सोलो ट्रॅव्हलर्ससाठी हल्ली अनेक सोशल साइट्स आणि संस्था विशेष सहली आयोजित करतात.
अशा सहलींना जाणाऱ्या मुलींची संख्याच जास्त आहे. अशाच एका सहलीचा पहिलावहिला अनुभव..
अनेकदा आपल्याला कुठे तरी बाहेर जायचं असेल तर आपण कोण सोबतीला आहे का ते पाहतो. मग, ते एखादा सिनेमा पाहण्यासाठी असो किंवा सहजच मित्र-मैत्रिणींना भेटणं असो. प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कोणी तरी लागतंच. एकटय़ाने कशी शॉपिंग करू, सिनेमा, नाटकाला जाऊ.. हे काय एकटय़ाने पाहायची गोष्ट आहे का? असे प्रश्न आपल्याला पडतात. नित्यनियमाच्या या मौजमजेमध्ये आपल्याला सोबत लागतेच. बाहेर कुठे तरी एकटय़ानेच भटकंतीला जाण्याचा विचार तर आपल्या ध्यानीही नसतो. फिरायला जायचं तर मित्रांसोबतच.. त्यातच खरी मजा आणि आनंद. यात चुकीचं काहीच नाही. काही महिन्यांपर्यंत मीही असाच विचार करून फिरायला जायचे, पण अचानक ‘गुजरात कच्छ रण उत्सव’मध्ये जाण्याची संधी मला मिळाली. बरोबरचं असं कुणीच नव्हतं.
मी तेव्हापर्यंत एकटीने कुठेच फिरायला गेले नव्हते. मुंबई ट्रॅव्हलर्स कंपनीसोबत पहिल्यांदा मी कच्छला रण उत्सवला गेले. तशी एकटीच. कोणीही ओळखीचं नाही. अनोळखी लोकांसोबत चार ते पाच दिवस एकत्र राहायचं. किती मुलं असतील, किती मुली असतील, ते सुरक्षित असेल ना.. असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात आणि त्याहून अधिक प्रश्न माझ्या आई-बाबांच्या मनात आले. पण काहीही करून इथे जायचंच असं ठरवल्यानंतर मी गेलेच. या ट्रिपसाठी मी ट्रेनमध्ये चढल्यावर पहिल्यांदा इतर ट्रिपमेट्सना भेटले तेव्हा मला कळलं की तिथे कोणीच कोणाला ओळखत नव्हतं. सगळेच एकएकटे आले होते. तेव्हा मनातली भीड जरा चेपली गेली. एकंदरीतच सोलो बॅकपॅकिंगचा अनुभव हा माझ्या आयुष्यातला एक सुखद अनुभव होता. समाजापेक्षा आपणच स्वत:ला बांधून ठेवतो.
हे जमणार नाही, ते जमणार नाही असं आपल्याला वाटत असतं आणि त्यातच आपण अनेक आनंदाच्या क्षणांना मुकतो. नेहमी कोणा ना कोणासाठी आपण थांबलेलो असतो. ही मैत्रीण आली तर बरं होईल, हा मित्र आला तरच घरचे पाठवतील अशामध्ये आपण आपला आनंद दुसऱ्यांवर अवलंबून ठेवतो. पण एकटं फिरण्याची आणि वेगवेगळ्या गोष्टी एकटय़ाने एक्सप्लोर करण्याची मज्जाच काही और असते. नवीन माणसं भेटतात, त्यांचे विचार, त्यांचं आयुष्य कळतं. एका अनोळख्या व्यक्तीसोबत रूम शेअर करताना आपण काही तडजोडी करतो.
