आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

नाकात आणि कानात घालायच्या अ‍ॅक्सेसरीजमध्ये सध्या वैविध्य आलंय. त्यामुळे अर्थातच नव्याने नाक, कान टोचण्यासाठी तरुणाई उत्सुक आहे. पण पिअर्सिग वेदनादायी असतं का, सोनाराकडून करून घ्यावं की, गनशॉटने करावं असे अनेक प्रश्न मनात असू शकतात. त्याविषयी..

सध्या नोज आणि इअर अ‍ॅक्सेसरीजचे खूप प्रकार बाजारात आले आहेत. काही बोल्ड अ‍ॅक्सेसरीज क्लिपऑन म्हणजे चापाच्या प्रकारात येतात, तर बऱ्याच अ‍ॅक्सेसरीजना नाक किंवा कान टोचलेले असणं आवश्यक असतं. कानाच्या पाळीला असलेल्या बेसिक पिअर्सिगव्यतिरिक्त इतर ठिकाणी कान टोचून घ्यायचा सध्या ट्रेण्ड आहे. नव्याने पिअर्सिग करून घेताना खडा किंवा तार घातली जाते. कान व नाक टोचून घेण्याचे हल्ली दोन प्रकार असतात. पारंपरिक पद्धतीने सोनाराकडे जाऊन कान किंवा नाक सोन्याच्या तारेने टोचून घेणे किंवा गनशॉट पद्धतीने तुम्ही पिअर्सिग करू शकता.

पारंपरिक पद्धतीने पिअर्सिग करताना एखाद्या सोनाराच्या दुकानात जाऊन तिथेच त्यांच्या पिअर्सिग स्पेशालिस्टकडून तुम्हाला कान किंवा नाक टोचून मिळतं. ज्या प्रकारचे कानातले किंवा नाकातले घालायचे असतील त्या दागिन्यानेच शक्यतो ते नाक /कान टोचून देतात. म्हणजे नाकात सुंकलं घालणार असाल तर सोन्याच्या किंवा चांदीच्या तारेनंच टोचतात. स्टड किंवा चमकी घालणार असाल तर त्यामागच्या तारेनंच टोचलं जातं. गनशॉट पद्धतीत एका यंत्राद्वारे तुम्ही कान, नाक टोचून घेऊ  शकता. त्या यंत्राला बंदुकीप्रमाणे ट्रिगर असतो आणि त्या यंत्राच्या पुढच्या भागात स्टड अडकवलेला असतो. ट्रिगर दाबला की, तो स्टड  तुम्हाला हवा तिथे टोचून मिळतो. या पद्धतीतदेखील वेदना होतातच. उलट हाताने टोचण्यापेक्षा यंत्र हे काम करत असल्याने अचानक स्टड नाकात किंवा कानात टोचला जातो. कधी कधी गनशॉट पिअर्सिगची जखम चिघळण्याची शक्यता असते. पिअर्सिग जर योग्य आणि सुरक्षित पद्धतीने केलं तर घाबरण्याचं काहीच कारण नाही.

पिअर्सिग करण्यापूर्वी हे लक्षात घ्या..

  • शक्यतो माहितीतल्या सोनाराकडे जाऊनच पिअर्सिग करून घ्यावं. ते जास्त सुरक्षित असतं.
  • गन शॉट पद्धतीने पिअर्सिग करणार असाल तर पातळ तारेचा स्टड निवडावा.
  • कोणत्याही पद्धतीने पिअर्सिग केलं तरी किमान तीन आठवडे काळजी घ्यावी. नव्याने टोचलेल्या भागावर हलक्या हाताने तेल लावावं.
  • पिअर्सिग सोनाराकडून करणार असाल तर चमकी किंवा इतर कशानेही टोचून घेण्यापेक्षा सोन्याच्या किंवा चांदीच्या तारेनेच टोचून घ्या.
  • काही वेळा पिअर्सिग केल्यांनतर त्या जागी फोड येतो. अशा वेळी कोणत्याही पद्धतीने तो घालवायचा, फोडायचा प्रयत्न करू नये.
  • तार टोचून घेतली की, लगेचच काढून त्या जागी इतर काहीही घालायचा अट्टहास करू नये. काही महिने तार तशीच ठेवावी. ती नोज रिंगप्रमाणेच कूल दिसते.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Piercing ear piercing