गेल्या वर्षी आलेला ‘द इंटर्न’ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल, तर बदललेलं ऑफिस कल्चर म्हणजे काय ते लगेच लक्षात येईल. सायकलवरून इकडे-तिकडे फिरणारी बॉस, टीशर्ट-शॉर्ट्स अशा वेशातही ऑफिसला येणारे कर्मचारी. कुणी म्युझिक ऐकत काम करतंय तर कुणी खुर्चीऐवजी डेस्कवर बसलंय पण काम करतंय. कर्मचाऱ्यांसाठी एक मसाज रूम आहे आणि रिलॅक्स होण्यासाठी ते याचा वापर करताहेत.. अधिक इन्फॉर्मल, सोयीस्कर असं ऑफिस यातून दिसलं आणि मागच्या पिढीचं औपचारिक अवघडलेपणही त्यातून व्यक्त झालं. आता या बदलत्या ऑफिस कल्चरची लाट आपल्याकडेही आली आहे. विशेषत: तरुण व्यवस्थापन असणाऱ्या आणि नव्या दमाच्या कंपन्या अशा प्रकारे विविध सोयी-सुविधा कर्मचाऱ्यांना द्यायला लागल्या आहेत.
दिवसातला जास्तीत जास्त वेळ कर्मचारी वर्ग हा आपल्या कामाच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये घालवत असतो. कामाचा वाढता भार, स्पर्धा, डेडलाइनच प्रेशर, प्रेझेंटेशनची तयारी यासोबत ताणतणाव हातात हात घालून येतात. या ताणाचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर आणि मग पर्यायाने कामावर होत असतो. हेच हेरून आता बडय़ा कॉर्पोरेट कंपन्या आणि छोटय़ा संस्थादेखील कर्मचाऱ्यांच्या मानसिक-शारीरिक आरोग्याची काळजी घेताना दिसताहेत. कामाच्या मोबदल्यात पगार, कँटीन, चहा वगैरे सोयी इतपतच कंपन्यांचं कर्मचाऱ्यांशी नातं असतं. आता मात्र समीकरणं बदलू लागली आहेत. ऑफिसमधलं वातावरण अधिकाधिक अनौपचारिक होताना दिसतंय. याची सुरुवात झाली अर्थातच परदेशात. तिथे कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्या वाढली, तशी तिथलं ऑफिस कल्चर, मोकळेपणा आपल्याकडे यायला लागला आहे. परदेशात काही ऑफिसना तर जणू घरचाच फील देण्यात येतो. कामाच्या ठिकाणी अशाप्रकारे सोयीस्कर वातावरणनिर्मितीची संकल्पना आपल्याकडे रुळू लागलीये. ओपन कल्चरचं हे देणं आहे, असं म्हणायला हरकत नाही. कामाच्या रगाडय़ात मग थोडा वेळ ब्रेक तो बनता है! अशा वेळी विश्रांती मिळावी, प्रसन्न वाटावं, थोडं मनोरंजन व्हावं, विरंगुळा मिळावा यासाठी ऑफिसमध्ये विविध अॅक्टिव्हिटिजची सोय अनेक आस्थापनांच्या व्यवस्थापनाकडूनच केली जाते. त्यात फिटनेस सेंटर, योगा शिबीर, कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटनसारखे खेळ खेळले जातात.
व्याख्यान, गेट टूगेदर, स्पर्धाचं आयोजन केलं जातं. सणासुदीला काही तरी कार्यक्रम हमखास असतात. थीमबेस पार्टीज, सिक्रेट सांतासारख्या उपक्रमांमधून ‘फन एलिमेंट’ जपला जातो.
याबद्दल सांगताना बी.एन.पी. परिबास या कंपनीची सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर रोशनी पांचाल म्हणाली, ‘‘आमच्या ऑफिसच्या आजूबाजूला लहान उद्यानं केली आहेत. लंचनंतर तिथे जाता येतं. तसंच एखाद्याची तब्येत बरी नसेल तर त्यासाठी आराम करण्यासाठी एक स्वतंत्र खोली आहे. कँटीनमध्ये टी.व्ही. आहेत, आय.पी.एल., विश्वचषक स्पर्धेच्यावेळी कँटीनमध्ये तुडुंब गर्दी असते. तसेच सणासुदीच्यावेळी कार्यक्रमसुद्धा केले जातात. त्यामुळे एकूणच ऑफिसच वातावरण खेळीमेळीचं असतं.’’
