नृत्य शिकवणाऱ्या आणि नाचायला लावणाऱ्या व्हिडीओ ब्लॉग्जविषयी.. २९ एप्रिला साजऱ्या झालेल्या नृत्यदिनानिमित्ताने नृत्याला वाहिलेल्या चॅनेल्सचा धांडोळा..
फेअरवेल पार्टीज, संगीत, मेंदी आदी लग्नाचे इव्हेंट, बर्थडे पार्टी, ऑफिस पार्टी असो वा गणेशोत्सवातलं गेट टुगेदर सगळीकडे तुम्हाला नाचता येणं मस्ट झालंय. अगदी फिटनेस ट्रेनिंगदेखील नृत्याच्या ठेक्यावर दिलं जातं. नृत्य म्हणजे आजच्या काळाची गरज आहे. ‘यू टय़ूब’च्या डान्स चॅनल्समुळे आज वेगवेगळ्या स्टाइल्सचे आणि वेगवेगळ्या देशांतील नृत्यप्रकार घराघरांत जाऊन पोहोचले. घरबसल्या नृत्य शिकवणारे हे यू टय़ूबवरचे क्लासेस त्यामुळे धमाल हिट आहेत. ‘वन मिलियन डान्स स्टुडियो’, ‘डान्स ऑन, स्टेप फंक’, ‘वर्ल्ड ऑफ डान्स’, ‘लेस ट्विन्स’, ‘चाची गोनझाल्स’, ‘डिट्टो फिक्शन’ अशी कितीतरी चॅनल्स आहेत डान्स टय़ुटोरिअल्स देत असतात आणि त्यांचे नृत्य शिकणे शक्य झाले आहे.
बॉलीवूड, हिपहॉप, इंडियन क्लासिकल, कन्टेम्पररी अशा कितीतरी प्रकारांचे नृत्य या चॅनल्सच्या माध्यमातून शिकणे आता सोपे झाले आहे. अर्थात प्रत्यक्ष गुरूकडून शिकण्याची सर त्याला नाही, हे खरं. पण या नृत्यशैलींची तोंडओळख किंवा बेसिक नॉलेज तरी या यू टय़ूब टय़ुटोरिअल्स देतात. स्वत:ची नृत्यसंस्था सुरू केल्यावर त्याला प्रमोट करण्यासाठी हल्ली या चॅनल्सचा उपयोग करण्यात येतो. हिंदी चित्रपट आपल्या नृत्यातील अदांनी गाजवणारी आपली ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितचे ‘डान्स विथ माधुरी’ हे यू टय़ूब डान्स चॅनल सध्या यंगस्टर्सचे आवडते आहे. माधुरी दीक्षित आणि तिच्या नृत्याची फॅन फॉलोइंग बघता हे चॅनेल फेवरेट असणार, यात वादच नाही. माधुरीची सर्व गाजलेली आणि अजूनही प्रचलित असलेली गाणी म्हणजे एक-दो-तीन, माईनी माई, चनें के खेत में यावर माधुरी आणि तिची कोरिओग्राफर्सची टीम मिळून नृत्य शिकवतात. यामध्ये केवळ माधुरीच्या गाण्यांवरचीच नृत्ये शिकवली जातात असं नाही, तर ‘शिव तांडव स्तोत्रा’वर भारतीय शास्त्रीय नृत्यदेखील स्टेप्सद्वारे दाखवलं जातं. पाश्चिमात्य नृत्यशैलींतील स्ट्रीट जॅझचे धडेदेखील माधुरी देते.
स्वत:चे डान्स क्लासेस सुरू केल्यावर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी यू टय़ूब डान्स चॅनल्स सगळ्यात सोपा आणि बेस्ट मार्ग आहे. स्टेप फंक हे चॅनल सुरू करणारा जेरी नायरचा अनुभवदेखील हाच संदेश देतो. तो सांगतो, ‘कॉलेजच्या पहिल्या वर्षांपासून मला नृत्यामध्ये रस निर्माण झाला होता आणि मग मी या क्षेत्रात उतरायचे ठरवले. स्वत:चा क्लास सुरू केला, पण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणार कसं? मग डोक्यात आलं की आपलं एक यू टय़ूब चॅनल सुरू करावं. आणि इथेच जन्म झाला स्टेप फंकचा. यू टय़ूब खूप एक्सायटिंग माध्यम आहे. मी स्वत: कुठल्याही क्लासमध्ये जाऊन नृत्य शिकलो नाही. यू टय़ूब इज माय टीचर.’ स्टेप फंक सुरू झाल्यानंतर महिन्याभरातच सबस्क्रायबर्स मिळायला लागले. जेरीला अनेक मोठय़ा डान्स इन्स्टिटय़ूटच्या कोरिओग्राफर्सचे फोन आले आणि तेव्हा जाणवलं की, व्हिडीओ ब्लॉगिंग हे किती पॉवरफुल माध्यम आहे.. जेरी सांगतो. अर्बन हिपहॉप हे मुख्य आकर्षण असलेल्या स्टेप फंक या चॅनलमध्ये विविध वर्कशॉप्स आणि क्लासमधील कोरिओग्राफीजचे व्हिडीओज आहेत.
