‘जर्नलिझम इज लिटरेचर इन हरी’ अशी व्याख्या आम्हास शिकवण्यात आली. त्या नात्याने आम्ही साहित्य उपासक ठरतो. त्यामुळे साहित्य संमेलन ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवणं क्रमप्राप्तच. मग काय तडक निघालो.
मित्रमंडळी आणि घरच्यांना आम्ही डोंबोली नगरीत जातोय सांगितलं. डोंगरापलीकडच्या ‘ठाणे ग्रामीण’मध्ये जाणार म्हटल्यावर त्यांनी आम्हाला दोन वस्तू देऊ केल्या. एक चिलखत आणि दुसरं थंडीसाठी जर्कीन. इतिहासकालीन साधनसामुग्रीचं कलियुगात काय काम, असा प्रश्न मनी डोकावणं साहजिकच. चिलखताचं प्रयोजन समजून घेण्यासाठी तुम्ही सकाळी ६ ते १० या वेळेत डोंबोलीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर जायला हवं. ट्रेन येतेय का हे किमान सात वेळा वाकून पाहिल्यावर आधीच गच्च भरलेल्या गॅसचेंबरमध्ये म्हणजे ट्रेनमध्ये चढण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू होते. आपलं शरीर, स्मार्टफोन, बॅग यांचा बचाव करत ट्रेनमध्ये चढण्यासाठी चिलखत परिधान करण्याचा सल्ला आम्हास देण्यात आला, तो आम्ही मानला. जर्कीनही साधं नाही- बरोब्बर मणक्याच्या जागी केशरी रंगात जगदंब लिहिलेलं महाराजांची प्रतिमा असलेलं ग्रे रंगाचं जर्कीन. महाराजांची साथ असली की मोहीम फत्ते होणारच!
ही सगळी उठाठेव कशासाठी? काहीही प्रश्न पडतात राव तुम्हाला! एरव्ही मायाजालात सैरावैरा होणाऱ्या गोष्टींपर्यंत पोहचणं तुम्हा-आम्हाला शक्य नसतं. पण महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या डोंबोलीत भरलेल्या साहित्य संमेलनाने ही उणीव भरून काढली. मजल दरमजल करत आम्ही भविष्यकालीन स्मार्ट सिटीत उतरलो. अर्धवट तोडलेली अनधिकृत बांधकामं-निखळलेले पेव्हर ब्लॉक-खणलेले रस्ते-वायरींचं जंजाळ यातून वाट काढत आम्ही त्रिचाकी थांबा गाठला. आम्ही काही विचारण्याआधीच समोरून आवाज आला. भाऊ, साहित्य संमेलन का? ही सांस्कृतिक तळमळ पाहून आम्ही सद्गतीत (चांगल्या मराठीत यालाच ‘फीलिंग चोक्ड’ असं म्हणतात) झालो. सिमेंटच्या जंगलातून साहित्य नगरीत पोहचेपर्यंत शहराचं स्थित्यंतर पाहून ‘स्मार्ट सिटी- आज-उद्या-परवा’ असा एक परिसंवाद आयोजित करावा असं मनी दाटलं. प्रांगणातलं संमेलनाचं भव्य बोधचिन्ह पाहून आम्ही हरखून गेलो. लालबाग परळमधल्या मिलच्या चिमण्यांप्रमाणे गगनचुंबी बोरू पाहून आम्ही लगेच स्वयंप्रतिमाखेचदंडुका (सेल्फीस्टिक) काढला. जस्ट चेक्ड इन @पु.भा. भावे सांस्कृतिक नगरी अशा टॅगसह फोटो टाकला. पुढच्या दीड मिनिटात २९ लाइक्स आले. याला म्हणतात संमेलन ट्रेंडिंग होणं, व्हायरल म्हणजे लुख्खा वाटलं होय तुम्हाला. हे उरकतोय तोच आमची नजर टी-शर्ट स्टॉलवर गेली. चे गव्हेरा (हे एका देशाचे नेते होते. त्यांच्या नावाचे, छायाचित्राचे टी-शर्ट खपतात) यांच्याप्रमाणे मराठी साहित्यिकांच्या छायाचित्राचे टी-शर्ट पाहून आम्ही आनंदलो. १० टक्के डिस्काउंटसह अर्धा डझन टी-शर्टचा खोका ताब्यात घेतला. बिलही घेतलं, श्रिंक झाले तर पुढच्या वर्षी बदलून घ्यायला. एक खंत राहिली-चाचा चौधरी व साबू, चंपक आणि ठकठक लिहिणाऱ्यांचं छायाचित्र असलेले टी-शर्ट मिळाले नाहीत. ‘माझं वर्तुळ, माझा परीघ, माझं क्षितिज’ असा एक भूमितीय साहित्यावर परिसंवाद होता. मीपणा जपणारे वक्ते कार्यक्रम सुरू होण्याआधीचं चहापान करत होते. तसंही यंदा ग्यान, बोलबच्चन ऐकायचं नाही असा पण आम्ही डोंबोलीच्या वेशीवर केला होता.
