सुट्टीच्या काळातच शाळेची पुस्तके आणून त्यांना साजेशी कव्हर्स घालण्याचा हेतू काय असतो, तर पुस्तकांना अधिक काळ टिकवून ठेवण्याचा. गाण्यांबाबत कव्हर व्हर्जन ही संकल्पना जगभरात अधिकाधिक रुळली ती नव्वदीच्या दशकात. कारण याच काळामध्ये सर्वाधिक कव्हर व्हर्जन्स लोकप्रिय झाली. अगदी आपल्याकडे जुन्या गाण्यांची रिमिक्स लाट पॉप अल्बम्सच्या काळात सर्वाधिक होती. अर्वाचिन काळातील ‘हर किसी को’, ‘तम्मा तम्मा’ ते ‘हम्मा’, ‘तू चिझ बडी है मस्त-मस्त’ची कव्हर व्हर्जन्स तरुणाई ओरिजनल गाणी असल्यासारखी ऐकते. यूटय़ूब युगात एखाद्या हिट गाण्याचे कव्हर हा परवलीचा शब्द झाला आहे. १९६०च्या दशकात या कव्हर व्हर्जन्सचा प्रकार अमेरिकेत रुळला, तोच मुळी कालौघात हरविलेल्या जुन्या गाण्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी. म्हणजे पन्नाशीच्या दशकापूर्वी वीस-तीस र्वष ऐकली जाणारी आणि तेव्हा कालबाह्य़ झालेल्या गाण्यांतील आनंद नव्या पिढीने घ्यावा हा त्यामागचा हेतू होता. साठच्या बंडखोरप्रवण दशकाने इतके कलाकार आणि संगीत घडविले की, त्यानंतरच्या २० एक वर्षांमध्ये ओरिजिनल गाण्यांचा तुटवडा नव्हता. ऐंशी नव्वदोत्तरीच्या काळामध्ये एमटीव्ही बाजारपेठेच्या घुसळणीने पॉप म्युझिकच्या मागणी-पुरवठय़ाचे गणित बदलले. व्हर्जन गाण्यांना मूळ गाण्यांहून अधिक प्रसिद्धी मिळायला लागली. त्यात चकचकीत व्हर्जन्स ओरिजनल भासू लागली आणि कव्हर व्हर्जन्सचा कारखानाच सुरू झाला.

पहिले उदाहरण घ्यायचे, तर डॉन मक्लिन यांच्या ‘अमेरिकन पाय’ (नाठाळ सिनेमा नव्हे) या गाण्याचे मॅडोनाने केलेले कव्हर व्हर्जन. अमेरिकन पाय हे गाणे आपल्या आवडत्या संगीतकारांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी मक्लिन यांनी लिहिले होते. ते लिहिताना त्यांनी अमेरिकी सामाजिक, सांस्कृतिक राजकीय घटनांसोबत समकालीन रॉक संगीतकारांचे आणि संगीताचे सारे संदर्भ शब्दबद्ध केले होते. रॉक संगीताचा इतिहास उलगडणारे गाणे म्हणून पुढे कित्येक पिढय़ा या गाण्याची अनुभूती घेत होत्या. मॅडोनाने २००० साली आपल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी या गाण्याचा मुखडा आणि मधल्या काही ओळी तशाच ठेवून अमेरिकी संदर्भ बदलत कव्हर व्हर्जन तयार केले. रॉक संगीताचा इतिहास त्यातून वगळण्यात आला होता. गाण्यातील सुरावटींना अधिक आकर्षक बनविल्याने त्या वर्षीच्या बिलबोर्ड यादीत नव्व्याण्णव ओरिजनल गाण्यांना मागे टाकून ते पहिल्या स्थानी पोहोचले.

रोनन केटिंगचे ‘व्हेन यू से नथिंग अ‍ॅट ऑल’ या गाण्याची भुरळ दशकभर तरुणाईवर होती. अनेकांना ते मूळ गाणे असल्याचेच वाटते. पण तसे नाही. किथ व्हिटली यांचे १९८८ सालचे मूळचे कण्ट्री गाणे फार लोकप्रिय नाही. ते अगदीच साधे वाटते. त्यानंतर याच गाण्याचे १९९५ साली अ‍ॅलिसन क्राऊस यांनी तयार केलेले पहिले व्हर्जन आले. पण या गाण्याची जागतिक निर्यात झाली ती रोनन केटिंगच्या गाण्यामुळे. अ‍ॅलिसन क्राऊसच्या गाण्यात जेथे एकल वाद्याचे तुकडे वाजले, तेथे कोरस वापरल्यामुळे या गाण्याची श्रवणशक्ती वधारली आहे. सुंदर व्हिडीओचा परिणाम म्हणजे हे गाणे अल्पावधीत लोकप्रिय ठरले. नॅटली इम्ब्रुलिआ या ऑस्ट्रेलियन गायिकेचे १९९७ साली आलेले टॉर्न हे गाणे गेली कित्येक वर्षे ओरिजनल म्हणूनच ओळखले जात होते. मात्र अलीकडेच ते ओरिजनल नसून कव्हर व्हर्जन असल्याचे समोर आले. त्यानंतर इतकी वर्षे ही बाब लपल्याची चर्चा समाजमाध्यमांवर बरीच रंगली होती.

अलीकडे एखाद्या कलाकाराच्या ताज्या गाण्यांचीही कव्हर व्हर्जन्स तातडीने केली जातात. ‘सिक्स पेन्स नन द रिचर’ या बॅण्डच्या प्रसिद्ध ‘किस मी’ या गाण्याची कित्येक व्हर्जन्स आहेत. अ‍ॅव्हरिल लव्हीन या या बॅण्डच्याच समांतर कालावधीत प्रसिद्ध असलेल्या गायिकेने मेंडोलिनचा वापर करून या गाण्याचे कव्हर व्हर्जन वेगळ्या पद्धतीने तयार केले आहे. सामाजिक योगदानासाठी असलेल्या किंवा कलाकारांच्या प्रमोशन टूर्सच्या कार्यक्रमांमध्ये दुसऱ्या कलाकाराच्या मूळ गाण्याची अनेक कव्हर व्हर्जन्स ऐकायला मिळतात. एलव्हिस प्रेसलेपासून टेलर स्वीफ्टने अशी गायलेली कव्हर्स ऐकायला मिळू शकतील. शब्दप्रतिभा हळूहळू घटण्याच्या पुढल्या काळात आणि वाद्य परिणाम अधिकाधिक मिळवता येणाऱ्या तांत्रिक प्रगतीच्या काळात गाण्यांची व्हर्जन्सच अधिक येणार आहेत. त्यात मूळ गाणे कुणाचे आणि कुठले, हेही पाहण्याची गरज वाटणार नाही.

म्युझिक बॉक्स

  • Madonna – American Pie
  • Don McLean- American Pie
  • Keith Whitley – When You Say Nothing at All
  • Ronan Keating – When You Say Nothing At All
  • Avril Lavigne – Kiss Me!
  • Natalie Imbruglia – Torn
  • Bon Jovi – It’s My Life

viva@expressindia.com

Story img Loader