हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.
मीठ ही अगदी साधीशी वाटणारी गोष्ट आयुष्यातील खूप मोठं सत्य सांगून जाते. आपलं जगणं कसं असावं? तर मिठासारखं. अगदी स्वादानुसार. अतिरेक झाला तर खारटपणा येऊ शकतो आणि काटकसर केली तर अळणी व्हायची भीती! या मिठाविषयी सांगण्यासारखं खूप आहे. एकेकाळी रोमन सैनिकांचा पगार मिठाच्या बदल्यात होत असे. त्याला सॉल्टमनी असे म्हणत. सॅलरी हा शब्द त्यातूनच निर्माण झाला. प्राचीन काळी अतिशय मौल्यवान असणारी ही गोष्ट आज खूप सहज झाली आहे. या सहजपणाचं दायित्व प्रामुख्याने ज्या ब्रँडकडे जातं तो ब्रँड म्हणजे ‘टाटा मीठ’
मिठासाठी एकेकाळी गांधीजींना सत्याग्रह करावा लागला होता. मिठाच्या उत्पादनावर ब्रिटिश आमदानीत असंख्य बंधनं होती, हा सगळा इतिहास ताजा असताना दुकानात सुटय़ा मिळणाऱ्या किंवा पायलीवर मिळणाऱ्या मिठाकडून भारतीयांना पॅक मिठाकडे घेऊन जाण्याचं श्रेय टाटा नमकला जातं. टाटा समूहाअंतर्गत टाटा केमिकल्सने व्हॅक्यूम इव्हॅपोरेशन पद्धतीने (निर्वात बाष्पीभवन) तयार केलेलं आयोडाइज्ड शुद्ध मीठ १९८३ पासून आपल्या जेवणात चव आणत आहे. त्याआधीपासूनचा या मिठाचा प्रवासही महत्त्वपूर्ण आहे.
१९२० साली इंग्लंड येथून शिकून आलेले केमिकल इंजिनीअर कपिल राम वकील यांना मीठ उत्पादनात मोठी बाजारपेठ दिसत होती. अरबी समुद्र कच्छच्या रणाला जिथे येऊन मिळतो ती जागा प्रकल्पासाठी त्यांनी निश्चित केली. गुजरात प्रांतात सयाजीराव गायकवाड यांचे मोठे प्रस्थ होते. त्यांनी वकील यांना मदत केली. त्यातून वकील यांनी ‘ओखा मीठ प्रकल्प’ उभा केला. त्यांना हा प्रकल्प विस्तारायचा होता. आर्थिक मदतीच्या दृष्टीने त्यांनी टाटा समूहाला साद घातली. १९३९ साली जे आर डी टाटा यांनी ‘ओखा मीठ प्रकल्प’ विकत घेतला. त्या काळात निर्वात बाष्पीभवन पद्धतीने मीठ वा तत्सम उत्पादनं निर्माण करण्याचे तंत्रज्ञान केवळ ब्रिटिशांनाच अवगत होते. हे तंत्रज्ञान शिकवण्यासाठी त्यांनी टाटांना नकार तर दिलाच शिवाय खिल्लीही उडवली. तत्कालीन सर्वच तज्ज्ञांनी जे आर डी टाटा यांना या उद्योगाबाबत अव्यवहार्य असा शेरा दिला होता. मात्र मिठासारख्या मूलभूत गरजेकरता आपण परावलंबी असावं हे जे आर डी टाटांना अमान्य होतं. अखेर विविध मार्गानी तंत्रज्ञान विकसित करत त्यांनी उत्पादन चालू ठेवलं आणि त्याचं फळ म्हणजे टाटा नमक. गुजरातमधील मिठापूर येथील हा प्रकल्प जगभरातील नामवंत व मोठय़ा मीठ प्रकल्पांपैकी एक गणला जातो.
आज १६ लाखांहून अधिक दुकानांतून महिन्याला ७०,००० मेट्रिक टन टाटा मीठ भारतातील खेडोपाडी विकलं जातं. एकेकाळी अत्यंत मौल्यवान असणाऱ्या या मिठाची किंमत अतिशय माफक ठेवण्याचा टाटा समूहाचा पहिल्यापासूनच निश्चय होता. इतर अनेक प्रतिस्पर्धी ब्रँड निर्माण होऊनही मीठ उत्पादनात टाटा नमकचा वाटा २५% हून अधिक आहे.
भारतातील आयोडिन कमतरतेच्या समस्येसंदर्भात टाटा मिठाची कामगिरी मोलाची आहे. ‘देशको अर्पण’ उपक्रमांतर्गत चाइल्ड रिलीफसाठी टाटा नमकच्या माध्यमातून मोठा निधी उभारला गेला. बदलत्या जीवनशैलीला अनुसरून आरोग्यदायी ‘टाटा नमक लाइट’ आले. २००२ साली ‘ए.सी.नेल्सन २० सवरेत्कृष्ट ब्रँड’मध्ये टाटा नमकची निवड अभिमानास्पद होती. २०१४ सालच्या सर्वाधिक विश्वासार्ह ब्रँडमध्ये टाटा नमकचा समावेश होता.
टाटा मिठाचे ब्रीदवाक्य आहे ‘‘टाटा नमक.. देश की सेहत. देश का नमक.’’ या ओळींनी भारतीयांची मनं जिंकली आहेत. ‘‘मैने आपका नमक खाया है’’ किंवा ‘खाल्ल्या मिठाला जागणे’ वगैरे गोष्टी आजही भारतीय मानसिकतेत महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच ‘देश का नमक’सारखं वाक्य भारतीयांना आपलंसं वाटतं. टाटा समूहाच्या आतापर्यंतच्या वाटचालीत अनेक ब्रँड नफेखोरीपेक्षा देशहिताचा विचार करत रुजलेले दिसतात. टाटा समूहाबद्दलचा हा विश्वास या मिठातही प्रतीत होतो. आपल्या आयुष्यातील अळणीपणा घालवून ते चवदार करणारे मीठ विश्वासार्हतेने या मातीशी इमान राखते. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने ठरते, ‘देश का नमक’!
रश्मि वारंग viva@expressindia.com