साधारणपणे सकाळचे दहा-अकरा वाजलेले असतील. प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये काम करायला मिळणार या खुशीत आम्ही फॅशन कॉलेजची मुलं पवईच्या एका आलिशान हॉटेलमध्ये पोहोचलो. दिमाखदार रॅम्प, त्यावर आतापर्यंत केवळ टीव्ही किंवा फॅशन शोमध्ये पाहिलेल्या मोठमोठय़ा मॉडेल्स रॅम्पवॉकची तालीम करत होत्या. इतके दिवस ज्यांना आदर्श मानत होतो, आपले कपडे ज्यांनी घालावेत अशी मनोमन इच्छा होती त्या आमच्या नायिका आमच्या डोळ्यासमोर होत्या. तिथे आमचं काम एकच होतं, या मॉडेल्सना रॅम्पसाठी व्यवस्थित तयार करायचं. त्यांचे कपडे, ज्वेलरी, शूज, बॅग जसा स्टायलिशने लुक ठरविला आहे तसंच व्यवस्थित त्यांना तयार करायचं. आमच्या कामाची व्यवस्थित माहिती स्टायलिशने आम्हाला दिली आणि जेवून कामाला लागायची सूचना दिली. आम्हीही मस्त जेवून ट्रायल रुममध्ये आलो, तर समोर बसलेल्या प्रत्येक मॉडेलच्या हातात एकेक वाइन किंवा दारूचा प्याला. नवीन असल्यामुळे आम्ही आमचे काम अधिकच काळजीने करत होतो. तेव्हा एका मॉडेलने सहज हसून म्हटलं, ‘काळजी करू नका, समोरचा प्रेक्षक नक्की काय ‘बघायला’ आलाय हे आम्हाला माहिती आहे. हा एकच प्याला तिच कल्पना पचवण्यासाठीच आहे.’ तिच्या या वाक्याने थोडे थबकलो आणि नकळत बाहेर डोकावून पाहिल्यावर लक्षात आलं, ऐन कामाच्या दिवशी भर दुपारी ‘लॉन्जरे (अंतर्वस्त्र) शो बघण्यासाठी आलेल्या गर्दीतील किती लोकं खरंच शो बघण्यासाठी आलेले आणि कितीजण ‘शौकीन’च्या भूमिकेत होते हे तपासणं खरंच कठीण होतं. ही गर्दी आणि मनाला विचारात पाडणारा हा एकच शो नव्हता. पुढच्या शोमध्ये मॉडेल्ससारखीच आम्हालाही त्यांच्या एकच प्यालातील तंद्रीची सवय झाली होती.

आज अचानक हा विषय काढायचं कारण सध्याच्या लैंगिक शोषणाच्या चर्चेत फॅशनविश्वाचाही धक्कादायक प्रवेश झाला आहे. अर्थात इतर क्षेत्रांप्रमाणे इथेही यापूर्वी लैंगिक शोषणाच्या घटना घडल्या नाहीत असं नाही. फक्त इतरांप्रमाणेच या क्षेत्रानेही मौन बाळगणं पसंत केलं. पण नुकतेच जगप्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर टेरी रिचर्डसन यांच्या विरोधात अनेक मॉडेल्सनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यात ब्रिटिश मॉडेल एडी कॅम्पबेलने खुले पत्र लिहीत ही समस्या केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून या वाळवीने फॅशन क्षेत्राला पूर्णपणे पोखरून टाकल्याच्या बाबीकडे जगाचं लक्ष वेधलं. एडी कॅम्पबेल सांगते की कामाच्या निमित्ताने का होईना, एखाद्या शूट, शोसाठी जाताना त्या दिवसासाठी आम्ही मॉडेल्स त्या डिझायनर, फोटोग्राफर किंवा कंपनीसोबत एका अलिखित करारात बांधले जातो. एका दिवसासाठी आमचं शरीर, चेहरा त्यांचं असतं.’ मॉडेल्सना कलेक्शननुसार कमी-अधिक कपडे घालावे लागतात. कित्येकदा काही शो, फोटोशूट न्यूड (कपडय़ांशिवाय) किंवा सेमी न्यूड स्वरूपाचे असतात. असे शो करण्यापूर्वी त्यांची संपूर्ण कल्पना संबंधित मॉडेल्सना देण्यात आलेली असते, पण ‘अशा स्वरूपाच्या शोसाठी मॉडेल्सना मानसिकदृष्टय़ा खंबीर बनवायचं, त्यांना कुठेही संकोच वाटणार नाही, काम करताना अडचण वाटणार नाही, ही काळजी घेण्याची पूर्ण जबाबदारी त्यांचे एजंट, फोटोग्राफर, डिझायनर यांची असते. पण प्रत्यक्षात खूप कमीजणांना याची जाणीव असल्याचे’ एडी कॅम्पबेल सांगते.

