लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशा पारंपरिक समारंभांना जाताना मेकअप आणि हेअरस्टाइल कशी हवी?
लग्न समारंभांसाठी तयार होताना कपडे, दागिने यांच्याबरोबर मेकअप कसा हे महत्त्वाचं ठरतं. नवऱ्यामुलीसाठी ब्रायडल मेकअप ठळक आणि तसा नेहमीच्या साचातील दिसत असला तरी लग्नासाठी उपस्थित असणाऱ्या बाकी मुलींच्या मेकअपमध्ये प्रयोगाला वाव असतो. या सीझनमध्ये कशा प्रकारचा मेकअप आणि हेअरस्टाइलचा ट्रेण्ड आहे याविषयी ओरिफ्लेमच्या ब्युटी आणि मेकअप एक्सपर्ट आकृती कोचर यांनी दिलेल्या काही टिप्स:
* ज्यांची त्वचा नितळ आहे आणि त्वचेवर फारशी डार्क सर्कल्स किंवा पॅचेस नाहीत, त्यांनी ओठांना लाल, बरगंडी अशा गडद रंगाचा लिपकलर वापरावा.
* भारतीय लग्नसोहळ्यांमध्ये मेकअपचा ठरावीक पॅटर्न दिसतो. त्यात ब्राँझ, गोल्ड, रोझ आणि कॉपर शेड्सचा वापर डोळ्यांच्या मेकअपसाठी केला जातो. त्याबरोबर भरपूर काजळ आणि स्मज्ड आयलायनर वापरलं तर चांगलं दिसेल. नेहमीचे विंग्ड आयलायनर टाळावे.
* तुमच्या भुवयांकडे लक्ष द्यायला हवं. भुवयांमुळे चेहऱ्याला एक फ्रेम मिळते आणि त्याचा उपयोग सगळ्या चेहऱ्याला उठाव देण्यासाठी होतो. जाड, दाट, काळ्याभोर भुवया हा गेल्या काही वर्षांपासून ट्रेण्ड आहे. तो ट्रेण्ड आणखी काही काळ कायम राहणार आहे. व्यवस्थित ग्रूम केलेल्या जाड आयब्रोज तुम्हाला यंग लुक देतात. त्यामुळे भुवया अति कोरण्याच्या फंदात पडू नका.
* कुठल्याही मेकअपचा महत्त्वाचा भाग म्हणजे नितळ त्वचा. चेहरा नितळ दिसण्यासाठी लिक्विड फाऊंडेशनचा वापर करा आणि त्यानंतर लूज पावडर आणि बफर ब्रश वापरून गरज असेल तिथे आणखी फिनिशिंग टच देत एकसंधपणा द्या. लग्नसमारंभात ग्लॉसी स्किन हा महत्त्वाचा दागिना असतो, हे ध्यानात घ्या.
वेडिंग सीझन हेअर स्टायलिंग
* हेअर स्टायलिंगमध्ये यंदा कुठला एकच असा ट्रेण्ड नाही. कर्ली ओपन कर्ल्सपासून ते वेव्ही मोकळ्या केसांपर्यंत सगळं काही चालेल. माथा पट्टी किंवा इतर हेड गिअर्स वापरू शकता. नेहमीचा अंबाडा किंवा उंच बांधलेला बन क्लीन लुक देतो. तोही चांगलाच दिसेल. कुठलीही हेअरस्टाइल केलीत तरी एक महत्त्वाचा मुद्दा विसरू नका. जास्त दागिने घालणार असाल तर केसांवर फार अॅक्सेसरीज नकोत. मिनिमल ज्युलरी असेल तर हेड गिअर किंवा अॅक्सेसरीज चांगल्या दिसतात.
* पारंपरिक साडी किंवा लेहंगा वापरणार असाल तर अंबाडा किंवा हाय बन सुंदर दिसेल. त्यावर छोटे फूल किंवा गजरा एवढय़ा अॅक्सेसरीजसुद्धा पुरेत.
* टेक्श्चर्ड बन असेल तर त्यावर पुन्हा वेगळ्या अॅक्सेसरीज नकोत. अगदी गजरा आणि फुलंही नकोत.
* हेअरस्टाइलमध्ये प्रयोग करायची इच्छा असेल तर मेसी ब्रेड किंवा हाफ टाय हेअरस्टाइल ट्राय करा. केस मोकळे सोडून फुलांचे हेडबँड लावले तरी सुंदर दिसेल.
(ओरिफ्लेम इंडियाच्या ब्युटी एक्सपर्ट आकृती कोचर यांनी या लेखासाठी माहिती दिली.)