‘गुगल’इतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले ‘वॉच’लेले काही कण अर्थात काही ‘मस्ट वॉच’ व्हिडीओ.
पहिली बासरी श्रीकृष्ण नामक देवाने वाजविली, अशी भारतामध्ये फार पूर्वापार चालत आलेली समजूत आहे. गंमत म्हणजे देशोदेशी अशाच प्रकारच्या समजुतींच्या कथा आहेत. पहिली बासरी आदिमानवाने प्राण्यांच्या पोकळ हाडामध्ये हवा फुंकून वाजविली असाही एक अंदाज वर्तवला जातो; जो खरा वाटणारा आहे. पहिल्यांदा बासरी जरी कुणीही वाजवली असली तरी आधुनिक जगात या वाद्याला लोकप्रियता मिळाली आहे. भारतीय चित्रपटातील कित्येक नायक बासरी वाजविणारे दाखवून त्यांना श्रीकृष्णाचा अवतार म्हणून साकारण्यात आले आहे. हे सर्वात स्वस्त आणि नेण्यास सोपे असलेले वाद्य आहे. जे खेळणी घेऊन फिरणाऱ्या रस्त्यावरच्या विक्रेत्याकडेही मिळते आणि काचेच्या तावदानात इतर महागडय़ा वाद्यांसोबतही विक्रीसाठी सज्ज असते. निव्वळ सहा छिद्रांमधून संगीतातील सारे सूर उमटविणाऱ्या या वाद्याची अलगूज (उभी बासरी) आणि वेणू (आडवी बासरी) अशी विभागणी असते. ही बासरी आपल्याला सगळ्याच जत्रांमध्ये दिसते. पण देशी बनावटीच्या बांबूंच्या बासऱ्यांहून किती तरी वेगळा सूर देणाऱ्या परदेशी बासऱ्या पाहायच्या असतील तर यूटय़ूबवर नेत्रदीपक आणि श्रवणीय बासरीवादन पाहायला मिळते. सारखेच असले तरी या वाद्यांमध्ये देशोदेशी कशा करामती केल्या जातात हे पाहणे गमतीचे ठरू शकते.
आर्यलड या देशामध्ये बासऱ्या वाजविणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या लोकसंगीतापासून आजच्या पॉप संगीतापर्यंत सर्वामध्ये बासरी हमखास असते. जगातील सर्वात लोकप्रिय बॅण्ड्स आणि कलाकारांची या देशाला परंपरा आहे. यूटू आणि कोर्स भावंडांचा बॅण्ड याच देशात निपजला आणि नंतर अमेरिकेमार्गे जगाला उमजला. या देशात टिन व्हिसल (आपल्याकडच्या उभ्या बासरीसारखे वाद्य) हुकमतीने वाजविली जाते. आजच्या व्हिडीओजमध्ये सर्वात पहिले हे स्थानिक कलाकार आहेत. गेली दहाएक वर्षे हे आयरिश कलाकार यूटय़ूबवर आपल्या घरातील प्रॅक्टिसचे व्हिडीओ पोस्ट करीत आहेत. एखाद्या मैफलीमध्येही इतकी अचूक वादनगिरी सापडणार नाही. या व्हिडीओजचा श्रोता अफाट आहे. कारण आयरिश संगीतातील सूरवेग कानांना नुसता सुखावत नाही, तर शरीरामधल्या साऱ्या नसांना आतून थिरकवून सोडतो. मूलत: नृत्यासाठी वापरले जाणारे हे संगीत ऐकणे आणि त्या वादकांची तल्लीनता पाहणे या व्हिडीओजमध्ये पाहायला मिळू शकते. आपल्या अलगुजीशी समांतर असलेल्या या वाद्याचीही यानिमित्ताने ओळख होऊ शकेल. हे वाद्य वाजविणारे हजारो कलाकार यूटय़ूबवर आहेत. आडव्या बासरीवर हाच सूरवेग साकारताना रंगलेले वादक पाहणे हादेखील सुंदर अनुभूतीचाच प्रकार आहे.
रेकॉर्डर फ्लूट ही मध्ययुगात युरोपात तयार झालेली बासरी. मूळ खजुराच्या झाडाचे लाकूड वापरून केली गेलेली ही बासरी गेल्या काही दशकांपासून भारतामध्येही मिळू लागली आहे. इटली आणि युरोपमध्ये या वाद्यावर क्लासिकल संगीत वाजवणारा ताफा मोठा असला तरी आता जपान या आशियाई राष्ट्रांमध्ये त्याचे केंद्र सरकत आहे. यामाहा या कंपनीकडून या वाद्याची मोठय़ा प्रमाणावर निर्मिती होते. तेथे शालेय शिक्षणामध्ये संगीत विषय शिकविताना हे वाद्य शिकविले जाते. (भारतीय आंतरराष्ट्रीय शाळांमध्येही हे वाद्य अलीकडे विद्यार्थ्यांना परिचित करून दिले जाते.)
इतर वाद्यांवरील नाणावलेल्या कलाकारांप्रमाणे रेकॉर्डरवर पांडित्य मिळविलेल्या मसाटो होंडा या कलाकाराचा व्हिडीओ येथे पाहायला मिळतो. वेगवेगळ्या पट्टीचे रेकॉर्डर्स हा कलाकार लीलया वाजविताना दिसतो. एकाच कलाकाराने विविध पट्टीवर रेकॉर्डर वाजवून त्याचे एकत्रीकरण करून जमवलेला सूरसोहळाही एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळतो.
दक्षिण अमेरिकेमध्ये बांबू एकत्र बांधून तयार करण्यात आलेली पॅनफ्लूट लोकप्रिय आहे. पण मूळचे अमेरिकी रहिवासी रेड इंडियन्स केना नावाची एक बासरी वाजवितात. त्याची ठेवण आपल्या उभ्या बासरीसारखी असली तरी ऐकू येणारा ध्वनी आडव्या बासरीसारखा मधुर असतो. फुंकर मारण्यासाठी या बासरीची रचना फार वेगळी आहे. अशाच प्रकारच्या अनेक बासऱ्या मलेशिया आणि दक्षिण आशियामधील काही देशांत आढळतात. यूटय़ूबवर एकेका वाद्याच्या नुसत्या नावाने शोध घेतल्यास या व्हिडीओमधील सुंदर वादन चित्रणासोबत कृष्णवाद्याचे आधुनिक अवतार पाहायला मिळणे हा वेगळ्या आनंदाचा भाग असू शकतो.
- https://www.youtube.com/watch?v=-TLMz6O4K-Q
- https://www.youtube.com/watch?v=wG8TNiryNgY
- https://www.youtube.com/watch?v=2H1P_Lam76E
- https://www.youtube.com/watch?v=fTjTVekQGdA
- https://www.youtube.com/watch?v=8c9jEvXMm0c
- https://www.youtube.com/watch?v=OXsYO9iyOEs
- https://www.youtube.com/watch?v=2tP8YxwLxzs
- https://www.youtube.com/watch?v=x77KtqKEdFI
viva@expressindia.com