Marathi Actress Deepali Sayed new hotel
अभिनेत्री दीपाली सय्यद यांचं नव्या क्षेत्रात पदार्पण! शिर्डीत भाविकांसाठी सुरू केलं हॉटेल, अनेक राजकीय मान्यवरांनी दिली भेट
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”
marathi actress Ashwini Chavare bold photos
ओले केस अन् गळ्यात फक्त नेकलेस, मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहिलेत का?
Punha Kartvya Aahe
‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत होणार नवीन एन्ट्री; ‘या’ जेष्ठ अभिनेत्री दिसणार गुरूमाँच्या भूमिकेत
actress Megha Chakraborty sahil phull wedding in Jammu
सेलिब्रिटी जोडप्याची लगीनघाई! अभिनेत्याने १ जानेवारीला गोव्यात केलं प्रपोज, २१ तारखेला ‘या’ ठिकाणी करणार लग्न
Marathi actress Shivani sonar and ambar ganpule marry soon
शिवानी सोनार-अंबर गणपुळे लवकरच चढणार बोहल्यावर; लग्नाआधीच्या विधीला झाली सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केले फोटो

अभिनेत्रीप्रमाणेच मॉडेल्सनासुद्धा काही फोटोशूटसाठी उत्तेजक पोज द्यायच्या असतात. कपडय़ांच्या ट्रायल्सच्या वेळी कपडय़ांची फिटिंग, मॉडेलचं मापं घेण्याच्या निमित्ताने डिझायनर, स्टायलिश असे कित्येकांचे हात त्यांच्या अंगभर फिरत असतात. आपण टेलरकडे कपडे शिवायला टाकतो, तेव्हा त्याला आपलं माप देताना त्याच्या नकळत होणाऱ्या स्पर्शानेसुद्धा गडबडायला होतंच ना. मॉडेल्सना हेच काम दिवसाचे बारा तास वेगवेगळ्या व्यक्तींसोबत करायचं असतं. साडी, गाऊनसारख्या कपडे नेसवण्याच्या पद्धतीत दुसऱ्या व्यक्तीचा संबंध सतत येतो. अंतर्वस्त्रे, स्विमसूटसारख्या कपडय़ांच्या बाबतीत हा स्पर्श अजूनच तीव्रतेने जाणवतो. त्यात एखाद्याची ‘शौकीन’ नजर किंवा स्पर्श झाल्यास त्यामुळे मॉडेलला जास्त अवघडलेपण येतं. फोटोशूटमध्येही एखाद्या लूक किंवा पोजसाठी दुसऱ्या मॉडेलच्या अधिक जवळ जावं लागतं. अगदी मेकअप करताना आपण फक्त चेहऱ्याचा विचार करतो. पण मॉडेल्सना अंगभर मेकअप केला जातो. अर्थात हा सगळा कामाचा भाग असल्याने त्याचं गांभीर्य त्या खोलीत उपस्थित असलेल्या प्रत्येकाला त्यावेळी असतं आणि त्याचं भानही प्रत्येकजण पाळतो. पण कधीतरी एखाद्याचा सहजस्पर्शसुद्धा चुकीचा संकेत जाणवून देतो. पण हे सगळं कामाचा भाग म्हणून मॉडेल्स दुर्लक्ष करतात. कित्येकदा अशा घटनांबाबत आवाज उठवल्यावर संबंधित मॉडेलच्या वर्क एथिकबद्दल प्रश्न उभे होतात. त्यामुळे नवे तसेच नामांकित मॉडेल्ससुद्धा गप्प बसणं पसंत करतात. अशा बहुतेक प्रसंगांमध्ये शोषण करणारा बडा डिझायनर, फोटोग्राफर, उद्योजक किंवा गुंतवणूकदार असतो. त्यामुळे त्यांच्याविषयी तक्रार करणाऱ्यांची पुढची कारकीर्द संपलीच असं समजायचं. त्यात फॅशन क्षेत्र हे भारतातच नाही, तर जगभरातसुद्धा संघटित क्षेत्र नाही. त्यामुळे साहजिकच या क्षेत्राबद्दल कुठलेच कायदे, नियम नाहीत. मॉडेल्सच्या संघटना असण्याची उदाहरणंसुद्धा तुरळक आहेत. त्यामुळे अशा प्रसंगात दाद कोणाकडे मागायची याबाबत कोणीच मार्गदर्शन करत नाही. त्यात पोलिसांची मदत घ्यायची तर या क्षेत्राबद्दलची संकुचित वृत्ती लक्षात घेता, मदतीपेक्षा तुसडय़ा नजरेचा आणि बोलण्याचा सामना या मॉडेल्सना करावा लागतो. शेवटी न राहून हे सगळं सहन करायचं मग दारू, नशाबाजीला जवळ करायचा मार्गसुद्धा मॉडेल्स स्वीकारतात. परिणामांची कल्पना असतानाही काम करताना किमान आपण शुद्धीत नसावं, अशी त्यांची भावना असते.

