‘आय लव्ह पेट्स’ असं अनेक जण म्हणतात. बदलापूरच्या हर्षदा गोखलेला मात्र प्राण्यांबद्दल विशेष प्रेम होतं. या पाळीव प्राण्यांमध्येच रमता येईल असा व्यवसाय निवडायचा तिनं ठरवलं. ‘पेट ट्रेनर आणि पेट हँडलर’ म्हणून जम बसवणं सोपं निश्चित नव्हतं, कारण आवड म्हणून केलेला हा व्यवसाय पूर्ण वेळ करिअर होताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मित्र–मैत्रिणींपासून अनेकांनी वेगळ्या क्षेत्रात करिअर करायचे सल्ले दिले. मुलगी आहेस– झेपेल का? अशी काळजीही अनेकांनी व्यक्त केली, पण हर्षदाने जिद्द कायम ठेवली. हे क्षेत्र डॉक्टर किंवा इंजिनियरच्या क्षेत्रांसारखं प्रतिष्ठेचं नाही, पण माझ्या अनेक इंजिनीअर मित्र–मैत्रिणींपेक्षा मी आज जास्त कमावते आहे आणि मुख्य म्हणजे आवडीच्या क्षेत्रात काम केल्याचं समाधान मला आहे. माझ्या या प्रोफेशनबद्दलचे गैरसमज मी कामातूनच दूर करतेय, याचा मला आनंद आहे.. असं हर्षदा सांगते. तिची गोष्ट..
हर्षदा गोखले
लहानपणापासूनच मला प्राण्यांची खूप आवड होती. कुत्रे मांजरी म्हणजे माझे जीव की प्राण. लहानपणापासून रस्त्यात जरी असे प्राणी दिसले की, मी त्यांच्या जवळ जायचे.. त्यांना उचलून घ्यायचे. माझ्या घरच्यांनी कधीही त्यापासून मला अडवलं नाही. कुठल्याच प्राण्याबद्दल कधीच माझ्या मनात भीती निर्माण झाली नाही. उलट प्राण्यांबद्दलची आपुलकी वाढत राहिली. मी बदलापूरला राहते. इथे आजूबाजूला अनेक लोकांकडे पाळीव कुत्रे आहेत. कुत्र्यांना घरात पाळायचं असेल तर त्यांना व्यवस्थित ट्रेन करणं आवश्यक असतं. पण आमच्या आसपासच्या पाळीव कुत्र्यांकडे बघताना मला जाणवलं की, बरेचदा त्यांना मारून मुटकून किंवा चुकीच्या पद्धतींनी शिकवलं जातंय. यातूनच मी पेट ट्रेनिंग किंवा पेट हँडलिंग असंच काहीतरी काम करायचं ठरवलं. मला यातच रमायला आवडेल हे पक्क होतं. पण भारतात असे कोणतेही ऑफिशिअल कोर्सेस उपलब्ध नाहीत. त्यामुळे मग मी अॅनिमल एंजल्स फाउंडेशन या संस्थेतून ‘कॅनाईन हँडलर अँड ट्रेनर’ यासाठीचं प्रशिक्षण घेतलं. त्यातून मग मी या संस्थेबरोबर काम करायला लागले. हे करता करता स्वत:चं कामही सुरू केलं.
मी सुरुवातीला छंद म्हणून पाहात होते, पण मी यातच करिअर करायचं ठरवल्यावर सुरुवातीला मला अनेक लोकांची बोलणी ऐकावी लागली. काही जण म्हणायचे की, तू मुलगी आहेस, जरा सिक्युअर जॉब बघ. असं क्षेत्र का निवडलंस? मी काम करायला नुकतीच सुरुवात केली तेव्हा तर अनेक अनाहूत सल्ले मिळाले. माझे जुने शाळेचे मित्र मैत्रिणीसुद्धा अनेकदा मला कामावरून बोलत असत. हे माझं फुल टाइम प्रोफेशन आहे, हे लोकांच्या गळी उतरवायला वेळ लागला. ‘तू रेट्स कमी कर आणि जरा कामं मिळायला लागली की रेट्स वाढव.’ वगैरे सल्लेही मिळाले. पण मला ते अजिबात मान्य नव्हतं. माझ्या कामावर माझा स्वतचा पूर्ण विश्वास होता. आता या व्यवसायात स्थिरस्थावर झाल्यावरही माझं काम मानाचं नाही असं अनेकांना अजूनही वाटतं. तुला काम झेपेल का, मोठाले पेट्स पाहिले की, तू मुलगी आहेस, कसं जमणार वगैरे संवाद ऐकू येतात. पण मी दुर्लक्ष करते. माझं कामच अशा वेळी बोलतं.
मला या क्षेत्रात पूर्ण वेळ काम करून आता दोन वर्ष झाली. पेट ट्रेनर म्हणून काम करत असताना मी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ‘कम्फर्टिंग एंजल्स’ या प्रोजेक्टमध्येही काम करते. या प्रोजेक्टमध्ये आम्ही एअरपोर्टवरील प्रवाशांच्या पेट्सना सांभाळतो. त्यांना आनंदी ठेवतो, जेणेकरून प्रवाशांना आणि पेट्सना त्रास होणार नाही. पेट्सना ट्रेन करताना वेगवगेळ्या पद्धतींचा अवलंब करावा लागतो. पॉझिटिव्ह रीइन्फोर्समेंट – म्हणजे न मारता, कोणताही अपाय होऊ न देता प्राण्यांना ट्रेनिंग देणे – या पद्धतीचा मी वापर करते. दोन अडीच र्वष हे काम मी करते आहे. माझं काम बघून अनेक व्हेटर्नरी डॉक्टर्स अनेकांना माझा रेफरन्स देतात. माझ्या अनेक इंजिनीअर मित्र-मैत्रिणींपेक्षा मी कदाचित जास्त कमावते. माझ्या या प्रोफेशनबद्दल अनेकांना किंतु होता पण आता माझ्या कामातूनच हे गैरसमज दूर होताहेत, याचा मला आनंद आहे.
viva@expressindia.com