हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.
सौंदर्यप्रसाधनांची दुनिया म्हणजे एक भूलभुलैया आहे. संग्रही कितीही प्रकार, रंगछटा असल्या तरी नवं हवंच असतं. मात्र या हवंहवंसं असण्याला दर्जाची, खात्रीची जोड मिळायला हवी. स्त्रीवर्गासाठी त्यांचा चेहरा म्हणजे अतिशय जिव्हाळ्याचा आणि जपणुकीचा विषय. चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी जी उत्पादनं अनेकांना खात्रीशीर वाटतात त्यातला एक महत्त्वाचा ब्रॅण्ड म्हणजे मेबलीन (maybelline) न्यूयॉर्क.
ही गोष्ट आहे १९१३ सालची. अमेरिकेतील शिकागो येथे थॉमस विल्यम्स नामक केमिस्ट राहत होता. त्याची मोठी बहीण मेयबल ही एका व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. मात्र त्या व्यक्तीचं लक्ष भलत्याच कुणी वेधून घेतलं होतं. मग आपल्या प्रिय व्यक्तीचं लक्ष वेधून घेण्यासाठी मेयबल प्रयत्नशील झाली. सौंदर्यप्रसाधनांच्या माध्यमातून डोळ्यांच्या पापण्या आणि भुवया अधिक आकर्षक करण्यावर तिचा भर होता. विल्यम्सने आपल्या बहिणीच्या या प्रयत्नांना साथ द्यायचं ठरवलं आणि त्यासाठी पेट्रोलियम जेलीमध्ये कार्बन डस्ट मिसळून त्याने मस्कारा बनवला. सौंदर्यप्रसाधनांमध्ये मस्कारा ही गोष्ट त्या काळात अजिबात नवखी नव्हती. अगदी क्लिओपात्राच्या काळापासून मस्कारा अस्तित्वात होता, पण विल्यम्सने बनवलेला मस्कारा अतिशय सोयीचा होता. तो काढणं सोपं होतं. त्या मस्काऱ्याने मेयबल अधिक आकर्षक दिसू लागली. शेवटी या सगळ्याचा चांगला परिणाम होऊन तिला तिचं प्रेम गवसलं आणि विल्यम्सला त्याचा मार्ग. आपल्या बहिणीसाठी बनवलेल्या या मस्काऱ्याला त्याने व्यावसायिक पद्धतीने विकायचं ठरवलं. जिच्यासाठी त्याने हे केलं, त्या बहिणीचंच नाव उत्पादनाला देण्यात आलं आणि १९१५ मध्ये जन्माला आला ब्रॅण्ड मेयबलिन. याचाच उच्चार मेबलीन असाही केला जातो.
या मस्काऱ्याचं वैशिष्टय़ म्हणजे तो रोज वापरला तरी चालणार होता. कारण त्याआधी मस्काऱ्यासाठी आधी मागणी नोंदवावी लागे. अल्पावधीत हे उत्पादन इतकं यशस्वी झालं की बायका अगदी औषधांच्या दुकानात जाऊनही त्याची मागणी करू लागल्या. ही वाढती मागणी लक्षात घेऊन विल्यम्सने नवनवीन सौंदर्यप्रसाधने आणण्यास सुरुवात केली. मेबलीनने १९३२ साली सौंदर्यप्रसाधनांची जाहिरात रेडिओवर केली. तेव्हा अशा सौंदर्यप्रसाधनांची रेडिओवर जाहिरात करणारी ती पहिली कंपनी होती. १० सेंट इतक्या माफक किमतीत मिळणाऱ्या या सौंदर्यप्रसाधनांना लवकरच मागणी वाढली.
पुढे विल्यम्सने १९६७ साली प्लो या कंपनीला आपला हा ब्रॅण्ड विकला. त्यानंतर अभिनेत्री लिंडा कार्टर या ब्रॅण्डशी जोडली गेली आणि मेबलीन अधिक लोकांपर्यंत पोहोचू लागलं. १९९१ साली मेयबिलीनचं स्लोगन प्रसिद्ध झालं. ‘मे बी इट मेबलीन’ ही टॅगलाइन आजही प्रसिद्ध आहे. मेबलीनचा लोगो म्हणजे डार्क काळ्या रंगाच्या अक्षरातील मेबलीन हे नाव. डोळ्यांच्या सौंदर्यासाठी मस्कारा, आयलायनर, काजल या प्रसाधनांपासून मेबलीनची सुरुवात झाली. त्यामुळे या उत्पादनांमधील शार्प डार्कनेस लोगोमध्ये डोकावतो. प्लो कंपनीनंतर १९९६ मध्ये लॉरियलने (L’Oréal ) हा ब्रॅण्ड विकत घेतला. आज १२९ देशात मेबलीन २०० उत्पादनांसह विस्तारलंय.
बहिणीचं प्रेम तिला मिळवून देण्यासाठी भावाने शोधलेला हा ब्रॅण्ड आज लोकप्रिय झाला आहे. जेव्हा एखादी स्त्री छान तयार होऊन येते तेव्हा तिच्याकडे पाहताना, तिच्या सौंदर्यप्रसाधनांचा ब्रॅण्ड कोणता असावा याचा अंदाज बांधला जातो. अशा वेळी सहज नजर जाते, डोळ्यांकडे.. आणि मनात विचार येतो.. मे बी मेबलीन.. हीच या ब्रॅण्डची ओळख आणि खासियत.
रश्मि वारंग viva@expressindia.com