स पेन्स नन द रिचर’. या बॅण्डने ‘किस मी’ या गाण्याला सर्व खंडातील प्रेमगीत बनवून सोडले होते. इथेही एका बागेतील बाकडय़ावर दाटीवाटीने बसलेले बॅण्ड सदस्य आहेत. पण वातावरण लख्ख रात्रीतले आहे. खरा भासणारा कृत्रिम चंद्रप्रकाश आणि त्यात त्यांची प्रमुख गायिका ली नॅश हिच्या चेहऱ्यावर सातत्याने फिरणारा कॅमेरा, बाकडय़ावर दाटीवाटीतही संगीत निर्मितीतील आणि श्रवणातील निवांतता अनुभवणारे कलाकार असा सूरमयी जामानिमा या गाण्यात सुरेख जमलेला पाहायला मिळतो. आपल्या काळात दंतकथा बनलेल्या या गाण्याची जगभरातील हौशी गायकांनी तयार केलेली व्हर्शन्स यू टय़ुबवर गाजली आहेत. पाहता क्षणी प्रेमात पडावे, इतका हा व्हिडीओ देखणा बनला आहे. याच बॅण्डने तयार केलेली सर्व गाणी प्रेमधडे देणारी आहेत. आज चलती असलेल्या टेलर स्विफ्टच्या प्रेमगीतांना (लव्हस्टोरी) किंवा विरहगीतांना (वी आर नेव्हर गेटिंग बॅक टूगेदर) तरुणांची पसंती आहे. तिची सर्व गाणी ही जाहीरपणे आत्मवृत्तगीते आहेत. पण त्यातही ‘आय न्यू यू वेअर ट्रबल’सारख्या कथात्मक प्रेमविरोधी गीताला पाहावे. साधेपणातही किती वैविध्य असू शकते, याची प्रचीती त्या गाण्यातून येईल. तुम्ही प्रेमविरोधी असा किंवा प्रेमपुजारी. या गाण्यांना पाहिल्यानंतर भावनांचा स्तर बदलण्याची शक्यता अधिक. तेव्हा आपल्या भावनांची लिटमस चाचणी यंदाच्या ‘व्हॅलेण्टाइन’ निमित्ताने करता येऊ शकेल.
व्हॅलेंटाइन वीकएण्डसाठी मस्ट वॉच लिस्ट
https://www.youtube.com/watch?v=8N-qO3sPMjc
https://www.youtube.com/watch?v=AuJrEBtmM1Q
https://www.youtube.com/watch?v=NJsa6-y4sDs
https://www.youtube.com/watch?v=khrx-zrG460
https://www.youtube.com/watch?v=WA4iX5D9Z64&list=RDWA4iX5D9Z64#t=0
https://www.youtube.com/watch?v=vNoKguSdy4Y
viva@expressindia.com