‘गुगल’इतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले ‘वॉच’लेले काही कण अर्थात काही ‘मस्ट वॉच’ व्हिडीओ.
सर्वाधिक प्रयोग आणि कलात्मक जग कुठे पाहायला मिळत असते ते जाहिरात आणि म्युझिक व्हिडीओजमध्ये. अडीच ते तीन मिनिटांच्या कालावधीत प्रेक्षकाच्या मनावर ठसणारे दाखविणे गरजेचे असते. तेवढय़ा काळात गोष्ट परिणामकारकरीत्या बिंबवता आली नाही तर ते गाणे किंवा जाहिरात पूर्णपणे ढेपाळते. १९८०च्या दशकातील एमटीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या सगळ्या व्हिडीओजमध्ये एक सर्वागसुंदर मॉडेल आवश्यक असे. गाणे प्रेमाचे असो वा नसो. गाणे एकदा बॅण्डचे व मग त्या मॉडेलचे दर्शन करून देई. नव्वदोत्तरीमध्ये गाणी दिसायला आकर्षक बनू लागली. गायकाला एखाद्या देखण्या पर्यटनस्थळी आपला व्हिडीओ स्वत:सोबत चित्रित करण्याची लहर या कालावधीमध्ये झाली होती. मग चित्रविचित्र डान्स नंबर यायला लागले. जेनिफर लोपॅझ, ब्रिटनी स्पीअर आणि शकीरा यांची नृत्य-गाणी फारच गाजली. सध्याची ताजी गाणी पाहिली तर म्युझिक व्हिडीओजमधला चकचकीतपणा अधिक उग्र झाला आहे. संगणकीय करामतींनी डोक्यात येणाऱ्या सर्वच विचारांना कलात्मक मुलामा देता येणे शक्य झाले आहे. गेल्या आठवडय़ामध्ये ऑनलाइन आणि टीव्हीवर केली क्लार्कसन या पॉपस्टारचे ‘लव्ह सो सॉफ्ट’ हे नवे गाणे प्रसिद्ध झाले. नव्वदीच्या दशकामध्ये भारतीय चित्रपटांतील गाण्यांमध्ये दर दहा ते वीस सेकंदांनंतर नायक आणि नायिकांचे कपडे आणि पाश्र्वभूमी बदलत असे. म्हणजे चित्रपटाचा मुखडा भारतातील काश्मीरमध्ये चित्रित होई तर अंतऱ्यापर्यंत ते स्वित्र्झलडपर्यंतदेखील पोहोचलेले असत. मोठय़ा बजेट सिनेमांमधले गाणे देखण्या पाश्र्वभूमीतच घडे. केली क्लार्कसनच्या नव्या गाण्याकडे पाहिले तर त्यात सतत डोळ्यासमोर बदलत जाणारी पाश्र्वभूमी आणि गायिकेचा पेहराव डोळ्यात भरतो. २००६ साली याच गायिकेचे शिडशिडीतपण ‘ब्रेकअवे’ या गाण्याद्वारे पाहायला मिळाले होते. त्या वर्षीच्या आत्यंतिक गाजलेल्या गाण्यांत ‘ब्रेकअवे’ होते. बारा वर्षांनंतर आज ही गायिका प्रचंड जाड झाली आहे. पूर्वी रॉकस्टार-पॉपस्टार व्हिडीओज बनविताना आपली शरीरयष्टी राखत. केली क्लार्कसन या व्हिडीओमध्ये आपल्या जाडपणासोबत ज्या आत्मविश्वासाने वावरली आहे, ते पाहण्यासारखेच आहे. जाड रॉकस्टार्स अनेक असतील, गेल्या काही वर्षांमध्ये ‘जेस अॅण्ड बॅण्डिट्स’ नावाचा एक अमेरिकी रॉकबॅण्ड गाजतोय. त्यातील दिवा (नायिका आणि गायिका एकच असल्यास वापरला जाणारा शब्द) प्रचंडच जाड आहे. पण तिची सगळीच गाणी तिच्या आवाजामुळे सुंदर बनली आहेत. पंधरा-वीस वर्षांपूर्वी जाड गायिका आपल्या शरीरयष्टीसह कॅमेरासमोर यायला धजावली असती. आत्ता या गायिकेचे जाडपण तिच्या गाण्यातील सौंदर्यात बाधा आणताना दिसत नाही. ब्रिटिश गायिका अडेल हिच्या ग्रॅमी पारितोषिकांवर सातत्याने बाजी मारण्यात तिचे जाडपण आडवे आले नाही. तिच्या यंदाच्या ‘हॅलो’ या गाण्याला पाहावे. कृष्णधवल रंगात चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात एक छानशी गोष्टही आहे.
काही वर्षांपूर्वी व्हायरल झालेल्या गंगम स्टाइल या गाण्याचा दक्षिण कोरियाई गायक साय याने या वर्षी ‘न्यू फेस’ नावाचा व्हिडीओ तयार केला आहे. गंगम स्टाइलसारखाच ठेका, चित्रविचित्र पेहराव आणि मनोरंजक वेडनृत्य यांनी या गाण्याचा व्हिडीओ बनला आहे. या गाण्यामध्येही त्याचा अथक उत्साह दिसतो. ब्रिटिश गायिका डुआ लिपा हिचे ‘न्यू रूल्स’ हे गाणे सध्या गाजतेय. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये शोधाल तर नव्वदीच्या दशकातील बॉलीवूडच्या नायिकांची गाणी आठवायला सुरुवात होईल. एका बडय़ा हॉटेलमधील रूममध्ये असलेल्या अनेक मुली. नायिका झोपेतून जागी होते आणि सगळ्या मुलींच्या घोळक्यात मध्यभागी येत प्रेमगाणे गाऊ लागते.
या शतकातील सर्वात श्रीमंत पॉपस्टार बनलेल्या टेलर स्वीफ्टचेही एक गाणे नुकतेच दाखल झाले आहे. ‘लुक व्हॉट यू मेड मी डू’ या गाण्यामध्ये सुरुवातीला तिचे हडळरूप पाहण्यासारखे आहे. टेलर स्वीफ्टची सगळीच गाणी ऐकण्याच्या चिजा असतात. तिचे काही व्हिडीओ सुंदर असतीलही, पण आजवरचे सर्वात कमी ऐकावेसे वाटेल असे गाणे तिने तयार केले आहे. आकर्षक व्हिडीओने ते व्हायरल होईल, पण पूर्वीच्या गाण्यांइतके लोकप्रिय नाही.
https://www.youtube.com/watch?v=OwJPPaEyqhI
https://www.youtube.com/watch?v=c-3vPxKdj6o&index=1&list=RDc-3vPxKdj6o
https://www.youtube.com/watch?v=Zy6vBxqlapw
https://www.youtube.com/watch?v=4QfENGXWD-0
https://www.youtube.com/watch?v=aOs4su_9n3Q
https://www.youtube.com/watch?v=YQHsXMglC9A
https://www.youtube.com/watch?v=k2qgadSvNyU
https://www.youtube.com/watch?v=3tmd-ClpJxA
viva@expressindia.com