ट्रिपच्या सुरुवातीला माझ्याबाबतीत असंच घडलं. मी पहिल्या भेटीत फारशी कोणाशी बोलत नाही. त्यामुळे जेव्हा ट्रेनमध्ये माझी सगळ्यांशी ओळख झाली तेव्हा काही तासांतच प्रत्येक जण एकमेकांशी सहजतेने बोलायला लागला. मी मात्र त्यांचं बोलणंच ऐकत होते. दुसऱ्या दिवशीही संध्याकाळपर्यंत ट्रेनचाच प्रवास असल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांनी ट्रेनमध्येच पत्ते खेळायचं ठरवलं. मीही त्यात सहभागी झाले. हळूहळू पत्ते खेळताना मी त्यांच्यात एवढी मिसळून गेले की ट्रिपच्या शेवटच्या दिवशी त्यांनीच मला गप्प राहण्याचा सल्ला दिला. अनेकदा अचानक झालेली मैत्री दीर्घकाळ टिकते. बॅकपॅकिंगची मैत्रीही अशीच काहीशी असते. इथे आलेल्या लोकांना तुमच्या भूतकाळात आणि भविष्यात काहीही स्वारस्य नसतं. आजचा दिवस मनमुराद जगण्याकडे त्यांचा कल असतो. नेमकी हीच गोष्ट मला पुन:पुन्हा बॅकपॅकिंग ट्रिप करायला भाग पाडते असंच वाटतं. मजा, मस्ती, हसू, खाणं, नवे मित्र-मैत्रिणी जोडत आणि खूप सारे अनुभव घेत ट्रिप कधी संपते हे खरंच कळत नाही. हम्पी, कर्नाटकला गेले असता तिथे मी एकटी स्कूटी घेऊन संपूर्ण दिवस फिरत होते. हा रस्ता कुठे जातोय माहीत नाही.. रस्ता चुकू याची भीती मनात नाही.. फक्त ती स्कूटी आणि मी.. हा अनुभव माझ्यासाठी आतापर्यंतच्या अनुभवांपेक्षा खूप जास्त आनंद देणारा होता. आनेगुडी नावाचं एक ठिकाण हम्पीमध्ये आहे. जिथे हनुमानाचा जन्म झाला ते ठिकाण. त्या ठिकाणी खूप चढत वर जावं लागतं. पण वर गेल्यावर संपूर्ण हम्पीचं जे दर्शन होतं ते नेत्रसुख मी शब्दांत मांडूच शकत नाही. हे लिहीत असतानाही मला ते सगळं काही स्पष्ट आठवत आहे.
मी माझ्या कच्छच्या पहिल्या सोलो ट्रिपनंतर आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागले. फार छोटय़ा छोटय़ा गोष्टींनी मी आधी फार दु:खी व्हायचे. पण आता मात्र मी गोष्टी सोडून द्यायला शिकले. इतरांपेक्षा मी स्वत:मध्ये अधिक वेळ गुंतवायला लागले, ज्याचा मला फायदाच झाला. ट्रॅव्हल तुम्हाला खऱ्या अर्थाने जगायला शिकवतं. लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो; जो आजच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो.
सध्या भारतात बॅकपॅकिंगचं प्रमाण वाढायला लागलंय. त्यातही अनेकांना अजूनही बॅकपॅकिंगमध्ये मुलांचंच प्रमाण जास्त असेल असं वाटतं. पण मला मात्र वेगळाच अनुभव आला. मी आतापर्यंत जेवढय़ा बॅकपॅकिंगच्या ट्रिप केल्या त्यात मुलांपेक्षा मुलींचंच प्रमाण अधिक होतं. मुलं तर हातावर मोजण्याएवढीही येत नाहीत. आतापर्यंत ज्या मुलींना मी ट्रिपमध्ये भेटले, त्यातल्या प्रत्येकीलाच एक तर स्वत:साठी वेळ काढायचा होता किंवा आपल्या क्षमता अजमावून पाहायच्या होत्या. मुलींना फिरायला जायचं म्हटलं की आजही काही प्रमाणात त्यांना आपल्या ग्रुपवर किंवा त्यांच्या मैत्रिणींवर अवलंबून राहावं लागतं. पण आता ही परिस्थितीही बदलत चालली आहे. मी अनेक सोलो बॅकपॅकिंगच्या ट्रिप केल्या. कोणत्या मुलीला एकटय़ाने जर सुरुवात करायची असेल तर पहिल्यांदा मुंबई ट्रॅव्हलर किंवा त्यांच्यासारख्या इतर ग्रुपबरोबर जाण्यास काहीच हरकत नाही. एकदा का तुमच्यात एकटं फिरण्याचा आत्मविश्वास आला की मग तुम्ही स्वत:ही कोणत्याही राज्यात न घाबरता जाऊ शकता. पण सुरुवात कोणत्या तरी ग्रुपनेच करावी असं मला वाटतं. कारण तिथे ज्या लोकांशी आपली ओळख होते, त्यांच्याकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या खूप काही शिकता येतं.
फेसबुकवर दुसऱ्यांचे बॅकपॅकिंगचे फोटो बघणारी मी, स्वत:ही कधी अशी एकटी फिरेन आणि माझा अनुभव असा शब्दात मांडेन हेही कधी वाटलं नव्हतं. बॅकपॅकिंगने ही गोष्टही दिलीच.. कच्छ, कर्नाटक, वाराणसी अशा अनेक ठिकाणी फिरून मी माझ्या अनुभवांचं गाठोडं वेळ मिळेल तसं भरतेच आहे, पण तुमचं काय?
मधुरा मोहन नेरुरकर
madhura.nerurkar@gmail.com