अॅक्सिस बँकेत डेप्युटी मॅनेजर इन ट्रेजरी ऑपरेशन या पदावर कार्यरत असणाऱ्या श्रुती राऊतचं मतही फारसं वेगळं नाही. श्रुती म्हणाली, ‘‘आम्हाला ऑफिसमध्ये वाचनालय, जिम अशा सोयी मिळतात. योगा आणि अॅरोबिक्स सेशन्ससुद्धा होतात. तसंच पाळणाघराची सुद्धा सोय केलेली आहे. लोणावळ्याला अॅम्बी व्हॅली येथे टीम बिल्डिंग अॅक्टिव्हिटिजचं आयोजन केलं जातं. यामुळे वेगळ्या डिपार्टमेंटच्या इतर सहकाऱ्यांशी ओळख होते. त्यामुळे कामात त्यांची मदत होते. थोडा चेंज मिळतो त्यामुळे एक प्रकारे वर्किंग रिलेशन्स बिल्ड व्हायला मदत होते.’’
ऑफिसमधून मिळणाऱ्या या सोयीसुविधा कर्मचाऱ्यांना सोयीस्कर ठरताना दिसतात. त्यातून त्यांना उत्साह तर मिळतो त्यासोबत कामाचा उरकही वाढतो. आता यात हळूहळू समावेश होतोय तो पेट थेरपीचा..! या पेट थेरपीमुळे आता ऑफिसमध्ये मनीमाऊ आणि पपीदादा हमखास दिसायला लागले तर नवल वाटून घेऊ नका. पेट थेरपी म्हणजे ऑफिसमध्ये कुत्रा आणि मांजर पाळले जातात. या पाळीव प्राण्यांमुळे ऑफिसमध्ये वातावरण खेळीमेळीचं, हलकफुलकं होण्यास मदत होते. मुंबईच्या पागलगाय.कॉम या संस्थेत अशाच पेट थेरपीचा अवलंब केला गेलाय. या संस्थेच्या ऑफिसमध्ये एक सोनेरी रंगाचं, गुटगुटीत, गबदुल असं ‘जिंजर’ मांजर (बोका) आहे. या जिंजरला स्वत:चं डेस्क आहे. तिथे आपल्या गुबगुबीत गादीवर तो विराजमान झालेला असतो; नाही तर ऑफिसमध्ये इतरत्र बागडत असतो. त्याला त्याचं ऑफिसमध्ये खास ए.सी.खालचं असं स्वतंत्र टेबल आहे. प्यायला दूध, खेळायला खेळणी आणि स्क्रॅचबोर्डची व्यवस्था केलेली आहे. इतकंच नव्हे तर त्याचं एम्प्लॉई कार्डदेखील आहे. या संस्थेचे संस्थापक ऑल्विन अॅग्नेल म्हणाले, ‘‘जिंजर स्ट्रेसबस्टर म्हणून काम करतो. ऑफिसमधले सगळेच आम्ही त्याच्यासाठी काहीना काही करत असतो. कामातून थोडासा वेळ काढून कर्मचारी जिंजरशी बोलतात, खेळतात त्यांना त्यातून ब्रेक मिळतो आणि ते पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतात. ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना फ्लेक्सिबल टायमिंग आणि कम्फर्टेबल वाटेल असं इंटिरियर केलंय जेणेकरून त्यांची कार्यक्षमता वाढते आणि ते उत्तमरीत्या काम करतात.’’ याच ऑफिसमध्ये आठवडय़ातले तीन दिवस मसाजची सोयसुद्धा उपलब्ध करून दिलीये आणि मसाज करणारे हे अंशत: अंधत्त्व असणारे आहेत. पागलगाय.कॉमची कर्मचारी श्रद्धा काकडे म्हणाली की, ‘‘मसाज करून घेतल्यानंतर रीलॅक्स वाटतं, कामाचा ताण हलका होतो आणि थोडा ब्रेकसुद्धा मिळून जातो.’’
एकूणच ऑफिसमधले स्ट्रेस बस्टर्स आता अधिकाधिक इंटरेस्टिंग होऊ लागले आहे. अधिकाधिक वेळ ऑफिसमध्ये काम केलं तरी, त्याचा ताण येऊ नये याची खबरदारी आता व्यवस्थापन मंडळी घ्यायला लागल्याचं हे चिन्ह आहे. ‘वर्क प्लेस इज फन’ असं हे समीकरण आहे.
– कोमल आचरेकर