यू टय़ूबवरचे सध्याचे सगळ्यात प्रचलित डान्स चॅनल म्हणजे ‘वर्ल्ड ऑफ डान्स’. डब्ल्यू.ओ.डी. या नावाने प्रचलित या चॅनलचे बारा लाखांवर सबस्क्रायबर्स आहेत. अर्बन डान्स फॉर्म हे या चॅनलचे विशेष आहे. यावर असलेले हिपहॉपचे व्हिडीओज फेमस आहेत. मुळात डब्यूओडी ही कॅलिफोर्नियातली संस्था. त्यांचे यू टय़ूब चॅनल जगभरातील सर्व हौशी कलाकारांना नृत्य शिकविण्याचे काम करत आहे. या चॅनलचे २० हजारांहून जास्त व्हिडिओज यू टय़ूबवर उपलब्ध आहेत. इंडियन क्लसिकल डान्स फॉम्र्ससाठी ‘इंडियन डान्स सोसायटी’चं चॅनल प्रसिद्ध आहे. यामध्ये शंकर महादेवनच्या ‘ब्रेथलेस’सारख्या गाण्यांवर फ्यूजन पद्धतीने कोरिओग्राफी करण्यात आली आहे. त्याशिवाय भरतनाटय़मच्या व्हिडीओजसाठी मनमोहिनी इंडियन डान्स स्कूल हे चॅनल प्रसिद्ध आहे.
भारतातील तरुणाईमध्ये सध्या वेस्टर्न डान्स फॉर्मची खूप क्रेझ आहे. वेगवेगळ्या रिअॅलिटी शोमधून विविध वेस्टर्न डान्स फॉर्मची भारताला ओळख झाली. ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोमध्ये पाश्चिमात्य नृत्यशैलींचाच जास्त वापर करण्यात आला. याच पद्धतीच्या नृत्यशैलींचे ‘वन मिलियन डान्स स्टुडियो’ हे आणखी एक चॅनल सध्या प्रसिद्ध होत आहे. या डान्स चॅनलला यू टय़ूबवर सर्वात जास्त सबस्क्रायबर्स आहेत. यावरदेखील वेस्टर्न डान्स फॉम्र्सचे व्हिडीओज बघायला मिळतात.
फ्रान्समधील लॉरेन्स आणि लॅरी बॉग्र्युइस या जुळ्या भावांनी सुरू केलेल्या ‘लेस ट्विन्स’ या चॅनलची सध्या जगभरात खूप क्रेझ आहे. ‘वर्ल्ड ऑफ डान्स’ या जगभरातील प्रसिद्ध नृत्यस्पर्धेत परफॉर्म केल्यावर त्यांना तीन कोटी २० लाख व्ह्य़ूज मिळाले आणि यू टय़ूबवर ते प्रसिद्ध झाले. नवीन पद्धतीचे हिपहॉप ही त्यांची स्पेशालिटी आहे. या टय़ुटोरिअल्समुळे जगभरातून कुठेही कधीही नृत्य शिकता येते.
यू टय़ूब हे खूप सोपं, अॅक्सेसिबल आणि एन्टरटेनिंग माध्यम आहे. त्याबरोबर ‘इंटरॅक्टिव्ह लर्निग’चंही माध्यम आहे, हे या डान्स टय़ुटोरिअल्सच्या लोकप्रियतेवरून कळतं. विविध प्रांतांतले, विविध शैलींतले नृत्यप्रकार ‘विदिन वन क्लिक’ असल्यावर आणखी काय पाहिजे? जागतिक नृत्य दिनानिमित्त नृत्य या विषयावर वाहिलेल्या चॅनल्सचा हा धांडोळा.