ऋतू बदलला की तरुणाईचे कट्टेही बदलतात. या सीझनमध्ये हिट आहेत शहरांतील छोटी-मोठी केक शॉप्स आणि कॅफे. वडापावच्या जोडीला लोकप्रिय होताहेत रस्त्यावर मिळणारे मेक्सिकन रोल्स, फ्रँकी आणि ब्रशेता. नव्या वर्षांतले नवे खाऊकट्टे आणि तिथले लोकप्रिय आयटेम्स..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिवाळ्यातील थंडगार सकाळ, कट्टय़ावर आपल्या दोस्तांबरोबर प्यायलेला आल्याचा वाफाळता चहा आणि गप्पांचा फड म्हणजे अगदी डेडली कॉम्बिनेशन. चहाच्या बरोबरीनेच आपली नेहमीची वडापावची गाडी आणि सँडविचवाले काका ठरलेले असतात. सध्या अशा कट्टय़ांची जागा जरा बदलत चाललेली दिसून येते आहे. म्हणजे वडापाव, चहा तर आहेच पण त्या जोडीला काही नवे खाऊकट्टे उदयाला यायला लागले आहेत. हॉटेल मॅनेजमेंट किंवा केटरिंगचा कोर्स करून नव्याने बाहेर पडणाऱ्या तरुणाईने उद्योजकतेची कास धरत छोटी-मोठी पेस्ट्री शॉप्स, कॅफे उघडायला सुरुवात केली आहे आणि तीच आता तरुणाईचे कट्टे बनू लागली आहेत.

पूर्वी इराणी हॉटेल्समध्ये दिसणारी गर्दी आता अशा छोटय़ा पण इनोव्हेटिव्ह थीमवर आधारित केक शॉप किंवा कॅफेमध्ये दिसायला लागली आहे. तिथे असणारा निवांतपणा आणि वेगवेगळे नवनवीन पदार्थ चाखायला मिळणं हे या कट्टय़ांचे यूएसपी आहेत. पुण्यात मोठमोठय़ा कॉलेजच्या जवळ आणि मुंबईत लहान-मोठय़ा सगळ्याच उपनगरांमध्ये स्टेशनच्या, क्सासेसच्या जवळ असे नवे कॅफे उगवलेले दिसताहेत.

अशी नवनवी दुकानं शोधून तिथली खास चव चाखण्यासाठी तरुणाई बाहेर पडते. या पदार्थामध्ये परप्रांतीय पदार्थाना खूप लोकप्रियता मिळते आहे. क्रेप, पॅनकेक, वॅफल, चीजकेक, ब्राउनीज अशा वेगळ्या व्हरायटीखेरीज मेक्सिकन बरीटोज, लेबनीज शोरमा, तिबेटियन मोमोज चाखायलाही तरुणाई नवे कट्टे शोधत आहे. जोडीला आइसक्रीमचे प्रकार, क्रशर्स, कॅड बी, कॅडएम आहेतच. या वेगळ्या नावांच्या, वेगळ्या सजावटीच्या, वेगळ्या चवीच्या पदार्थानी तरुणाईला आपलंसं केलंय. अशा वेगळ्या पदार्थाची मागणी लक्षात घेऊन केएफसी, डॉमिनोज अशा बडय़ा ब्रॅण्ड्सनीही नवीन सीझनसाठी काही नवीन डिश लाँच केल्या आहेत. हे खाऊचे कट्टे खिशाला काहीसा भार देणारे असले तरी त्याची मजा और आहे, हे लोकप्रियतेवरून लक्षात येईल.
ब्रेकफास्ट कम लंच म्हणजे ‘ब्रंच’साठी अशा नव्या खाऊ कट्टय़ांना भेटी द्यायचं प्रमाण वाढलंय. तो तरुणाईच्या लाइफस्टाइलचा एक भाग बनून गेला आहे. हॉस्टेल्सवर राहणारे, ‘पीजी’ म्हणून राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या अशा ब्रंच कट्टय़ांवर भेटणं हल्ली आवडायला लागलंय. मुंबईहून पुण्याला शिक्षणासाठी गेलेला चैतन्य खरे म्हणतो, ‘अनेकदा मी असाच मित्रांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी ब्रंच करतो. एक तर मला स्वत:ला स्वयंपाक करणं जमत नाही आणि मेसच्या वेळेत जाऊन पुन्हा तेच ते खाणं जिवावर येतं. त्यामुळे दिवसभर उपलब्ध असणारे असे ब्रंच आयटेम्स मला जास्त आवडतात.’ ब्रंच कट्टय़ांवर ब्रशेताज, रोल्स, फ्रँकी, टॅकोज असे पोटभरीचे पदार्थ असतात. त्यासोबत पावभाजी, मिसळ, डोशाचे नाना प्रकार याचाही समावेश होतो. संध्याकाळच्या कट्टय़ांसाठी तरुणाईची पावलं चहाच्या टपऱ्यांकडेच वळतात. कधीकधी थंडीत थंडगार आइसक्रीम खाण्याचा मोहही काहींना आवरत नाही आणि मग आइसक्रीम पार्लर्सही ओसंडून वाहताना दिसतात. नव्या पदार्थाच्या आणि नव्या चवीच्या या गर्दीत वडापाव- चहा मात्र अजून लोकप्रियता टिकवून आहे हेही विशेष.