तिथून पुढे जातोय तोच एक संवाद कानी पडला.
हाय, आफ्टर लाँग टाइम. साहित्य संमेलन अॅण्ड ऑल. लुकिंग गॉर्जयस. हाऊज लाइफ?
आय अॅम कुल (‘यो’ अशी खूणही केली) मी चेतन भगतचं ‘वन इंडियन गर्ल’ घेतलं लायब्ररीमधून तिसऱ्यांदा. आय गॉट बेस्ट रिडर अवॉर्ड. फेलिसिएशन होणार आहे माझं.
वॉव, ऑसम!
‘भगत’ प्रेरित मंडळींची साहित्याविषयीची ओढ ऐकून आम्ही चेतनलो. सांस्कृतिक भारावलेपणाने पोट भरू शकत नाही याची जाणीव झाल्यावर उदरभरण कक्षात गेलो. वडापावपासून चायनीज भेळपर्यंत कॅलिडोस्कोपी पदार्थ पाहूनच मन भरलं. बहुतांशी मंडळी ‘कूपन’ सिस्टमद्वारे मजबूत पुख्खा झोडत असल्याचं चित्र आम्ही टिपलं. ‘खाणाऱ्याने खात जावे’ हा त्यांचा मंत्र असेल असं मानून आम्ही मोर्चा वळवला तो पुस्तक खरेदीकडे. कादंबरी ते पटकथा संक्रमण जाणून घेण्यासाठी आम्ही सुहास शिरवळकरांची ‘दुनियादारी’ कादंबरी तातडीने खरेदी केली. त्यानंतर आम्ही काय आणि किती खरेदी केली विचारूच नका. ६३ पुस्तकांच्या मंडपस्क्रॅपरी थप्पीचा फोटो काढून त्वरित फेसबुकी अपलोड केला. लोक फार भोचक. म्हणून तळटीप टाकली. (सदरहू पुस्तकं फक्त खरेदी केली आहेत. पुस्तकातील मजकूर आणि तपशिलावरून खल करू नये) बुकशेल्फमध्ये एकावर एक रचलेली पुस्तकं दिसली की घराला इंटलेक्च्युअल फील येतो यावर आमचा दृढ विश्वास आहे. आमच्या भ्रमणध्वनीची बॅटरी आचके देत असताना लोक मात्र तगडय़ा बॅटरीवाल्या फोनसह अहमहमिकेने सेल्फी, ग्रुपी, फॅमिली असे सगळे फोटो काढत होते आणि अपलोडही करत होते. भ्रमंतीदरम्यान डोकावलो तर एका परिसंवादाला श्रोत्यांपेक्षा वार्ताकन करणाऱ्या पत्रकारांचीच संख्या जास्त दिसली.
समोरासमोर बोलतानाही मांदियाळी, ललामभूत, व्यामिश्र अशा शब्दांनी संवाद साधणारी मंडळी दिसली. इतकं मधाळ गोड ऐकण्याची सवय नसल्याने त्यांच्याभोवती मुंग्याडोंगळ्यांचं वारुळ तयार होईल असं आम्हास वाटलं. पुढच्या संमेलनात असं कौतुकी मराठी बोलणं शिकवणारे वर्ग घ्यावेत असा ठराव मांडा अशी सूचना अभिप्राय वहीत नोंदवली. तेवढय़ात डोंबोली पश्चिमेस राहणाऱ्या मित्राचा मेसेज आला. बाइकमधलं पेट्रोल संपलंय. वेस्ट ‘वेस्ट’ असल्याने इकडे पेट्रोलपंप नाही. संमेलनाला नको. स्टेशनला येतो रिक्षाने. तिकडेच भेटू. मग काय भरल्या मनाने निघालो. लगेच स्टेटसही टाकलं- एनरिचिंग एक्सपिरिअन्स! हॅशटॅगही टाकले ७-८. स्टेशनला येईपर्यंतच ३७ लाइक्स आणि १९ कमेंट्स आलेल्या. गोष्टी उगाच व्हायरल होत नाहीत..
viva@expressindia.com