हे सगळं स्त्रियांच्या बाबतीतच होतं असंही नाही. दोन दिवसांपूर्वी मॉडेल जेसन बॉयसने फोटोग्राफर ब्रूस वेबरच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती. ‘त्याने शूटच्या निमित्ताने मला डोळे बंद करून बसायला सांगितलं. मग हळूच माझ्या तोंडात स्वत:ची बोटं टाकली. आणि म्हटलं ‘तू जितका धीट असशील तितका पुढे जाशील’, जेसन सांगतो. यापुढे सांगताना आपण यापुढे या क्षेत्रात काम करत राहिलो तर सतत ब्रूसशी संबंध येईल आणि हे प्रसंग पुन्हा होतील, याची धास्ती वाटू लागल्याचे तो सांगतो. त्यातूनच डिप्रेशन, उदासीनता, भीतीच्या भावना मनात दाटू लागल्याचे तो सांगतो. या प्रसंगातून गेल्याने डिप्रेशनमध्ये अडकलेली कित्येक मॉडेल्सची उदाहरणे जगभरातील फॅशन क्षेत्रात मिळतील. एडी कॅम्पबेल तिच्या पत्रात म्हणते, ‘या क्षेत्रात व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामधील रेषा पुसट झालेली असते. आम्ही एकत्र काम करतो. एकत्र राहतो. काम, गप्पा सगळ्या एकत्र होतात. इतक्या अनौपचारिक वातावरणात कित्येकदा चूक आणि बरोबर याबद्दलचा गुंता वाढतो.’ कित्येकदा मॉडेलिंगच्या क्षेत्रात किशोरवयीन मुलं येतात. या सगळ्या प्रकरणाबाबत ते अधिकच गोंधळलेले असतात. मग अशा वेळी कामासाठी न्यूड सीन किंवा आक्षेपार्ह पोज देण्याला नाही म्हणणं ‘अनकूल’ म्हटलं जातं. या भीतीपोटी ही मुलं गप्प राहतात.

मुळात फॅशन क्षेत्र हे कलेशी निगडित आहे. इतर कलांप्रमाणे यात डिझायनर, फोटोग्राफर, स्टायलिश यांचा कॅनव्हास असतो मॉडेलचं शरीर. व्यक्तीवर कपडे, ज्वेलरी, अ‍ॅक्सेसरी कशी दिसते हे पाहण्याचं काम त्यांचं असतं. या कलेच्या सादरीकरणात त्यांना न्यूड, उत्तेजिक छबीचा आधारसुद्धा घ्यावा लागतो. अर्थात हा प्रश्न फक्त न्यूड किंवा कमी कपडय़ांमुळेच येतो असंही नाही. रस्त्यात छेडछाड मिनी स्कर्ट घातलेल्या तरुणीचीही होते, अंगभर बुरखा किंवा साडी नेसलेल्या स्त्रीचीही होते. आंबट नजरा, स्पर्श यांचा कपडय़ांच्या लांबीशी फारसा संबंध नसतोच. त्यात मॉडेल आहे, म्हणून ‘हे सगळं चालतं’, ‘त्यांनाही हेच हवं असतं’, ‘मी तिला काम दिलं, त्याचा मोबदला हवाच’ हा पाशवी विचारसुद्धा त्यामागे असतो, पण काम करताना व्यक्ती म्हणून मॉडेलच्या प्रतिमेला कुठेही धक्का पोहचणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारीही डिझायनर, फोटोग्राफर आणि इतर मंडळींची असते. या सगळ्याच घटनांकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. एखाद्या मॉडेलबद्दल अशी घटना घडल्यावर ‘हे क्षेत्रंच असं आहे’, ‘असंच होणार यांच्यासोबत’, असे विचार करण्याऐवजी माणूस म्हणून त्यांच्यामागे उभं राहण्याचं धाडस समाजानेही करायची गरज आज निर्माण झाली आहे.

viva@expressindia.com

Story img Loader